दैनंदिन पहाटफेरीनंतर घरी परतत होतो. शेजारून एक वृद्ध गृहस्थ हातातील मोबाईलवर गाणं ऐकत तन्मयतेने जात होते – ” छोड दे सारी दुनिया किसीके लिए I ” माझा मित्र जयंत असनारे याचे हे “जीवनगीत (Life Song) आहे.
त्यावरून दुसरे गाणे आठवले-
” हैं रातभर का ये मेहमान अंधेरा
किससे रोके, रुका हैं सवेरा II ”
अशा उभारी देणाऱ्या ओळी ऐकल्या की पायात बळ येते.
परवा माझा मित्र रामकृष्णा संजीवी चेन्नईहून माझ्याशी अर्धा तास भरभरून बोलत होता- नुकत्याच आत्महत्या केलेल्या आमच्या वर्गमित्राबद्दल ! त्याचा इत्यर्थ इतकाच होता- ” बाबा रे, आपल्या सगळ्यांना समस्या असतात, पण म्हणून हे टोकाचे पाऊल ? आपले कित्येक वर्गमित्र आर्थिक, शारीरिक विवंचनेत आहेत. पण कोणी अद्याप रण सोडलेले नाही. ”
आणि नुकत्याच एका पोस्टमध्ये मी ज्या “संसार हैं एक नदियां ” चा उल्लेख केला आहे, त्यांत “अभिलाष ” नामक गुमनाम गीतकाराने जीवनचक्र बहारदार पद्धतीने लिहून ठेवलंय –
“धरती पे अम्बर की आँखों से बरसती है
इक रोज़ यही बूँदें, फिर बादल बनती हैं
इस बनने बिगड़ने के दस्तूर में सारे हैं I ”
मग सगळीकडे तत्वज्ञान ओतणारा राज कपूर मागे कसा राहणार ? तोही ” जागते रहो ” मध्ये सुचवितो –
” जिसने मन का दीप जलाया
दुनिया को उसने ही उजला पाया
मत रहना अँखियों के सहारे
जागो मोहन प्यारे I ”
अझीझ नाझा ची “चढता सुरज ” ही आख्खी कव्वाली जीवनाचे वैय्यर्थ अधोरेखित करणारी आहे. पण समर्थांचं सगळं साहित्य पायबळ देणारे स्फूर्तिदायी आहे. खेबूडकरांची सगळी शालागीते मन प्रसन्नतेने भरून टाकणारी आहेत. गुलज़ार / गदिमा /साहिर पावलोपावली उत्साह पेरत असतात.
” इतनी शक्ती हमें देना दाता ” मध्ये विनवणी, आर्जव असलं तरी खंबीर मनही आहे.
कितीतरी उदाहरणे आहेत अशा शब्दांची !
” शब्दांचा हा खेळ मांडला ” असं मागणं मांडणाऱ्या महानोरांनी ” तुझा शब्द दे आकाशाचा ” असं ईश्वराला विनवलं आहे.
देशभक्तीपर गाण्यांमध्ये, पोवाड्यांमध्ये ऊर्जा असते ती जीवनाला ध्येय देणारी, दिशा दाखविणारी !
अशा शब्दांचे ऋण मानताना, माझ्या आवडत्या दोन ओळी –
” तुझ्या -माझ्या माथ्यावरती आकांक्षांचा चंद्र आहे I
नको असा उदास होऊस, मला वचन याद आहे II ”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply