सुमारे तीन महिन्यांपूर्वी सिने कलादिग्दर्शक, सुबोध गुरुजींनी फोन करुन मला विचारलं की, ‘एका कामासंदर्भात तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही ऑफिसवर आहात का?’ कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यापासून मी ऑफिसवर येणं सुरु केलं होतं. मी लगेचच होकार दिला..
दुसरे दिवशी अकरा वाजता सुबोध आले. खुर्चीवर स्थानापन्न झाले. सोबत आणलेल्या कापडी पिशवीतून त्यांनी एक हस्तलिखिताचं बाड काढलं. त्या स्पायरलच्या बाडामध्ये सुंदर अक्षरांत मजकुराची बरीच पाने लिहून, फोटोंच्या जागा सोडलेल्या होत्या.
चित्रपटसृष्टीच्या अगदी सुरुवातीच्या मूकपटांपासून ते १९९० सालापर्यंतच्या चित्रपटांच्या पोस्टर्सचा इतिहास, त्यांनी त्यात मांडलेला होता. सोबत त्यांनी आणलेल्या पेनड्राईवमधून मी दुर्मिळ पोस्टर्सच्या इमेजेस डाऊनलोड करुन घेतल्या.
महिनाभर मी त्या जुन्या पोस्टर्सवर फिनिशिंगचे काम करीत होतो. दर आठवड्याला सुबोधजी येत होते, झालेलं काम मी त्यांना दाखवत होतो. काॅफीचे दोन राऊंड होईपर्यंत, दोन तीन तास गप्पा होत होत्या…
वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी वडील, हरिभाऊंनी ब्रश हातात देऊन सुबोधला बॅनर रंगवण्याची संधी देऊन त्यांचं रंगाशी नातं जोडून दिलं.. तेव्हापासून आजपर्यंत हा मनस्वी चित्रकार सहा दशकांहून अधिक काळ रंगांबरोबरच विविध सांस्कृतिक क्षेत्रातही मनसोक्त न्हाऊन निघालेला आहे..
माध्यमिक शिक्षण घेताना याच्या बाकावरचा सवंगडी होता, नाना पाटेकर! पाचवी ते अकरावी पर्यंतची नानाची सोबत पुढे ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’ मध्ये देखील कायम राहिली. चार वर्षांचं शिक्षण पूर्ण केल्यावर सुबोधने वडिलांच्या ‘समर्थ आर्ट्स’ मध्ये स्वतःला वाहून घेतलं…
सुबोधच्या वडिलांनी तरुणपणीच बडोद्याहून मुंबईत येऊन दादर परिसरात ‘प्लाझा’च्या जवळच ‘समर्थ आर्ट्स’ स्टुडिओ सुरु केला होता. हिंदी चित्रपटांची बॅनर्सची कामं तिथं केली जात होती. सुबोध, नंतर प्रमोद व शेवटी विनोद असे तिघे भाऊ व दोन बहिणींसह हे सात जणांचं कुटुंब आनंदात रहात होतं..
शाळा शिकत असतानाच सुबोध व प्रमोदचे, दप्तर घरात ठेवल्यावर ब्रश हातात घेऊन बॅनर रंगविणे चालू व्हायचे.. झालेल्या कामांची बिले, सुबोध सुंदर अक्षरांत लिहून काढायचा व त्या त्या ऑफिसमध्ये ती पोहोचवायचा.
त्यांच्या समोरच शिवाजी नाट्य मंदिर असल्याने तेथे येणाऱ्या नाट्य निर्मात्यांची कामं त्यांच्याकडे येत असत. यातूनच प्रभाकर पणशीकर, मोहन वाघ , काशिनाथ घाणेकर, इ. मंडळींशी संपर्क आला व त्यांच्याशी सुबोधची दोस्ती झाली.
हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन करणारी मातब्बर मंडळी संपर्कात आल्याने त्यांचं काम जवळून पहाण्याची संधी मिळू लागली. त्यामधील एम. आर. आचरेकर, शरद पोळ, टी. के. देसाईंसारख्या मुरलेल्या कलादिग्दर्शकांसोबत काम करताना त्याला खूप काही शिकता आले.
कधी कोल्हापूरला गेल्यावर शालिनी, जयप्रभा व शांतकिरण हे स्टुडिओज, सुबोधला कलामंदिरंच भासायची. भालजी पेंढारकर यांच्या सहवासात रहाण्याचं भाग्यही त्यांना लाभलं..
स्वतंत्र कलादिग्दर्शनाची कामं सुरु केल्यावर दिग्गज कॅमेरामन, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्यशी मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले. शुटींगच्या निमित्ताने मुंबईतील सर्व स्टुडिओ माहितीचे झाले. त्यांचे मालक व ऑफिसमधील कर्मचारी वर्ग हा देखील ओळखीचा झाला.
चित्रपटाचे संगीतकार व गीतकार यांच्याशी संपर्क आल्याने सुधीर फडके, पंडित भीमसेन जोशी अशी मंडळी परमस्नेही झाली.
चित्रकारांमधील एस. एम. पंडित, दीनानाथ दलाल, मुळगावकर, आचरेकर यांना जवळून अनुभवता आलं. सिने पोस्टर्स करणारे जी. कांबळे, रामकुमार, पामआर्ट, सी. विश्वनाथ, दिवाकर, इ. ना कामं करताना पाहता आलं.
दिल्लीला होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी, महाराष्ट्राचा चित्ररथ करण्याची अनेक वर्षे संधी मिळाली. त्यात अकरा वेळा सर्वोत्कृष्ट चित्ररथाबद्दल त्यांना पारितोषिकेही मिळाली.
महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी सेट करण्याची सलग सहा वर्षे संधी मिळाली. चाळीस वर्षांच्या कारकिर्दीनंतर चित्रपटसृष्टीत आमूलाग्र बदल घडू लागले… कलादिग्दर्शन संगणकाच्या सहाय्याने होऊ लागलं. हे पाहून सुबोध यांनी मुंबईहून पुण्याला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
एकदा सहजच त्यांच्या मनात विचार आला की, सिने पोस्टर्स या विषयाच्या माहितीचं इतक्या वर्षांत कोणीही संकलन किंवा लेखन केलेलं नाही. काही वर्षांनंतर जाहिरातीचा हा प्रकार इतिहासजमाच होऊन जाईल..
म्हणूनच सुबोध यांनी या विषयाचा थोडक्यात आढावा व उपलब्ध असलेली पोस्टर्स यांचं संकलन केलं.. त्या निमित्तानं, तीस वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान भेटलेलो आम्ही दोघं, पुन्हा एकत्र आलो.. त्या संहितेला पुस्तकरुपात तयार केले.. तीन महिन्यांच्या परिश्रमानंतर सुबोध यांच्या स्वप्नाला हवा तसा आकार आला..
नुकतंच हे काम पूर्ण झालं. तीन महिन्यांत मी सुबोध यांचं काम करता करता त्यांच्या तोंडून चित्रपट सृष्टीतील अनेक प्रसंग, घटना, किस्से, आठवणी ऐकत होतो.. माझा हात जरी माऊसवर असला तरी कानाने मी ऐकत होतो.. अगदी महाभारतातील संजयने, धृतराष्ट्राला कुरुक्षेत्राविषयी ऐकवल्याप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरही मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ त्यांनी बारकाव्यांसह उभा केला..
प्रत्येक काम हे ठराविक काळानंतर पूर्ण होतंच, तसंच या कामाचं झालं.. रोज होणारी भेट आता काम निघाल्यावर किंवा सवडीने होणार होती.. असंच याआधी देखील अनेकदा झालेलं आहे..
दिवाळी अंकांचं काम करताना दोन महिने रोजच होणाऱ्या संपादकाच्या भेटी, अंक प्रिंटींगला जाईपर्यंत, रात्रीची जागरणंही होतात. एकत्र खाणं होतं, चहापाणी तर चालूच असतं.. अंक प्रिंटींगला गेल्यावर पुन्हा भेट होते ती अंक हातात घेतानाच..
पुन्हा रेल्वेचे रूळ बदलताना होणारा आवाज काही क्षण अंतर्मनाला उदास करुन जातो..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२०-१०-२१.
Leave a Reply