” सुस्वागतम, सुस्वागतम ! रंगदेवतेला आणि सुजाण नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सहर्ष सादर करीत आहे ——-”
मित्रांनो, असं निवेदन करीत असताना केव्हा माझ्या हातात लेखणी आली, हे कळलंच नाही. ठळकपणे आठवतं ते एवढंच की त्याकाळी वालचंद मधील विद्यार्थिनींना आमच्याबरोबर रंगमंचावर काम करण्याची परवानगी नव्हती, गांवातून स्त्रीपात्र ‘आयात” केलं जायचं अन स्त्रीपात्रविरहित एकांकिकांचा तुटवडा सांगलीतल्या तमाम बुकसेलर्सनी जाहीर केलेला असायचा.
रंगमंचावर यथाशक्ती,यथाकुवत लुडबुड करायचे, दुसऱ्यांचे शब्द आपले मानून कुडीला पेलतील असे नाट्य सादर करायचे आणि “परकाया प्रवेश ” करायचा ही त्याआधीची सवय ! अभिनयापाठोपाठ गंमत म्हणून करून पाहिलेलं दिग्दर्शन. पण लेखनाचीही जबाबदारी नकळत येऊन पडली तेव्हा एकूणच मामला जरा जास्तच गंभीर झाला. नाट्यव्यवहार तपासून थोडंस दर्जेदार सादर करण्याची जबाबदारी स्वीकारावी असं वाटलं.
आपले शब्द, आपले विचार इतर पात्रांच्या तोंडून स्वतःच्या साक्षीने वालचंदमधला मित्रवर्य, गुरूंचा समुदाय ऐकतोय ह्या दुर्मिळ दृश्याची सवय होत गेली. स्वतःला हवे तसे प्रसंग बसवून घ्यायचे व त्या माध्यमातून येत गेलेले अनुभव इतरांनीही व्यक्त करायचे असं घडत गेलं.
साधारण १५-१८ वर्षांपूर्वी एकांकिका लेखन कां आणि कोणत्या परिस्थितीत सुरु झालं याचा हा संक्षिप्त आढावा. कथा/कादंबरी/ललित लेखन हाताळण्याचे धाडस त्यानंतरच्या काळातले. नेहेमीप्रमाणे आधीची सोबत होती कवितेची आणि त्यानंतर असंच वेळोवेळी/ प्रसंगाप्रसंगाने तब्बल १४ एकांकिकांचे लेखन हातून होऊन गेलं. त्यातल्या तीन आज पुस्तकरूपाने तुमच्या साक्षीने इथे प्रकाशात वाटचाल करायला निघालेल्या आहेत.
महाविद्यालयावर मुद्रा उठविल्यानंतर, गांवातल्या स्पर्धांकडे नजर वळाली. ती पुढे विस्तृत झाली. पुण्याच्या औद्योगिक ललीतकलादर्श पर्यंत ! बजाज ऑटो च्या वास्तव्यात भरत नाट्य पर्यंत हे लेखन जाऊन पोहोचलं. तोपर्यंत ” व्वा ! मस्त !! ग्रेट, आगे बढो ! ” म्हणणारी मित्रमंडळ आणि कौतुक करणाऱ्या गुरुजनांची भूक वाढलेली होती, अपेक्षा मोठ्या झाल्या होत्या. मुख्य म्हणजे औद्योगिक विश्वातले ताकदीचे अनुभव साद घालत होते.
अशावेळी एक्स-झिरो ग्रुप /औरंगाबाद, नाट्यशलाका /नगर, लोकहितवादी मंडळ/नाशिक अशा कितीतरी संस्थांनी एकांकिका लेखन स्पर्धा जाहीर करून माझ्यासाठी नवे दरवाजे खुले केले. मग ताज्या दमाने, मुद्दाम नवी एकांकिका लिहून आखाड्यात उतरलो आणि हमखास विजयी होऊन परतत गेलो.
लेखन केल्यावर ते प्रकाशात यावंसं वाटणं हा तर (विशेषतः) नवोदितांचा धर्म ! मलाही ते डोहाळे १९७९ च्या सुमारासच लागले होते. पण आज ९३ साली पुस्तकरूपाने या एकांकिका आपल्यासमोर येताहेत. चांगल्या लेखनासाठी महाविद्यालयांची होत असणारी परवड माझ्या परिचयाची आहे. माझ्यानंतरच्याही पिढीने हे शोध थांबविले असतील असं वाटत नाही. त्यांच्यासाठी कदाचित हा संग्रह एक तरतूद ठरावा. माझे विद्यार्थी आजही जेव्हा या संदर्भात माझ्याकडे विचारणा करतात, तेव्हा पटकन एखादा लेखक/एखादा संग्रह मी रेकमंड करू शकत नाही. जर या संग्रहापाशी त्यांचे शोध संपले तर त्यापरता दुसरा आनंद कुठला?
हा संग्रहच मी माझ्या वालचंदच्या टिळक हॉल ला अर्पण केलाय. त्याच्याच रंगमंचावर मला स्वतःचा प्रथम शोध लागला. लेखक/दिग्दर्शक/अभिनेता म्हणून मी तेथे अनेकवार दिमाखात वावरलो. सुरुवातीच्या एकांकिकांचा पहिला श्रोता, रसिक कलावंत आणि प्रेक्षक, लेखनावर प्रेम करणारा आणि टीकाही करणारा माझा “नौटंकी ” मित्र, आज खास प्रवरेहून इस्लामपूरला आलेला जयंत असनारे,co-parents (सहपिता) ही माझ्या संदर्भात भूमिका बजावणारे माझे आदरणीय गुरुजन- प्रा. विजय दिवाण सर, प्रा. रिसबूड सर, प्रा. ब्रह्मनाळकर सर, प्रा. तिलवल्ली सर, प्रा. मोहन जोशी सर, प्राचार्य जोगळेकर सर, प्राचार्य पी ए कुळकर्णी सर, प्राचार्य संतपूर सर, प्राचार्य हेमंत अभ्यंकर सर – न संपणारी परंपरा आहे हे प्रेमाची, मार्गदर्शनाची ! लहानपणापासून वाचनाची प्रचंड गोडी लावणारे , दिसेल तो छापील कागद वाळवीसारखा फस्त करण्याची सवय लावणारे माझे आई-वडील, माझ्या नाट्यलेखनावर प्रेम करणारे प्रा. दिलीप परदेशी, प्रा. तारा भवाळकर , आवर्जून उपस्थित असलेले साहित्यिक, लेखक, कवी, प्रकाशिका स्नेहसुधाताई कुळकर्णी, या परिसरातील आदरार्थी साहित्यिक व्यक्तिमत्व- ऋषितुल्य कवी सुधांशू, नात्यांच्या पलीकडली माझी पत्नी आणि आत्तापासून माझं/माझ्या पत्नीचं लेखन हट्टाने ऐकणारा व त्यावर शब्दशः स्वतःची मतं व्यक्त करणारा आमचा लहानसा चिन्मय !
कोठल्याही लेखनासाठी रॉ मटेरियल पुरविणारी, बिन चेहेऱ्याची माणसं, त्यांच्या निगेटिव्ह वृत्तीच्या वर्तुळात शोध न संपलेला मी ! अशांचे आभार मानायलाच हवेत.
सरतेशेवटी राहिलेत शब्द !
तुम्हाला-मलाही न दिसलेले, पण नेहेमी आत साठून राहिलेले माझे शब्द ! त्यांनीच तर वेळोवेळी सावरलं, उभं केलं, घायाळही केलं, एकाकी केलं, आणि निःशब्द साथही दिली.
वेदनांचे समुदाय अंगावर चालून आले असताना या शब्दांनीच रक्षण केलं, आपले मानलेल्यांचे घाव स्वतः झेलून या शब्दांची कवचकुंडलं जखमी, पराभूत होत गेलेली मी पाहिली आहेत.
अनुभवांना स्वतःचे रूप देऊन कोपऱ्यात उभी राहिलेली माझी शब्दकळा मला नेहेमीच कोसळण्यापासून वाचवत आलीय. कितीतरी प्रसंगांतून, रूपांनी, माणसांच्या माध्यमातून माझ्या भेटीला आलेले माझे शब्द !
कळलंच नाही केव्हा, कोणत्या वळणावर
अबोलपणे काफिल्यात सामील झालेत शब्द
मी तर मानून चाललो होतो
की एकट्याचीच आहे माझी ही सफर !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply