उत्तर प्रदेशातला एका नदीच्या खोऱ्यातला एक कुविख्यात दरोडेखोर. त्याचं सगळं आयुष्य दरोडेखोरीतच गेलं. त्याचा मुलगा पंधरा वर्षांचा झाल्यावर तो त्याला दरोडेखोरीचे प्रशिक्षण देऊ लागला. तसेच त्या व्यवसायाचे काही गुपित त्याने आपल्या मुलाला शिकवायला सुरुवात केली. शिकवताना तो आपल्या मुलास सांगत असे, “अरे, तुझ्या चोरीची सुरुवात चांगली व्हायला हवी. कुठेतरी जाऊन दरोडा घालशील आणि नवीन असल्यामुळे पोलिसांच्या हाती सापडून खडी फोडायला जाशील. असं होऊ नये म्हणून मी सांगतो त्याच ठिकाणी तू आयुष्यातली पहिली चोरी कर.” असे म्हणून त्य दरोडेखोराने आपल्या मुलास एका जंगलात नेते व समोरच असलेली एका साधूची झोपडी त्याला दाखविली आणि म्हणाला, “हे तुझ्या पहल्या चोरीचं ठिकाण.” ती झोपडी पाहू मुलाने आश्चर्याने विचारले, “या झोपडीत गरी करून काय मिळणार?” त्यावर दरोडेखोर म्हणाला, “अरे, त्या झोपडीत चोरी केलीस तर तिथे पोलीस येत नाहीत. आणि दुसरं म्हणजे त्या साधूला लोकं सोनं, चांदी, फळं, पैसे इ. भरपूर भेटवस्तू देतात आणि तो साधू त्या वस्तू लोकांना वाटत असतो. जर तो सगळं लोकांना वाटणारच आहे तर त्या आपण का चोरून आणू नये? गेली पस्तीस वर्षे मी तिथे चोरी करतो आहे तरीही त्या साधूने कधीही पोलिसात तक्रार केली नाही.” हे ऐकून मुलाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, “म्हणजे तुम्ही पस्तीस वर्षे चोरी करूनही त्या साधूला काहीही कमी पडलेले नाही. आणि तुम्हाला मात्र इतकी वर्षे झाली तरी अजूनही चोरी करावी लागते. याचा अर्थ असाच होतो की, सज्जनपणाने जगल्यानेच श्रीमंती प्राप्त होते. मग हा चोरीचा व्यवसाय करण्यापेक्षा मी त्या सांधूकडेच जाऊन राहतो.” असे म्हणत तो मुलगा साधूच्या झोपडीकडे चालायला लागला.
तात्पर्य: कोणत्याही संकटात सज्जनांचे समाधान, श्रीमंती कधीच कमी होत नाही कारण ते मनाने श्रीमंत असतात.
Leave a Reply