मन,देह आणि आत्मा यांचे क्लिष्ट मिश्रण म्हणजे मानव ! या तिघांची एकमेकांशी जुळवून घेण्याची सतत धडपड सुरु असते. आणि त्या जुळणीवर आणि परस्परांमधील समन्वयावर व्यक्तीचे आरोग्य आणि चैतन्य अवलंबून असते.माणसाचे वर्तन, मानसिक प्रक्रिया,संवाद या तिघा घटकांवर अवलंबून असतात.
प्लेटो म्हणाला- “मन माणसाच्या मेंदूत असते”.
अरिस्टोटल म्हणाला -“ते हृदयात असते.”
फ्रेंच तत्वज्ञ देकार्तेच्या मते -” मन हा मेंदूचा भाग असला तरीही त्याला स्वतःचे असे एक स्वतंत्र अस्तित्व असते.”
त्याच्या विचारांनुसार चैतन्य हा एकमेव मानवी अस्तित्वाचा पुरावा आहे. म्हणून त्याचे प्रसिद्ध वचन आहे- ” मी विचार करतो,म्हणजे मी अस्तित्वात आहे.”
मनाचे अध्ययन हा कायम उत्क्रांत प्रवास असतो, अगदी समर्थ रामदासांच्या “मनाचे श्लोक “पासूनचा. मनाविषयीचे प्रत्येक नवं संशोधन काहीतरी ठाम प्रतिपादन करण्याऐवजी आहे त्या ज्ञानात काहीतरी भर घालीत आहे.
मानवी मेंदूत सुमारे १५०० कोटी न्यूरॉन्स (मेंदू पेशी) असतात असे आता मान्य झाले आहे. यातील प्रत्येक पेशी इतर ५००० ते १०००० पेशींच्या सतत संपर्कात असते.
मनाची संरचना समजून घ्यायचे असेल तर ती दोन भागात समजून घ्यावी लागेल-
सबोध(जाणीव असलेलं) आणि सुप्त मन !
काहीही कार्य करताना आपण सबोध मनाच्या मदतीने करतो. मन आणि देह आपापसात जोडलेले आहेत. पूर्वी डॉक्टर मानायचे त्यापेक्षाही हा जोड अधिक घट्ट आणि प्रभावी असतो असे आता सिद्ध झालेले आहे.
गेल्या दहा वर्षांमधील संशोधनात असेही आढळून आलेले आहे की साधारण ५० ते ६० रसायने मेंदूकडून शरीराकडे संदेश पाठवीत असतात.
एन्डोर्फिन हे त्यापैकी एक प्रसिद्ध नांव !पूर्वी असं मानलं जात होतं की एन्डोर्फिन फक्त मेंदूत असते. पण आता ते शरीरातही असते असं सिद्ध झालेलं आहे.
मज्जापेशींच्या क्लिष्ट रचना मन आणि देहाला एकत्र बांधून ठेवतात. जागृत मन एकेवेळी साधारण सात गोष्टी स्मरणात ठेवू शकते. मात्र सुप्त मन खूप काही गोष्टी स्मरणात ठेवू शकते. म्हणूनच ते अधिक प्रभावी असते असं आता मान्य झालंय. फक्त ते आपल्या ताब्यात नसते.त्याचे कार्य साठवून ठेवलेल्या माहितीच्या आधारे सुरु असते.
सिग्मन्ड फ्रॉइड च्या मनोविश्लेषणात्मक लेखनामुळे प्रत्येकाच्या अंतःप्रेरणाची ओळख जास्त प्रखर झाली. जन्माच्या वेळी बाळाची पाटी कोरी असते आणि त्यावर माहिती साचत जाते. हे अंतःप्रवाह वयाबरोबर दबले जातात – काही अनुभव /आठवणी जाणून बुजून दडपले जातात. दुःख आणि वेदनादायी अनुभवांना, अस्वीकारार्ह जाणिवांना दडपले जाते. कधीकधी स्वाभाविक प्रवृत्तींचाही गळा घोटला जातो कारण त्या समाजमान्य नसतात. या साऱ्या अंतःप्रेरणेच्या प्रक्रिया असतात. मात्र त्यांचा व्यक्त होण्यासाठीचा लढा सुरूच असतो आणि मग त्याचे रूपांतर मानस शास्त्रीय विकृतींमध्ये होते. मात्र पडद्यामागील कृत्ये तशीच लपलेली राहतात.
जाणिवेतील प्रत्येक छोटी-मोठी घटना तिचा व्रण सुप्त मनावर ठेवून जाते.हे व्रण मनात गाडलेले असतात आणि त्यामधून काही वर्तन विकृती संभवतात. पण अद्यापही यामागचे नक्की कारण सापडलेले नाही. अनैसर्गिक वर्तन अशा अतृप्त इच्छांचे प्रतीक असते. मनात असमतोल उदयाला येतो. सत्यापासून पळ काढण्यासाठी अशी संरक्षक भिंत मन तयार करते आणि ही क्रिया पूर्णतया नेणिवेतून होत असते. निरामय मंडळी व्यक्तिगत आणि व्यावसायिक आव्हाने प्रभावी आणि सर्वंकष उत्तरे देऊन सहजगत्या पेलतात.
वाद दोन प्रकारचा असतो-
बाह्य जगताशी आणि दुसरा- “आपुलाचि वाद आपणाशी” ! हा दुसरा क्वचितच दृष्टोत्पत्तीस पडतो अन्यथा आतमध्ये गाडलेल्या अवस्थेत राहतो.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply