“– आयुष्यात पडझड केव्हा सुरू होते माहितेय ? ”
माशाने अचानक विचारले .
याची अनेक उत्तरे आहेत , पण तुला काय अभिप्रेत आहे , हे मला कसे कळणार ?
असं त्याला विचारावं , असं वाटलं .
पण काही बोललो नाही . एक म्हणजे उपयोग झाला नसता आणि दुसरे म्हणजे माझ्या मनातला विचार त्याला अगोदरच कळत होता .
तसा तो मनकवडाच होता .
“तुझ्या मनात चाललेलं ऐकतोय मी .”
मी हसलो .
” आता तू हसलास , त्यापाठी विनोद नव्हता . भीती होती . सगळंच जर याला कळायला लागलं तर पंचाईत होऊन जाईल . तुझ्या मनात येणारे लहानसहान विचार मला कळतील आणि तुझ्या आयुष्यात खाजगी असं काही राहणार नाही , कसलं गुपित राहणार नाही , हीच काळजी तुझ्या मनात होती . ती मला कळू नये म्हणून खोटं खोटं हसलास . खरं ना ? ”
माशानं विचारलं .
इतकं उघडं पडल्यावर खोटं बोलणं शक्यच नव्हतं . नाही म्हणणं चुकीचं होतं.
मी हो म्हटलं .
” काळजी करू नकोस . तुझ्या मनातले विचार मला कळले मी अन्य कुणाला सांगणार नाही . तू आणि मी समानधर्मा आहोत ना . निःशंक राहा . पडझड केव्हा सुरू होते असं मी विचारलं त्याला कारणही तसंच आहे .
कधीकधी पडझड होते तेव्हा कळतसुद्धा नाही , की पडझड झाली . नुकसान किंवा दुःख हे पडझडीचे परिणाम असतात . पडझड होणार आहे , हे फार थोड्या जणांना समजतं . पण परिस्थितीच्या रेट्यासमोर तेही हतबल होतात . ”
” आज तत्वज्ञान सांगण्याचा बेत आहे की काय ? ”
मनाशी बोलण्यापेक्षा मी त्याला विचारलं .
तो थोडा वेळ गप्प बसला .
” तत्वज्ञान असं काही नाही .”
खूप वेळाने तो म्हणाला .
” पण प्रवाहाच्या विरुद्ध पोहताना किंवा प्रवाहाच्या विरुद्ध जाताना झालेल्या पडझडीचे दिवस आठवले .”
समोर झुळुझुळू वाहणाऱ्या झऱ्याच्या नितळ पाण्यात एक डुबकी मारून , पोहून, ओल्या अंगाने निथळत तो माझ्याकडे आला .
आणि रोखून बघू लागला .
” मी काय केलं हे नाही ना कळलं ? ”
” कळलं . पोहून आलास .”
” बस ? इतकंच ? म्हणजे तुझं लक्ष नव्हतं . मी पोहत होतो पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं . ते तुझ्या लक्षात आलं नाही . यात तुझी चूक काहीच नाही . आपला सगळा समाज असाच आहे . कुणीतरी प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न करतोय , त्याच्या मनात काहीतरी वेगळं आहे , त्याबद्दल त्यानं काहीतरी विचार केलेला आहे , हे कुणी लक्षात घेत नाही . असं पोहताना त्याची दमछाक होत आहे , पण तो जिद्द सोडत नाही , हेही कुणी लक्षात घेत नाही . फक्त हसण्याचं , नको ते सल्ला देण्याचं , खिल्ली उडवण्याचं आणि मुख्य म्हणजे वेड्यात काढण्याचं काम , समाज करत असतो . ”
“हे सगळ्या अनेक संशोधकांच्या , शास्त्रज्ञांच्या , समाज सुधारकांच्या , शिक्षकांच्या , लोकप्रतिनिधींच्या , कर्तृत्वावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या आणि तशा विचारांच्या अनेक जणांनी अनुभवलं आहे .” मी म्हटलं .
“खरं आहे . पण अनेक वेळेला सामान्य माणसं सुद्धा काहीतरी वेगळं करण्याची जिद्द बाळगतात , पण त्यांची नाव निशाणी देखील रहात नाही . ”
मासा चुळबूळ करीत होता . त्याला काहीतरी आणखी सांगायचे होतं .
नेहमीप्रमाणे तो योग्य शब्दांना शोधत होता …
“– तुला माहितेय कोकण रेल्वे आली आणि अनेकांचं भाग्य पालटलं . अनेकांच्या जमिनी गेल्या , त्यांना चांगला मोबदला मिळाला , अनेकांना नोकऱ्या मिळाल्या , अनेकांना व्यवसाय सुरू करता आले .सगळं चांगलं झालं . पण रेल्वेमार्ग जिथून गेला तिथून वाहणाऱ्या नद्यांच्या नशिबी उपेक्षा आली . कामाला सुरुवात होताच ,पहिल्याच पावसात नद्या गाळानं भरून गेल्या . हे असं होणार , हे , अशिक्षित असणारे पण अनुभवानं शहाणे असणारे , कानीकपाळी ओरडून सांगत होते . मी शिक्षक होतो . अशाच एका नदीशेजारच्या गावात राहत होतो . गाळ साचणार , नद्या उथळ होणार , महापूर येणार आणि नदीचं पात्र विस्तारून नदीकाठाजवळच्या शेतीचं ,शेतजमिनीचं नुकसान होणार, हे स्वच्छ दिसत होतं . मी सरकार दरबारी , लोकप्रतिनिधी अशा सर्वांकडे पत्रव्यवहार सुरू केला . वर्तमानपत्रातून लेख लिहिले . पण कुणीही दखल घेतली नाही . शेवटी मी शाळेतल्या मुलांना विचारलं . एखाद्या रविवारी चारपाच तास श्रमदान करून गाळ काढायचा का ? सगळ्या मुलांनी होकार दिला . मी शाळेच्या मुख्याध्यापकांना , गावच्या लोकप्रतिनिधींना सांगितलं . सर्वांनी खुळ्यात काढलं . शंभर सव्वाशे मुलं असा कितीसा गाळ काढणार ? त्यानं काय साध्य होणार ? महापूर येणं थांबणार आहे का ? हे शासनाचं काम आहे , आपण प्रवाहाविरुद्ध जाऊन काय साध्य होणार ? मुलांना राबवून घेतल्यावर पालकांच्या , शिक्षण खात्याच्या तक्रारींना कोण उत्तर देणार ? मुलांच्या अभ्यासाच्या नुकसानीला जबाबदार कोण ? गाळ काढताना मुलांना जखमा झाल्या , मुलं आजारी पडली तर तो खर्च कोण करणार ? …एक ना दोन असंख्य प्रश्न विचारून , अडथळे निर्माण करून सर्वांनी नामोहरम करण्याचा प्रयत्न केला . पण उत्साही मुलं , एकजुटीनं माझ्या पाठी उभी राहिली . रविवारी सगळी मुलं फावडी घमेली घेऊन आली आणि थकेपर्यंत गाळ उपसण्याचं काम केलं . सगळे दमलेले बघून मी काम थांबवलं . शाळेच्या मैदानात सर्वांना एकत्र केलं . एका शिपायाला उप्पीट तयार करायला सांगितलं होतं . तो शिपाई प्रामाणिक होता . मी त्याला सर्वांना उप्पीट द्यायला सांगितलं तर तो रडायला लागला . त्यानं जे सांगितलं ते ऐकून मी मटकन खाली बसलो . त्यानं तयार केलेल्या उप्पीटात , त्याच्या नकळत कुणीतरी भरपूर पाणी ओतून ठेवलं होतं .मला काय करावं ते कळेना .मी सगळ्या मुलांना एकत्र करून जे घडलं ते सांगितलं . मला रडू आवरत नव्हतं . मला, मुलांचे भुकेलेले चेहरे दिसत होते . प्रवाहाविरुद्ध पोहायला जाणाऱ्या मला , कुणीतरी नतद्रष्ट माणसाने धडा शिकवायचा चंगच बांधला होता . पण मुलं मनानं चांगली होती . त्यांच्यातल्या मॉनिटर ने मला सांगितले , ‘ सर आम्ही घरी सणावाराला रव्याची गोड खीर पितो , आज आम्ही रव्याची तिखट खीर घेऊ . मजा येईल . त्यानं सर्वांना रांगेत उभं केलं आणि शिपायानं आणून ठेवलेल्या वडाच्या पानांचे द्रोण करून तिखट खीर वाढायला सुरुवात केली . मुलांची समज बघून शिपाई खूप वेळ रडत होता . माझीही अवस्था वेगळी नव्हती . पण मुलांनी सांभाळून घेतलं . आम्ही थोडाच गाळ उपसला होता . पण ते काम तेवढ्यावरच थांबलं . आमच्या कामाची दखल कुणीच घेतली नाही , ती अपेक्षाही नव्हती . पण किमान शासन स्तरावर ते काम सुरू व्हायला हवं होतं . ते झालं नाही . परिणामी त्याचवर्षी महाभयंकर पूर आला , त्यात अनेकांचं नुकसान झालं . तेव्हासुद्धा ज्यांचं खरं आणि भरपूर नुकसान झालं होतं , त्यांना मदत मिळावी म्हणून मी , अशा लोकांची यादी तयार केली . तेही प्रवाहाविरुद्ध जाऊन . मदत वाटपाच्या वेळी मदतीचे ट्रक अडवून लुटण्याचा धंदा पद्धतशीरपणे सुरू झाला होता , त्यावेळी त्याला विरोध केला . परिणामी शाळा सुटल्यावर घरी येताना काही जणांनी अंधारात मला मारहाण केली . पण मी प्रवाहाविरुद्ध पोहायचे थांबवले नाही . शेवटी काही जणांनी पोलिसात तक्रार केली . साम दाम दंड भेद अशा सगळ्या प्रकारांनी मला त्रास दिला …आज आठवतंय सगळं .”
मासा काही क्षण थांबला .
” तुला माहितेय , वाहणे आणि वाहवत जाणे , यात खूप फरक असतो . पाणी सहजगत्या उताराकडे वाहत जात असतं . तो त्या पाण्याचा धर्म असतो . असं वाहणारं पाणी निरागस असतं . पण त्याच पाण्याचा , स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करण्यासाठी , त्याच पाण्यातून वाहवत जाणं , हे अनैतिक असतं . अर्थात अनैतिकतेची चाड कुणाला राहिलीय म्हणा . त्याचाच परिणाम पडझडीच्या रूपानं होत असतो , हे कधी कळणार आहे हे नियतीलाच ठाऊक . ”
तो म्हणाला आणि समोरच्या झुळुझुळू वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्यात पोहायला गेला .
आता माझं नीट लक्ष होतं .
– तो आत्तासुद्धा प्रवाहाच्या विरुद्धच पोहत होता .
— आणि इतका वेळ माझ्या लक्षात न आलेली गोष्ट जाणवली .
मी सुद्धा नदीत पोहायला जाताना नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहत असे .
माशाच्या गोष्टीतला नवा अन्वयार्थ मला सापडला …
मी त्या माशाचं नीट निरीक्षण करू लागलो . प्रवाहाविरुद्ध पोहतांनाचं विलक्षण साम्य मला दिसू लागलं .
( क्रमशः)
–डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६
———–
* सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !
* ही एक वेगळी कथामालिका आहे .
* रोज किंवा एक दिवसाआड ती आपल्याला वाचायला मिळेल .
* नावासह सर्वांना पाठवायला हरकत नाही .
* आपला अभिप्राय महत्वाचा आणि प्रेरणादायक आहे .
Leave a Reply