नवीन लेखन...

“मनसे”ला नवी दिशा

मुंबईत रझा अकादमीने काढलेल्या मोर्चानंतर हिंसाचार करणार्‍या दंगेखोरांविरुद्ध ठोस कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परवा काढलेला मोर्चा आणि नंतरची विराट जाहीर सभा या संघटनेच्या यापुढील वाटचालीला नवी दिशा देणारी ठरणार आहे. एवढ्या प्रचंड संख्येने कार्यकर्ते एकत्र येऊनही अत्यंत शांततामय रीतीने ही सभा आणि मोर्चा पार पाडून मनसेने आपली संघटना ही हुल्लडबाजांची संघटना नाही आणि आपल्याकडे यापुढील काळात अधिक गांभीर्याने पाहावे लागेल असेच जणू सूचित केलेले आहे. एकेकाळी मुंबईकरांची तारणहार असलेली शिवसेना आज उद्धव ठाकरे यांच्या काळात निस्तेज होत चालली आहे आणि त्यांची जागा आम्ही घेतली आहे, असेही राज यांनी या शक्तिप्रदर्शनातून दाखवून दिले आहे. भावनिकदृष्ट्या प्रत्येक मुंबईकराच्या काळजाला त्यांनी या विषयाच्या निमित्ताने हात घातला. पोलिसांच्या पाठीशी आज सरकार नाही, पण आपण आहोत, हा संदेश दिला. ‘हिंदुत्वा’च्या मर्यादेत स्वतःला न अडकवता आपला धर्म केवळ ‘महाराष्ट्रधर्म’ असे ठणकावून सांगत प्रसारमाध्यमांकडून होणार्‍या टीकेला त्यांनी चोख उत्तरही दिले. मनसे ‘खळ्ळ फटाक’च्या पलीकडे पोहोचली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये अधिक जबाबदार भूमिका राबवणार आहे, असेच जणू राज ठाकरे यांनी या आपल्या आंदोलनातून सूचित केले आहे आणि ही बाब महत्त्वाची आहे.
विराट जनसमुदाय समोर असूनही त्यांनी अत्यंत संयमित भाषण केले ही बाबही विशेष उल्लेखनीय म्हणावी लागेल. महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील आणि मुंबईचे पोलीस प्रमुख अरूप पटनाईक यांना त्यांनी टीकेचे लक्ष्य बनवले, पण आपल्या वक्तव्यातून कुठेही समोरच्या जनसमुदायाला चिथावणी मिळणार नाही याची काळजीही त्यांनी घेतल्याचे दिसत होते. ज्यांनी अकरा ऑगस्टला हिंसाचार घडवला ते महाराष्ट्रातील नव्हते, तर बाहेरून आलेले होते, असेही त्यांनी जाहीरपणे सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांचा ठाकरी बाणा राज यांच्यात पुरेपूर उतरलेला आहे. एखाद्या विषयामध्ये सुस्पष्ट आणि रोखठोक भूमिका घ्यायची, तळ्यात मळ्यात करायचे नाही या स्वभावामुळेच बाळासाहेबांवर मराठी माणसाने उदंड प्रेम केले. कितीही गुंतागुंतीचा प्रश्न असो, बाळासाहेब त्यात स्पष्ट भूमिका घ्यायला कधीही कचरले नाहीत. अगदी बाबरी ढॉंचा उद्ध्वस्त झाला तेव्हादेखील भाजपाने हात वर केले, परंतु ढॉंचा पाडणारे ते शिवसैनिकच होते, असे सांगायलाही बाळासाहेबांनी कमी केले नव्हते. आज वयोमानपरत्वे बाळासाहेब थकले आहेत. उद्धव ठाकरे यांनी कितीही आक्रमकता दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न चालवलेला असला, तरी त्यांच्या देहबोलीत ती दिसून येत नाही. राज ठाकरे यांच्यात ती धडाडी आहे. जनसामान्यांच्या काळजाला हात घालण्याची हातोटी आहे. पण आजवरच्या आंदोलनांतून मनसे म्हणजे गुंडगिरी, मनसे म्हणजे राडा असे जे समिकरण तयार झालेले होते, ते पुसून टाकल्याखेरीज या संघटनेला एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून स्वीकृती मिळणे कठीण आहे. विधानसभेत अबू आझमी यांनी हिंदीतून शपथ घेतली म्हणून मनसेच्या एका आमदाराने भर विधानसभेत त्यांच्या कानफटीत लगावली होती. मात्र, संघटनेची आक्रमकता कायम ठेवतानाच नेत्या – कार्यकर्त्यांनी अधिक जबाबदारीने वागावे, संयम, विवेक जागा ठेवावा अशी अपेक्षा राज बाळगून आहेत. इच्छुक उमेदवारांच्या लेखी परीक्षा घेण्यामागेही तोच दृष्टिकोन होता. राजकीय पक्ष म्हणून प्रगती करायची असेल तर जसे मारबडव करणारे फील्डवरचे कार्यकर्ते पाहिजेत, तशीच पडद्यामागे राहून निर्णय घेणारी थिंक टँकही हवी याचे भान राज यांना जरूर आहे. प्रजा फाऊंडेशनने केलेल्या एका सर्वेक्षणात महाराष्ट्र विधानसभेत सर्वोत्तम कामगिरी मनसेच्या आमदारांनी केल्याचा निष्कर्ष काढला गेला आहे. स्वच्छ प्रतिमा, विधानसभेतील उपस्थिती आणि प्रत्यक्ष कार्य या निकषांवर मनसेचे आमदार अधिक कार्यक्षम असल्याचे या संघटनेला आढळले. विधानसभेमध्ये सर्वाधिक प्रश्नही मनसेकडूनच आले होते. मनसेच्या यापुढील वाटचालीला अशी विधायक दिशा हवी आहे. केवळ राडा करून संघटनेला समाजमान्यता मिळत नसते. मनसे नव्या दिशेने चालू लागली आहे. तिला यापुढे गांभीर्यानेच घ्यावे लागेल.


(गोव्याहून प्रकाशित होणार्‍या `नवप्रभा’ या दैनिकातील २३ ऑगस्ट २०१२ चे संपादकीय)

— परेश प्रभू – संपादक, नवप्रभा, गोवा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..