व्यक्त होणारीच व्यक्ती असते; अशाच व्यक्तीचे व्यक्तिमत्व चार चौघांपेक्षा निराळे असते. जन्माला आलेला प्रत्येक जीव काही ना काही प्रकारे व्यक्त होण्याचा प्रयत्न करतच असतो. ते व्यक्त होणे आवाजाच्या माध्यमातून, लिखित स्वरूपांत, देहबोलीच्या वापरांतून होत असते. आपल्या अंतर्मनांत येणारे विचार, विषय, घटना, अनुभव आपण अगदी जवळच्या, आपल्या हक्काच्या व्यक्तीजवळ बोलून दाखवत असतो. म्हणजेच एकप्रकारे आपण व्यक्तच होत असतो. तसे करण्यामुळे आपल्या मनांत साठून राहिलेले विचार बाहेर पडतात, त्यांना मोकळी वाट करून दिली जाते. निसर्ग नियमानुसार ते गरजेचे असते.
आपल्या संवादातून, लेखनातून, देहबोलीद्वारे आणि विविध क्रिया-प्रतिक्रियांतून आपण व्यक्त होत असतो. व्यक्त न होणाऱ्या व्यक्तीची घुसमट वाढत जाते. मोकळेपणाने मनांतील विषय एखाद्याला सांगितले कि मनावरचा ताण, दडपण कमी झाल्याचे देखील जाणवते. ह्या मोकळ्या होण्यातून आपल्या समस्यांचे निराकरण होत जाते. काहीवेळा उद्भवलेल्या प्रश्नांची उकल होत जाते. मनातील भय, न्यूनगंड दूर होण्याच्या दृष्टीने मोकळेपणाने आपल्या मनांतील शंका व्यक्त करणे उपयुक्त ठरते. आपल्याला पडलेले प्रश्न केवळ आपल्याच भ्रम आणि संभ्रमामुळे निर्माण होत असतात. एखाद्या समस्येचे उत्तर सर्वांनाच लागू होत नाही.
आपल्याला दैनंदिन जीवनात निरनिराळे अनुभव येत असतात. ज्यामुळे आपली मानसिकता बदलत राहते. या बदलत जाणाऱ्या मानसिकतेच्या अनुशंगाने जरा हटके विचार करण्याची जरुरी असते. नंतरच कार्यकृती करणे योग्य ठरत असते. आपल्या अंतर्मनांत जीवनासाठी अभ्यासपूर्वक विचार होणे आवश्यक असते. ह्यात सकारात्मक आणि विवेकी विचारांना अधिक महत्व असते. आपल्या जीवनाच्या समृद्धीसाठी आयुष्याची सुरुवातच घरामध्ये सकारात्मक विचारांनी करायची असते. कारण ह्या सर्वच बाबींचा संबंध आपल्या व्यक्त होण्यासठी असतो.
विद्यावाचस्पती विद्यानंद
Leave a Reply