अन्याय अत्याचाराविरुद्ध
लढण्यास तो बिचकला
मनातल्या अर्जुनाला कृष्ण
अजुनही नाही भेटला
उगाच खोट्या धर्मापायी
निरपराध कोणी मारला
अश्वत्थाम्याची ती जखम
पुन्हा लागली भळभळायला
जाणुन बुजून पाप करून
त्यांना पश्चाताप नाही झाला
त्यांच्यातला कपटी दुर्योधन
आज पुन्हा मोठ्याने हसला
शकुनीच्या मनातलं कपट
ओळखू नाही शकला
मनातला धर्मराज आज
मला पुन्हा हतबल दिसला
अन्याय अत्याचाराविरुद्ध
लढण्यास तो घाबरला
मनातल्या अर्जुनाला कृष्ण
अजुनही नाही भेटला
दुष्टांना पाठीशी घालणारा
जेव्हा मी कोणी बघितला
झाकोळते कोणी पुन्हा
भीष्माच्या महानतेला
होणारे अत्याचार जेव्हा
नाहीत दिसत मला
धृतराष्ट्राचं ते आंधळपण
मग नाही खुपत मनाला
होणारे अन्याय अत्याचार
गुपचूप बघत बसला
माझ्यातला तो कर्ण
अजुनही नाही बदलला
अन्याय अत्याचाराविरुद्ध
लढण्यास तो घाबरला
का माझ्या मनातला कृष्ण
फक्त बासरीच वाजवत राहिला ?
— डॉ. सुभाष कटकदौंड