तिचे वडील इटालीतील एका छोट्या गावाचे महापौर होते. त्यामुळे गावातील अनेक लोक आपल्या छोट्या-मोठ्या समस्या घेऊन त्यांच्याकडे यायचे. या समस्यांमधून तिच्या बालमनाला लोकांच्या व्यथा कळायच्या व या व्यथा ऐकून तिचे बालमन कळवळायचे. याच व्यथा तिने शब्दबद्ध करायचे ठरविले व आपल्या साहित्य कृतीमधून त्या सादर केल्या. जीवनाचा वेध घेणाऱ्या या साहित्यकृती एवढ्या जबरदस्त होत्या की, मोठेपणी त्या मुलीला साहित्याचा नोबल पुरस्कार मिळाला.
ग्रोजिया डेलेडा (Grazia Deledda) हे तिचे नाव.१९२६ मध्ये साहित्यविषयक नोबल मिळविणारी ग्रेजिया ही दुसरी महिला होती. ग्रेजियाला लहानपणापासूनच लेखनाचे अतिशय वेड होते. शाळेतील मासिकांमधून तिचे विविध विषयावरचे लेख प्रसिद्ध झाले होते. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ट्रिब्यून या मान्यताप्राप्त पत्रिकेत तिचा लेख प्रसिद्ध झाला व तिला त्याचे त्यावेळी चक्क ५० लीरा एवढे मानधन मिळाले. त्यामुळे लेखनातील तिचा उत्साह वाढला व ती लिहितच गेली. ती राहत असलेल्या सार्डिनिया या इटलीतील प्रांतातील लोकजीवनाचा अभ्यास करून तिने वयाच्या १७ व्या वर्षी ‘फ्लॉवर ऑफ सार्डिनिया’ हे पुस्तक लिहिले व लेखिका म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तिने लिहिलेली ‘ऑनेस्ट सोल’ ही कादंबरी अतिशय गाजली. अल्पावधितच तिच्या लाखो प्रती खपल्या व ग्रेजिया एक लोकप्रिय लेखिका म्हणून ओळखली जाऊ लागली. १८९१ ते १९३१ या काळात ग्रेजियाची ४४ पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यामध्ये आफ्टर द डायव्होर्स, ‘द मदर’, ‘रीड्स इन द विन्ड’, ‘अॅशेस!, ‘ट्रु मिरॅकल्स’ आदी प्रमुख कादंबऱ्यांचा समावेश होता. अॅशेस कादंबरीवर निघालेला त्याच नावाचा चित्रपटही खूप गाजला होता. रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की तसेच दोस्तोवस्की यांच्या साहित्याचा ग्रेजियावर फार प्रभाव होता. मी इतर कोणासाठी नव्हे तर माझ्या मनाच्या शांतीसाठी लेखन करते असे ती नेहमी सांगायची. १९२६ मध्ये साहित्याचे नोबल पुरस्कार मिळाल्यानंतर दहा वर्षांनी ( १६ ऑगस्ट १९३६) तिचे निधन झाले.
Leave a Reply