कोरोनाच्या या महासंकटात लाॅकडाऊनच्या कारणास्तव आम जनतेला घरातच बसून रहावं लागलं. माझी देखील तीच स्थिती झाली. मी फेसबुकवर एकेक लेख लिहून पोस्ट करु लागलो. सुरुवातीला वाचक कमी होते, त्यामुळे प्रतिसादही बऱ्यापैकी होता. नंतर रोजच नवी पोस्ट टाकू लागल्याने वाचकांची संख्या वाढली व सकारात्मक प्रतिक्रियाही येऊ लागल्या.
पंधरा दिवसांपूर्वी मीराताईंची पोस्ट वाचून, गेली तेहतीस वर्षे संपर्कात नसलेल्या शशिकलाताईंनी मला फोन केला. त्यांनी माझी चौकशी केली. थोडक्यात इतक्या वर्षात घडलेल्या गोष्टी सांगितल्या. मला अतिशय आनंद झाला. या फेसबुकने इतकी वर्ष दुरावलेला दुवा, पुन्हा सांधला गेला.
मला त्यांची पहिली भेट आठवली. सदानंद प्रकाशनचे काम करीत असताना त्या खाडिलकरांकडे येत असत. तेव्हा शशिकला ताई ‘दै. तरुण भारत’ ची रविवार पुरवणीचं काम पहायच्या. त्यांनी मला पुरवणीतील लेखांची शीर्षके करणार का? असं विचारलं. मी होकार दिला.
पुरवणीची तयारी झाली की, मला त्या बोलावून घ्यायच्या. मंगळवारी शीर्षकांचे काम घेऊन यायचं आणि गुरुवारी ते करुन पोहोचवायचं हे सुरु झालं. दर रविवारी पुरवणीत छापून आलेली शीर्षकं पाहून मला एक वेगळंच समाधान वाटत असे.
काही वर्षांनंतर बन्सीलाल ट्रस्टघे ‘दै. महाराष्ट्र’ नावाचे एक नवीन दैनिक सुरू झाले. त्याचे संपादक वि. ना. देवधर होते. शशिकलाताई तिथं उपसंपादक म्हणून होत्या. त्यांना पेस्टींग करणारा आर्टिस्ट हवा होता. ताईंच्या सांगण्यावरुन मी दैनिकाचे काम करु लागलो. मजकुराच्या काॅलम साईजमध्ये ब्रोमाईडच्या गुंडाळया येत असत. त्या रबर सोल्युशनने पेस्ट करुन पानं लावली जात असत. सर्व पानं तयार झाल्यावर प्रिंटींगला पुणे विद्यार्थी गृहात प. ब. कुलकर्णी यांचेकडे पाठवली जात. तिथे थिटे नावाचे सर पानांच्या निगेटिव्ह करुन प्लेट तयार करीत असत. रात्री बारापर्यंत प्लेटस झाल्यावर अंक प्रिंटींगला जात असे. चारच्या सुमारास अंक अप्पा बळवंत चौकात पाठवला जात असे. मला इथे प्रिंटींगचा भरपूर अनुभव मिळाला.
इंदिरा गांधींच्या निधनाने संपूर्ण देश दुःखात बुडाला. त्यांच्याबद्दल विशेषांक काढला. त्याचे काम मी अहोरात्र केले. दुर्दैवाने आठच महिन्यांत हे दैनिक बंद झाले.
शशिकलाताईंनी स्वतःचे पुस्तक प्रकाशन सुरु करायचं ठरविले. त्यांच्या मिस्टरांच्या नावातल्या चंद्रशेखरमधील ‘चंद्र’ व शशिकलामधील ‘कला’ हे दोन शब्द जोडून ‘चंद्रकला प्रकाशन’ असे नाव ठरले. त्या नावाचा आम्ही सिंबाॅल तयार केला.
शशिकलाताईंनी कंपोझ व प्रिंटींगचे काम शिवाजीनगर येथील चिंचणीकरांकडे दिले होते. मी ताईंकडे गेल्यावर चिंचणीकरांना काही मजकूर द्यायचा असेल तर तो मी सायकलीवरुन त्यांना नेऊन देत असे. साहसकथा लेखक विजय देवधर मला इथंच भेटले. शशिकला ताईंचा प्रकाशनाचा पहिला सेट सहा पुस्तकांचा होता. सहा मुखपृष्ठे, आतील प्रिंटींग, बाईंडींग होऊन आदल्या दिवशी सर्व पुस्तकं तयार झाली.
तीन वर्ष मी प्रकाशनाचे काम करीत होतो. सकाळी दहाच्या सुमारास मी कसबा पेठेत जात असे. नवीन काम घेण्यासाठी, केलेले काम दाखविण्यासाठी, मुंबईहून आलेले ब्लाॅक देण्यासाठी माझ्या चकरा चालू असायच्या. दिवाळीसाठी प्रकाशनाचे ग्रिटींग्ज करुन, ते छापून दिले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नांदेड येथे होते. तेव्हा शशिकलाताईंनी स्टाॅल घेतला होता. आम्ही नांदेडला गेलो. मी स्टाॅल सांभाळला. अनेक नामवंत लेखकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. नांदेड पाहिले. साहित्य संमेलनाचा एक अनुभव माझ्या शिदोरीत जमा झाला.
१९८७ साल सुरु झाले. काही नवीन पुस्तकांची मुखपृष्ठे दुसऱ्या चित्रकारांनी केलेली दिसली. जूनमध्ये माझं लग्न झाले. स्वागत समारंभाला ताई आवर्जून आलेल्या होत्या. त्यानंतर त्यांचा संपर्क कमी होऊ लागला.
प्रदर्शनात त्यांची पुस्तकं मी पहात होतो. काही गाजलेली पुस्तकं मी मिळवून वाचलीही. त्या अमेरिकेला जाऊन आल्याचं समजलं. ‘माझं पुस्तक’ नावाचं त्यांनी आत्मकथनपर पुस्तकही लिहिलं. प्रकाशनाचा रौप्यमहोत्सव त्यांनी साजरा केला. सुशिलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे होते. मला आमंत्रण होतं, मात्र वडिलांसाठी गावी गेल्यामुळे मी जाऊ शकलो नाही.
वर्षामागून वर्षे गेली. मीराताईचा लेख लिहितांना त्यांची अगदी जवळची मैत्रीण म्हणून मला शशिकलाताई आठवत होत्या. मीराताईच्या तोंडून कित्येकदा त्यांचा उल्लेख होत असे. दोघींची कित्येक वर्षांत भेट झालीच नाही.
फोनवर मीराताई विषयी बोलताना शशिकलाताई देखील भावुक झालेल्या होत्या… या दोघींची भेट लवकरच होईल, अशी आशा करुयात….
कारण फेसबुकच्या जाहिरातीप्रमाणे, मनातलं लिहिलेलं वाचून.. पुन्हा जग जवळ येऊ लागलंय….
more together….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२२-१०-२०.
Leave a Reply