— मी सोफ्यावर बसून होतो आणि तो जिन्याने वरखाली ये जा करीत होता .
वर जाताना टणाटण उड्या मारीत होता आणि खाली येताना चक्क घसरत येत होता . त्यात त्याला मजा वाटत होती . त्याच्या वर खाली करण्याकडे माझं लक्ष असल्यानं व्यायाम केल्यासारखी माझी मान हलत होती .
मुलांनी आणि पत्नीने विचारले सुद्धा ..
” आज हा व्यायामाचा कोणता प्रकार चाललाय . मान मोडेल अशाने .”
मी काही उत्तर दिले नाही .
कारण तो निळा मासा माझ्याशिवाय कुणालाच दिसत नव्हता .
मी घरातल्यांकडे दुर्लक्ष केलं आणि माशाकडे एकटक बघत राहिलो .
” कठीण आहे तुझं , अजून आवरलं नाहीस ? आज रात्री आपल्याला समुद्रावर जायचंय . लक्षात आहे ना ? हां , आता तुला एकट्याला जायचं नसेल तर घरातल्या सगळ्यांना घेऊन चल . त्यांना पण नॉकटील्युकाची गंमत बघायला मिळेल . चल , आवर …आणि सगळ्यांना सांग , रत्नागिरीच्या किनाऱ्याकडे येणाऱ्या पाण्याच्या लाटा निळ्या रंगाने प्रकाशमान होऊन येत आहेत . समुद्रात जिकडे पाहावे तिकडे निळाच निळा प्रकाश दिसतोय . अगदी नयनरम्य म्हणावा असा . निसर्गातील चमत्कार वाटावा असा . चल , आवर लौकर .”
त्याने जसे सांगितले तसे सर्वांना मी सांगितले .
आणि अंधार पडल्यावर आम्ही निघालो .
आता मला माझाच राग येऊ लागला होता .
का मी ऐकतोय त्या माशाचं ? काय संबंध त्याचा आणि आपला ?
मला सिंदबादच्या सफरीतल्या गोष्टीतला, पाठीवर ओझं होऊन राहिलेला म्हातारा आठवला .
तो म्हातारा जसा त्याला वाकवीत होता , नाचवीत होता , हवे ते काम करून घेत होता आणि वर सिंदबादला शहाणपणाच्या चार गोष्टी शिकवीत होता , त्याची आठवण झाली .
हा आपल्या पाठी लागलेला निळा मासा म्हणजे आत्ताच्या युगातला म्हाताराच वाटला मला .
कानाजवळ हसण्याचा आवाज आला तसा मी दचकलो .
” घाबरू नकोस , मी तुझ्या मानगुटीवर बसणार नाही . आणि त्या म्हाताऱ्यासारखा पिडणार पण नाही . तुझं माझं नातं वेगळं आहे . मी तुझा समानधर्मा आहे , याची जाणीव आहे . ”
“आता आपण समुद्रावर कशासाठी जातोय ? ”
मी मुद्दाम विषय बदलला .
तो पुन्हा हसला .
” तू विषय बदलला आहेस हे मला माहितेय . किंबहुना तू विषय बदलणार हेही माहितेय . तरीही सांगतो . आपण निळ्या लाटा बघायला जातोय , ते काही उगीच नाही . वस्तुतः नॉकटील्यूका हा एकपेशीय डायनोफ्लॅजेलेट गटात मोडणारा प्राणी प्लवंग आहे . तो जैविक प्रकाश निर्माण करू शकतो . किनाऱ्याकडे येताना तो प्राणी जलचरांची पिल्ले , अंडी खातो . पण हा समुद्रातील अन्नसाखळीला धोका निर्माण करतो . पर्यावरणाला धोकादायक आहे हा . तो ऑक्सिजन कमी करतो . आणि कळत नकळत आपण धोक्यात येतोय . या प्लवंगांमुळे लाटा आकर्षण निर्माण करणाऱ्या असतात रे , पण अंतिमतः ते स्लोपॉयझनिंग असतं . कुणाच्या लक्षात येत नाही .”
” मग काय करायचं आपण ?”
” काही नाही , त्या प्रकाशाची मजा घ्यायची . आपल्या हाती तेवढंच असतं . ”
तो म्हणाला आणि गप्प झाला .
त्याच्या शेवटच्या वाक्यातली निराशा मला जाणवली .
त्याला काहीतरी सांगायचं होतं .
कदाचित तो शब्दांची जुळवाजुळव करीत असावा .
” आकर्षित करणारं सगळंच काही हितावह नसतं .”
खूप वेळानं तो म्हणाला .
” हे तुझं विधान सार्वत्रिक होऊ शकतं . म्हणजे प्रत्येकाला केव्हातरी ते अनुभवायला मिळतंच . त्यात नाविन्य काय ? किंवा वेगळेपण ते काय ? ”
” हो , खरं आहे तुझं . ”
इतकं बोलून तो गप्प बसला , माझ्याकडे न बघता .
त्याच्या मनात काहीतरी चालू होतं .
काही कळत नव्हतं .
समुद्राची गाज ऐकू येत होती .
आकर्षक अशी निळाई पाण्यावर तरंगत पुढे पुढे येत होती .
लाट फुटल्यावर निळाई , फेसाळणाऱ्या पाण्यात विरघळून जात होती .
पुन्हा लाट..
पुन्हा निळाई ..
पुन्हा… पुन्हा …
“– पालकांना मी हेच सांगत होतो .”
अचानक त्यानं सुरुवात केली .
“– पालकांना मी परोपरीने सांगत होतो . तुम्ही तुमच्या पाल्याना किमान पदवीधर होऊ द्या . सिनेमा , वेब सिरीज हा भुलभुलैया आहे . नका त्यात अडकवू . आज तुम्ही त्यांच्याबरोबर असाल पण उद्या आउटडोअर किंवा इनडोअर शूटिंग असेल तेव्हा तुम्हाला मज्जाव केला जाईल . काय कराल तुम्ही मग ? या क्षेत्रात काय काय घडतं , हे उघड गुपित आहे , कशाला विषाची परीक्षा घेताय ? या क्षेत्रात जाऊ नका असं म्हणत नाही , पण उद्या वेळ आली तर पोट भरण्यासाठी लागणारी एखादी डिग्री , एखादं कौशल्य आत्मसात करा . हे आणि असं बरंच काही सांगितलं . पण वरिष्ठांनी , पालकांनी मला प्रतिगामी , संकुचित विचारांचा , या क्षेत्रातील नवनवीन संकल्पना माहीत नसल्यानं वेडगळ , असं मला ठरवलं . हो , होतोच मी वेडगळ . पण डोळे , कान , मन हे सगळं उघडं ठेवलं होतं . अनुभव होता मला , मी जरी वेडगळ असलो तरी . तुला सांगतो , माझ्या डोळ्यादेखत किती तरी मुलं मुली उद्ध्वस्त होताना पाहिलंय मी . निराशेच्या गर्तेत फेकलं गेल्यानं आलेलं रितेपण , व्यसनांच्या अधीन होताना पाहिलंय मी . त्या महागड्या व्यसनांच्या पूर्ततेसाठी लेदर करन्सी होण्यापर्यंत खालची पातळी गाठली त्यांनी .हे आणि असं बरंच काही …आकर्षक निळाईच रे ती . प्रदूषणाला आमंत्रण देणारी … अन्न साखळी नष्ट करणारी …प्रत्येक लाटेबरोबर किनाऱ्याकडे येणारी , आणि पुन्हा नव्याने येणाऱ्या लाटेकडे ओढली जाणारी . समुद्र खूप विशाल आणि अथांग आहे बघ . त्याचा अंतच लागत नाही,खरं ना ? ”
तो थांबला .
मी सुन्न झालो .
तो मला समानधर्मा का म्हणाला ते लक्षात येऊ लागलं .
समुद्राकडे मला तो का घेऊन आला , तेही समजलं .
पण मला हे समजलं नाही , की , माझे अनुभव त्याला कसे समजले ?
प्रश्नांचं आवर्त माझ्या भोवती घोंगवू लागलं .
मी मटकन वाळूत बसलो …
( क्रमशः)
–डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६
———–
आपण सर्वांनी पहिल्या भागाला फोनवरून आणि लेखी असा जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला , त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! हीच खरी माझी लेखन प्रेरणा !
* ही एक वेगळी कथामालिका आहे.
* रोज किंवा एक दिवसाआड ती आपल्याला वाचायला मिळेल .
* नावासह सर्वांना पाठवायला हरकत नाही .
Leave a Reply