आपल्या घराशी असलेलं आपलं नातं आणि आपल्या नात्यातल्या सर्वांचं त्या घरात राहणं यांचा परस्परांशी असणारा संबंधच केवळ आपल्या घराला घरपण प्राप्त करून देत असतो. आपण आपल्या कुटुंबीयांचं आपल्याशी असलेलं नातं जसं जपण्याचा प्रयत्न करत असतो तसंच आपल्या घराशी असलेलं नातंही आपण जपत असतो. आपल्या कुटुंबापासून जसं मनानं आपण फार काळ दूर राहू शकत नाही तसंच काहीसं आपल्या घराच्या बाबतीतही आपलं होतं. या नात्यात प्रेमाचा ओलावा असल्यामुळेच आपल्या घरातल्या वातावरणात आपण गोडवा अनुभवत असतो. हे गहिरं नाते-संबंध खरं तर आपल्या प्रत्येक यशस्वी वाटचालीस कारणीभूत असतात. केवळ याच कारणामुळे आपण आपल्या कुटुंबाची तसंच आपल्या घराची विशेष काळजी घेत असतो.
आपलं आपल्या घराशी असलेलं नातं अधिक धृढ करण्याचा आपण विविध प्रकारे नेहमीच प्रयत्न करत असतो. त्यांपैकी एक म्हणजे गृह सजावट. ह्या माध्यमातून घरात आणलेल्या प्रत्येक वस्तूबरोबर आपलं नवीन नातं निर्माण होत असतं. खरं तर तसं नातं निर्माण होईल अशाच प्रकारे संरचनेचं काम करावं लागतं. हे नातं निर्माण करण्याचं काम अंतर्गत संरचनाकार करत असतो. अनेकदा गृह सजावट करताना केवळ नगास नग ह्याप्रमाणे घरातील वस्तूंचं आणि फर्निचरचं आयोजन केलं जातं. काही वेळा ह्या आयोजनात नियोजनाचा अभाव असतो. केवळ नाईलाजास्तव त्याचा स्वीकार करावा लागतो, आपल्या मनाला पटलं नाही तरीही. गृह सजावट करण्याचं निश्चित झालं की प्रथमतः कामाचं नियोजन आणि आवश्यक तो बृहत आराखडा तसंच कामाचे नकाशे, वस्तूंची निवड अशा अनेकविध बाबींचा अभ्यासपूर्वक विचार होणं जरूरीचं असतं.
आपल्या घराचं अंतरंग सजवण्यात आणि खुलवण्यात आपल्या मानसिकतेचा संबंध असल्यामुळे अंतर्मनाचा त्यांत मोठा वाटा असतो. आपल्या अंतर्मनाच्या सहभागाशिवाय केलेलं अंतर्गत सजावटीचं काम आपल्याच घरात आपल्याला परकेपणा निर्माण करायला कारणीभूत ठरू शकतं. अर्थात, अशी एखादीच सजावट अपवादात्मक असू शकते, की जी आपल्या अंतरंगात न डोकावता केली गेली आहे.
विद्यावाचस्पती विद्यानंद
ईमेल : vidyavachaspati.vidyanand@gmail.com
Leave a Reply