मनामध्ये पडघम सतत वाजतच रहातात
काळजाचे करावे कान तेव्हा ऐकू येतात
उमटतात त्यात मनाच्या गाभाऱ्यातले नाद
खोलवरुन येणारी आपल्या अंतराची साद
आयुष्याच्या वाटेवरले काही फुललेले श्वास
काळीजकुपीत जपलेले एकले एकले निश्वास्
एकमेकांवरचा असलेला गाढासा विश्वास
आसपास असण्याचा मग असेना का आभास
कधी राहते गुंजत विचारांची निःशब्द गाज
उलगडत कधी शब्दांत गुरफटलेली लाज
थिरकत थिरकत येणाऱ्या तरलतेचे लहरी ताल
गुणगुणारे, धुसफुसणारे, आसुसलेले आपले हाल
येतात मोहरवत उत्फुल्लतेचे प्रसन्न झंकार
कधी तुटत झिणझिणणारी वेदनांची तार
अंतरीच्या डोहात खोल साधून एकांतवास
आपला आपल्यातच विरघळण्याचा असतो हा प्रवास
– यतीन सामंत
Leave a Reply