‘वचनं की दरिद्रता’ असे म्हणतात. माणूस कितीही गरीब वा दरिद्री असला तरी ही गरिबी वा दारिद्र्य प्रत्येक वेळी दाखवायलाच पाहिजे असे नाही. उलट कितीही दारिद्र्य असले तरी आपले बोलणे-चालणे, तसेच आचरणातून ‘ श्रीमंती’ दाखविता येते. त्याचीच ही कथा.
एका चाळीतील एका खोलीत एक महिला व तिची चार लहान मुले राहात होती. त्यांची परिस्थिती फारच गरिबीची होती; परंतु त्या महिलेने आपल्या मुलांना अशी शिकवण दिली होती की, आपण फार गरीब आहोत हे ते नेहमीच विसरून जाऊन रोजचा दिवस आनंदाने जगत होती. कारण ते सर्वजण एकाच खोलीत राहात असले तरी खोलीचा वेगवेगळ्या भागांना त्यांनी दिवाणखाना, पाकशाळा, शयनगृह,
अभ्यासगृह अशी नावे दिली होती. म्हणजे पाकशाळेच्या भागात स्वयंपाक व भोजन करणे, अभ्यासगृहामध्ये मुलांनी अभ्यास करणे व शयनगृहात झोपणे. गरिबीमुळे त्यांच्या घरात फारशी भांडी नव्हती. रोज भोजन करायला ते पत्रावळी वापरत. मात्र त्यांना ते सोन्याच्या थाळ्या म्हणत. तसेच पदार्थांनाही त्यांनी वेगवेगळी नावे दिली होती. पिठलं- भाकरी केली असल्यास त्यांना ते श्रीखंड-पुरी म्हणत. गुळाला ते अमृतखंड म्हणत, तर मिरच्यांचा ठेचा असल्यास ते त्याला खमंग पक्वान्न असं म्हणत. जेवताना या शब्दावरून त्यांच्यात नेहमीच हास्यविनोद चालत. फाटक्या सतरंजीला ते काश्मिरी गालिचा म्हणत, तर मोडक्या खुर्चीला ते सिंहासन असे संबोधित. एकदा त्या चाळीत त्यांच्या खोलीच्या बाजूलाच एक नवीन बिर्हाडकरू आले. दिवसा तसेच रात्री मुलांचे ते वेगवेगळे शब्दप्रयोग त्यांच्या कानावर आले. त्यामुळे त्या बिन्हाडकरूला वाटले, आपल्या शेजारी फार श्रीमंत माणसे राहात आहेत.
मात्र इतके श्रीमंत कुटुंब चाळीत कसे काय राहाते, याबद्दल त्या बिर्हाडकरूला विलक्षण कुतूहल वाटत होते. काही दिवसांनी त्यांचा परिचय होत गेला व एके दिवशी तो नवीन बिऱ्हाडकरू त्या महिलेच्या घरात गेला. तेव्हा त्याला ती महिला सिंहासनावर बसून (मोडक्या खुर्चीवर) काश्मिरी गालिचावर (फाटकी सतरंजी) बसलेल्या आपल्या मुलांना शिकवित होती, असे दृश्य दिसले. खोलीत त्याने सर्वत्र नजर फिरवली, तेव्हा त्यांच्या शब्दप्रयोगाचा अर्थ कळायला त्याला फारसा वेळ लागला नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आनंदाने व समाधानाने कसे जगायचे हे त्या कुटुंबाकडून तो शिकला होता.
त्याबद्दल त्या कुटुंबाचे कौतुक करून त्याने त्यांचा निरोप घेतला.
Leave a Reply