नवीन लेखन...

मनाचा Appendix

“Appendix (आंत्रपुच्छ) – प्रत्येकाच्या शरीरातला एक अविभाज्य अवयव. (माझ्या ढोबळ माहितीआधारे) मानवी शरीर शास्त्रानुसार एक निरुपयोगी असा अवयव … किंवा “निरुपद्रवी” म्हणू हवं तर …. कारण त्याचं निसर्ग नियमानुसार शरीरात असणं कदाचित आवश्यक असेल पण त्याचं शरीरातल्या दैनंदिन कारभारात एरवी काहीच योगदान नसतं . ते शांतपणे आपल्या पोटात स्वतःच्या डोळ्यावर “आतडं” पांघरून निपचित पडलेलं असतं . पण कुठल्याही कारणास्तव त्याच्या नैसर्गिक अवस्थेत काही बदल, काही बिघाड झाला , त्याचा नैसर्गिक आकार वाढला की मग मात्र तो आपल्याला त्रास देऊ लागतो . त्याचा आकार जितका मोठा , तितकंच त्याचं उपद्रव मूल्यही जास्त . आणि एकदा या Appendix चा त्रास चालू झाला की सगळंच कठीण. वेळेत जर यावर नियंत्रण ठेवलं नाही तर परिस्थिती अजूनच बिकट होते . शस्त्रक्रिया आणि पुढच्या प्रक्रियांमुळे आपल्याबरोबर आपले कुटुंबिय , जवळचे नातेवाईक यांना देखील प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष याचा त्रास सहन करावा लागतो .

Appendix शिवाय आपल्या शरीरात Sugar , Uric acid , vitamins , calcium , hormones ,RBC, WBC असे अनेक घटक असतात जे एका विशिष्ट मर्यादेत असेपर्यत आपली गाडी रुळावर असते पण त्याचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर मात्र आपल्याला डायबेटीस , संधिवात अशा वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं. या सगळ्या निसर्ग रचनेच्या बाबतीत “मानवी शरीर” आणि “मानवी मन” यात कमालीचं साधर्म्य आहे .

वर उल्लेख केलेल्या शरीरातल्या अनेक घटकांप्रमाणे आपल्या मनात सुद्धा वेगवेगळ्या भावभावना , काम , क्रोध लोभ सारखे षड्रिपू , शृंगार ,करूण ,अद्भुत ,बीभत्स , शांत यासारखे नवरस – यांचं अस्तित्व असतंच . पण शरीराप्रमाणेच तेही जोपर्यंत विशिष्ट मर्यादेत आहेत तोवरच फायदेशीर अन्यथा संतुलन ढासळणे , स्किझोफ्रेनिया, विकृती , नैराश्य अशा मानसिक आजारांना बळी पडावं लागतं . एवढं साधर्म्य असताना जर शरीरात असतो तसा मनात Appendix नसेल तरच नवल .

मनाचा Appendix सुद्धा सतत प्रत्येक व्यक्तीच्या मनात असाच शांतपणे, एका कोपऱ्यात पहुडलेला असतो आणि तो मनाचा Appendix म्हणजेच आपला “”अहंकार (Ego)””. याचा सुद्धा आकार कुठल्याही कारणास्तव जर वाढला तर तो आपल्याला उपद्रवी ठरू शकतो . इथेदेखील त्याचा आकार जितका मोठा , “अहं” जितका वाढलेला तितकाच तो जास्त धोकादायक .

अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर “ मेरे पास बंगला है , गाडी है ….,,, तुम्हारे पास क्या है ?? असं म्हणणाऱ्या दिवार सिनेमातल्या विजयची पुढे जी वाताहात होते ती याच अहंकारामुळे , याच मनाच्या Appendix मुळे. “ आम्ही तुमच्या पापात वाटेकरी नाही “ असं, म्हणून जर अहंकारी “”वाल्या”” कोळ्याच्या बायको मुलांनी वेळीच त्याच्या मनाच्या Appendix ची शस्त्रक्रिया केली नसती तर “”वाल्याचा वाल्मिकी”” झालाच नसता …. आणि सगळं रामायण घडलंच नसतं .

हा मनाचा Appendix सुद्धा जर नियंत्रणाबाहेर गेला तर आपल्या बरोबर आपल्या जवळच्या व्यक्तीना सुद्धा संकटाच्या गर्तेत घेऊन जातो . अहंकाराच्या अधिपत्याखाली घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण साम्राज्य उध्वस्त झालेली , स्वतःबरोबरच परिवारावर सुद्धा विनाशकाल ओढवल्याची अनेक उदाहरणं आपण इतिहासात आणि वर्तमानातही पहातो . मानवी अहंकारापायी निसर्गावर अतिक्रमण केल्यामुळे उद्भवणारे प्रलय असोत किंवा सगळ्या कुटुंबावर आघात करणारे रस्त्यावरचे अपघात ..हे सुद्धा बरेचदा या मनाच्या Appendix वृद्धीमुळेच घडतात .

भूतलावर सर्वात वेगवान काय आहे असं विचारलं तर बुलेट ट्रेन ,वीज , विमान , प्रकाश अशी उत्तरं येतील पण खरं उत्तर आहे आपलं मन . जे आत्ता घरी असतं , पुढच्या क्षणी ऑफिसमध्ये , तिसऱ्या क्षणी अमेरिकेत, चौथ्या क्षणी बालपणात आणि लगेच वर्तमानात . म्हणूनच तर समर्थ रामदास म्हणतात “ मनासी टाकिले मागे , गतीसी तुळणा नसे”” .. त्यामुळे अशा “वेगमर्यादा” नसलेल्या मनाला अहंकाराचे “गतिरोधक” नक्कीच “”हादरे”” देऊ शकतात .

एकंदरीत शरीरातल्या Appendix पेक्षा मनाचा Appendix तुलनेने अधिक अपायकारक ठरू शकतो . त्यामुळे त्याची देखील आपल्याला तितकीच काळजी घेतली पाहिजे . अहंभाव कसा सुप्तपणे पडून राहील , आपल्यावर कुरघोडी करणार नाही नाही, त्याची झळ आपल्याला कशी पोचणार नाही याची वेळोवेळी दक्षता घेतली पाहिजे .

आपल्या एखाद्या चांगल्या गोष्टीचा , कर्तृत्वाचा जुजबी अभिमान वाटावा एवढाच अहं बाळगावा . आणि त्या पलीकडील सूक्ष्म रेषा ओलांडून त्याचं गर्वात रुपांतर झालं म्हणजे लगेच ओळखावं की आपल्या मनाच्या Appendix चा आकार वाढलाय आणि आता त्वरित उपाय योजना केली पाहिजे . अहं म्हणजे “मी” आणि म्हणून तो “माझा मीच” आटोक्यात आणला पाहिजे .

शरीरातल्या Appendix साठी अनेक डॉक्टर, उपाय, वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत पण मनाच्या Appendix ची काळजी , त्यावर नियंत्रण मात्र आपलं आपणच ठेवायला हवं … नाही का ??

©️ क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..