नुकतीच एका ऑफिसमध्ये गेले होते. एरवी दुसऱ्या मजल्यावरच्या या ऑफिसमध्ये जाताना नेहमी जाणवायचं, जिन्यातले कोपरे लोकांनी पान खाऊन थुंकून घाण करून टाकलेत. ‘येथे थुंकू नका’ या पाटीखालील लाल नक्षीनं भिंत रंगलेली असायची. अशा पायऱ्यांच्या अस्तित्वाची दखल कधीच घेतली जात नाही हे सवयीनं इतकं अंगवळणी पडलं होतं, की ‘थुंकू नका’ या पाटीच्या खाली रंगलेल्या भिंती यातला विरोधाभास मनापर्यंत पोचणंही बंद झालं, परवा मात्र पाहिलं, तर भिंती नव्या कोऱ्या रंगानं रंगवलेल्या; स्वच्छ, नीटनेटक्या आणि कोपऱ्यावर भिंतींवर देवदेवतांची चित्रं ! चित्र बघून भिंत स्वच्छ राहण्यामागचं कारण कळलं. देव माना… न माना… पण मांगल्याचं, पावित्र्याचं प्रतीक मानलेल्या त्या चित्रांवर थुंकण्याचं धाडस नास्तिक माणसानंही केलं नसतं.
समाजामध्येही माणसामधली पशुता, अमांगल्य व्यक्त होण्याची शक्यता असते; अशा वेळी देव-धर्म या संकल्पना जिन्यातल्या चित्रांचं काम करतात.
एक संत आपल्या प्रवचनामध्ये सांगत होते. ‘आपल्याशी दुसऱ्यानं जसं वागावं असं आपल्याला वाटतं, तसं आपण दुसऱ्याशी वागणं म्हणजे धर्म.’ हा विचार केला तर धर्माचा संबंध नीतीशी, मूल्यांशी जास्त येतो. प्रत्यक्षात मात्र नुसती नीति-वचनं ऐकून माणसाचं वागणं बदलत नाही.
माणसाचं मन खूप वेळा लहान मुलासारखं असतं. म्हणून नुसतं ‘असं वागू नको-असं वाग’ एवढं सांगून भागत नाही. चांगलं वागलास तर तुला चांगलं फळ मिळेल, वाईट वागलास तर त्यांचंही फळ भोगावं लागेल हा धाक माणसाच्या आयुष्याला चांगलं वळण लावतो. तुझ्या या चांगल्या-वाईट कृत्यांचा हिशेब ठेवणारा, तुझी प्रत्येक कृती पाहणारा कोण? तर ज्यानं तुला निर्माण केलं तो. इथे माणसाचा संबंध देवाशी येतो.
जे काम नुसत्या सदसदविवेक बुद्धीनं होत नाही, नुसत्या नीतितत्त्वांनी होत नाही, ते काम धर्मामधल्या पाप-पुण्याच्या कल्पनांनी, ‘देवा’वरच्या श्रद्धेनं होऊ शकतं म्हणून नीतीचा संबंध प्रत्येक संस्कृतीनं देवाशी जोडला.
अर्थात हा उपायसुद्धा नेहमीच परिणामकारक ठरतो असं नाही. मी कुठेही असलो तरी परमेश्वर मला पाहतो आहे ही श्रद्धा असणारा माणूस नेहमी चांगला वागेल. पण सामान्य माणसाची श्रद्धा सीमित असते. धर्माचं चाकोरीबद्ध, रूढी-रिवाजापुरतं ज्ञान त्याला असतं. म्हणून विशिष्ट पंथ, धर्म, मूर्तीशी ज्यांच्या श्रद्धा निगडित आहेत, अशी माणसं वाईट वागताना आपण पाहतोच की. माणसाची संवेदना हळूहळू या बाबतीतही बोथट होते. नाही तर मंदिरात, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चोऱ्या, खून, अत्याचार झालेच नसते. मांगल्याच्या, पावित्र्याच्या प्रतिमेचा धाक माणसाला विशिष्ट मयदिपर्यंतच वाईट वागण्यापासून परावृत्त करू शकतो.
यासाठी दुसरा मार्ग म्हणजे वाईट वर्तणुकीला मिळगारी कठोर शिक्षा !
शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक दंडाच्या भीतीनं माणसं चांगली वागतात. निदान पूर्ण वाईट तरी वागत नाहीत. पण कुठलाही नियम निर्माण झाला, की त्याच्या पळवाटाही निर्माण होतात. किंबहुना नियम मोडून एखादी गोष्ट करणं यात लोकांना जास्त ‘थ्रिल’ वाटतं. अशा वेळी पुन्हा पुन्हा महात्मा गांधींचे विचार आठवतात चालणार नाही. मुळात माणूस बदलला पाहिजे.
यंत्रणा बदलून
आणि माणूस बदलण्याचं काम ‘संस्कार’ करतात. संस्कारामध्ये थोड्या फार प्रमाणात कंडिशनिंग अभिप्रेत आहे. जुन्या पिढीतील लोकांमध्ये लवकर उठणं, स्वत:च्या कामाच्या बाबतीत जबाबदारीनं वागणं, साधं राहणं, काटकसर अशा अनेक सवयी आढळतात. याचं कारण विचारलं, तर ‘बस्स् ! वर्षानुवर्षाच्या सवयीनं इंद्रियांना हे वळण पडून गेलंय. ‘ हेच त्यांचं उत्तर असतं.
अर्थात पूर्वीच्या काळी हे संस्कार मुलांवर करताना त्यांची स्वतंत्र विचार करण्याची कुवत, सर्जनशीलता दडपली जायची हे खरं आहे. त्याचा परिणाम म्हणून आज आपण मुलांच्या मनाचा फार विचार करतो. त्यांना भरपूर स्वातंत्र्य देतो.
कधी कधी मात्र एक चुकार विचार मनात येतो. या स्वातंत्र्यामुळं नवी पिढी बेलगाम तर होत नाहीये ना?
पूर्वी ‘मी सांगतो ते कर.’ असं ठणकावून आई-वडील मुलांना चांगल्या सवयी लावायचे. ते चांगलं वागणं सवयीनं जन्मभर त्यांना चिकटायचं. मोठेपणी तर त्यामागचा हेतूही त्यांना कळायचा आणि कुठल्याही धाकाशिवाय चांगलं वागणं हा त्यांचा स्वभाव बनायचा.
आजकाल संस्कार करण्याच्या बाबतीत आपण हतबल होत आहोत का? ‘मुलांना काहिही सांगितलं तर पटत नाही’ असं त्यांच्या बुद्धिमत्तेचं, चौफेर ज्ञानाचं कौतुक करता करताच काही चांगल्या सवयी त्यांच्यात रुजतच नाहीत किंवा त्यांचं मन सांभाळून त्या त्यांच्यात कशा रुजवाव्यात हे आपल्याला कळत नाही अशी एक सूक्ष्मशी खंत आपल्या मनात आहे का?
जुन्या काळची दडपशाही आणि आजचं स्वातंत्र्य या दोन्हीचा सुवर्णमध्य काढूनच कुठल्याही धाकाशिवाय चांगलं वागण्याची सवय नव्या पिढीला लावायला हवी. ‘बन चुकी’ पिढी बदलणं अवघड आहे. जी तयार व्हायचीच आहे, तिला चांगलं करणं त्यामानानं सोपं. होय ना?
Leave a Reply