नवीन लेखन...

मानसिक स्वास्थ्य, तथ्य आणि पथ्य….

अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांची पूर्तता करण्यात आपण सदोदित मग्न असतो, अर्थातच त्यासाठी अर्थार्जन करणे अनिवार्य ठरतं. ह्या तीनही गरजा खरंतर आपल्या शारीरिक असतात असं म्हंटलं तर निश्चितच वावगं ठरणार नाही. पण मग मनाचं काय ? ते असूनही त्याच्याकडे अनाहूतपणे दुर्लक्ष होत असतं. सद्य:स्थितीत सर्वप्रथम धन, तन आणि मग मन असा प्राधान्यक्रम ठरत चालला आहे. आपल्याच मनाचा अनेकदा मनातल्या मनात, मनाप्रमाणे, मनमुराद काही वेळा मन मारूनही मनोमन आपण विचार करतोच असं नाही. आपला दृश्य गोष्टी करण्यावर नेहेमीच अधिक भर असतो, कारण त्याच्यावर आपला भरवसा जास्त असतो. शारीरिक सौदर्य खुलवणे हे जितके आपल्याला प्रिय असतं तितकंच किबहुना थोडं जास्तच मानसिक स्वास्थ्य मिळवणे आणि ते टिकवणे जरुरीचं असतं.

मन आणि तन याचं नातं अतूट असतं. मन दिसत नसल्यामुळे ते कळत नाही आणि शरीर मात्र लपत नाही. मनाचा जोपर्यंत तनाशी मिलाफ होत नाही तोपर्यंत विचार आणि आचार (कृती) यांचं समीकरण जुळत नाही. त्यामुळे नेमकं काय होतंय ? तेच आपल्याला काहीवेळा कळत नाही. अंतर्मन हा विषय खूप गहन आहे. क्षणाक्षणाला होणाऱ्या मानसिक स्थित्यंतराचा आपण अभ्यासपूर्वक विचार करायचा ठरवला तरीही तो पूर्ण होऊ शकणार नाही. सुमारे ७०,००० (सत्तर हजार) विचार सर्वसाधारणपणे एका व्यक्तीच्या अंतर्मनात २४ तासांमध्ये येत असतात. हे एका शास्त्रीय प्रयोगाद्वारे स्पष्ट झालं आहे. अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती हे ओघानं आलंच.

अंतर्मनातील विचारांना थोपवून धरणं तितकं सोपं नसतं हे आपल्यापैकी प्रत्येकाच्या बाबतीत सत्य आहे. एकवेळ शरीरावर ताबा मिळवणे शक्य होऊ शकतं पण त्याच्यासाठी मनच कार्यरत राहावं लागतं. समजा, एकाच वेळेला १० व्यक्तींना एकसारख्या आणि एकाच प्रकारच्या शारीरिक हालचाली करायला सांगितल्या तर त्या ते सर्वजण अगदी नेमकेपणाने, हुबेहूब एकमेकांसारख्या हालचाली करतील. परंतु त्याच १० व्यक्तींना एका विशिष्ट विषयासंबंधी विचार करायला सांगितला तर तो कधीच समविचार, एकमेकांसारखा विचार यांच्या अंतर्मनात येऊ शकत नाही.

मानसिक स्वास्थ्य आपल्या भावनात्मक, मानसिक आणि सामाजिक बाबींशी निगडीत असतं. आपण कसा विचार करतो, अनुभवतो आणि कृती करतो ? यावर ते अवलंबून असतं. अनेकदा नकळत आपल्या अंतर्मनावर ताण येत असतो, तो जाणवत नाही आणि म्हणूनच कळतही नाही. अशावेळी आपल्या क्रिया आणि प्रतिक्रिया अनावधानाने बदलत जातात. त्यामुळे घेतलेले निर्णय आणि त्या दरम्यान इतरांशी होणारे आपले संवाद काहीवेळा विपरीत परिणाम करणारे ठरू शकतात. यासाठीच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अगदी बालपणापासून आणि पौगंडावस्थेपासून ते प्रौढपणात आणि वृद्धार्पणात देखील मानसिक स्वास्थ्य महत्वाचं आहे. आपल्या जीवनात आपण मानसिक स्वास्थ्यविषयक समस्यांचा सामना करत असलो, तर आपली विचारसरणी, अंतर्मनाची भावना आणि वागणूक या सर्वांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. मानसिक स्वास्थ्यासाठी समस्या निर्माण करणारे नकारात्मक विचार जरी ते सामान्य आहेत असं वाटत असलं तरीही सकारात्मक विचारांच्या माध्यमातून आपण निश्चितच परिवर्तन घडवून आणू शकतो.

आरोग्य संघटनेची २०२१ मधील आकडेवारी :

  • ४ ते १६ वर्षे वयोगटातील १४ मुलांमध्ये सामान्य मानसिक विकृती असल्याचं आढळतं.
  • १५ ते २१ वर्षे वयोगटातील ३५.५ % लोक नैराश्याचे शिकार झाल्याचं दिसून येतं.
  • ३ ते १४ वर्षे वयोगटात मुलांमध्ये स्वमग्नतेचे (ऑटीझमचे) प्रमाण ४ ते ५ % आहे.
  • जगात ऑटीझम झपाट्याने वाढण्यात भारत पहिल्या स्थानी असल्याचं समजतं.
  • ९.२ % कंडक्ट डिसऑर्डरचे प्रमाण आहे.
  • २० % चिंता विकृतीचे प्रमाण असल्याचं दिसतं.

     सद्य:स्थितीत अनेकांना भेडसावत असलेल्या समस्या :

  • एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलनशक्ती याविषयीच्या समस्या.
  • रोजचा दिनक्रम – दिनचर्या यांत शिस्त न पाळता येणं.
  • वकृत्व, कर्तुत्व आणि नेतृत्व याविषयीची चिंता / भीती असणं.
  • कर्तव्य आणि जबाबदारी यांची जाणीव न होणं.
  • व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीत कमालीची उदासीनता असणं.
  • समाजभान या दृष्टीकोनातून आचरण नसणं.
  • प्रत्येक गोष्टीकडे नकारात्मक भावनेनं बघणं.
  • संवादाचा अभाव असणं.
  • अनेक बाबतीत मनात भीती / चिंता असणं.
  • मानसिक अस्वस्थतेमुळे शारीरिक आजार बळावले जाणं.

मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य :

आपल्या मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्यासाठी अगदी जुजबी पथ्यांचे पालन करणे गरजेचं ठरतं. मानसिकदृष्ट्या आपण जेव्हा थकलेले असतो तेव्हाच शारीरिकदृष्ट्या झुकलेले असतो. आपल्या अंतर्मनाची शक्ती आणि स्थिरताच आपल्याला मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य देऊ करत असतं. त्याच्या प्राप्तीसाठी हे करून बघायला काहीच हरकत नसावी:

  • आपल्या पूर्ण क्षमतांची स्वतःच जाणीव करून घेणं
  • आयुष्यातील तणावांशी सामना करायला शिकणे
  • कार्यशील होऊन कार्यकृती करत राहणे
  • सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अर्थपूर्ण योगदान करणे
  • आपल्या गरजेनुसार व्यावसायिक मदत मिळवणे
  • जनसंपर्क निर्माण करणे, वाढवणे आणि टिकवणे
  • सकारात्मक विचार करणे
  • शारीरिकदृष्ट्या सक्रीय राहणे
  • इतरांना मदत करणे
  • पुरेशी झोप घेणं
  • विविध कौशल्यं विकसित करून अंतर्मनाचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी ती वापरणे

 

अनेकदा आपल्या शारीरिक दुखण्यामागे खरं तर मानसिक अस्वस्थता कारणीभूत असते. रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग असे मोठे आजार अथवा डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ, चक्कर अशी छोटी दुखणी अनेकांना त्यांच्या मानसिकतेमुळे उद्भवली जाऊ शकतात. आपण आपलं मानसिक स्वास्थ्य मिळवणे आणि ते टिकवणे हे सर्वस्वी आपल्याच मानसिकतेवर, अंतर्मनातील विचारांवर अवलंबून असतं.

— विद्यावाचस्पती विद्यानंद
vidyavachaspati.vidyanand@gmail.com

Avatar
About विद्यावाचस्पती विद्यानंद 32 Articles
शिक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक, करिअर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. एकूण १८ पुस्तकांचे लेखन (पैकी ६ क्रमिक पाठ्य पुस्तके गेल्या ६ वर्षांपासून विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध), २००० पेक्षा अधिक लेखांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी, ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रांत प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून योगदान, ३५ वर्षे वैविध्यपूर्ण व्यवसायातील अनुभव, निरनिराळ्या विद्याशाखांमधून एकूण २८ पदवी व पदव्योत्तर शिक्षण तसेच २ विषयांमध्ये पी. एच. डी. (मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र), सद्यस्थितीत तिसऱ्या पी. एच. डी. चे (आध्यात्म विषयांत) काम सुरु.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..