नवीन लेखन...

मनभावन नूतन

नूतन भारतीय हिंदी सिनेमातील एक आघाडीची नायिका, जन्म ४ जून १९३६. वडील कुमारसेन समर्थ आणि आई शोभना समर्थ, चित्रपट कलेशी जोडलेले. वयाच्या १३ व्या वर्षी तिने ‘हमारी बेटी’ या सिनेमामधून नायिका म्हणून पदार्पण केले. विशेष म्हणजे ह्या सिनेमाची निर्मिती तिच्या आई, शोभना समर्थ यांनी खास तिच्या साठीच केली होती. तिने अभिनय केलेला ‘हम लोग’ हा सिनेमा तिला तिच्या आई वडिलांनी बघू दिला नाही. कारण हा सिनेमा प्रौढांसाठी होता आणि त्या वेळी तिचं वय होतं १६ वर्ष.

असे अनेक योगायोग तिच्या आयुष्यात घडले आहेत. तिने १९५१ सालची ‘मिस इंडिया’ स्पर्धा देखील जिंकली होती. त्या नंतर ती अभिनयाचे रीतसर प्रशिक्षण घेण्यासाठी स्वित्झर्लंड येथे गेली होती. तिने एका मुलाखतीत हे वर्ष म्हणजे तिच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर काळ होता असे सांगितले आहे.

नूतन ही फक्त नायिका नाही तर एक चतुरस्र अभिनेत्री अशी तिची विशेष ओळख आहे. तिचा बोलका चेहरा आणि प्रसंगाप्रमाणे मुखावरील बदलणारे हावभाव या सगळ्यांनी नक्कीच रसिकांच्या मनात घर केलं आहे. तिने चित्रपटात साकारलेल्या नायिका आजही अजरामर झाल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर ‘सीमा’ – गौरी, ‘सुजाता’ Title Role, ‘बंदिनी’ – कल्याणी अशा अनेक. आतापर्यंत पाच वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळवणारी आणि एकदा सहायक अभिनेत्री अवॉर्ड मिळवणारी ती एकमेव अभिनेत्री आहे. तिचा हा फिल्मफेअर अवॉर्ड विक्रम आजवर कोणी मोडू नाही शकलं इतका जबरदस्त आविष्कार आहे तिच्या भूमिकांचा. साधना आणि स्मिता पाटील या दोघींनी तिला आपला आदर्श मानलं होतं.

अभिनयाबरोबरच तिला गाण्याचं देखील जबरदस्त अंग होतं. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून तिने पंडित जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे सलग १३-१४ वर्ष प्रशिक्षण घेतलं होतं. आणि हे तिच्या गाण्याच्या प्रसंगा वेळी दिसून येत असे. त्यामुळे ती गाणारी अभिनेत्री अशी एक वेगळी नूतन दिसत असे. उदाहरण द्यायचं झालं तर ‘सीमा’मधील मनमोहना या गाण्याच्या वेळी हे नक्कीच जाणवते. आणि हे खुद्द लतादीदी यांनी मान्य केले आहे. तिच्या अभिनयाचा उत्कट आविष्कार असणारी अनेक गाणी आहेत. या सगळ्यात प्रामुख्याने लक्षात राहणारी गाणी म्हणजे ‘मोरा गोरा अंग लई ले’ यामध्ये ती चंद्राला ज्या प्रकारे बजावते ते तर बघण्यासारखं आहे. ‘मैं तो भूल चली बाबुल का देस’मध्ये तर पूर्वीचा प्रियकर सासरी आल्यावर त्याला आपल्या नवऱ्याचा बदफैलीपणा समजू नये म्हणून पदरा आडून रडणारी आणि ‘सबसे प्यारा है सजना हमारा’ असं बजावणारी तर गाण्याच्या शेवटी गरबा खेळताना आनंदी आणि दुखी भाव काय बेमालूमपणे मिसळले आहेत तिने. टेलिफोन साँग ‘जलते है जिसके लिये’मध्ये हुंदका आवरून धरणारी नायिका.

पण ह्या सगळ्या वर कडी म्हणजे ‘तेरे घर के सामने’ या सिनेमामधील दोन गाणी ‘तू कहा ये बता’ मधली अवखळ प्रेयसी आणि ‘तेरे घर के सामने’मध्ये ग्लासमध्ये दिसणारी नूतन. ‘तू कहा’मध्ये सिमल्याच्या रस्त्यावरून फिरणाऱ्या देव आनंद ला शेवटी जेव्हा ती दिसते त्या वेळी शिरीष कणेकर म्हणतात त्या प्रमाणे ‘प्यार का देखो असर, आये तुम थामे जिगर’ असं देव आनंद म्हणत असताना ती दार उघडून बाहेर येते आणि जे काय हातवारे करते ते कोणत्याही प्रेयसीने करून दाखवावेत…. ह्या उक्तीचा प्रत्यय येतो. ‘तेरे घर के सामने’ हे title song म्हणजे तर सिनेमा दिग्दर्शक विजय उर्फ गोल्डी आनंद-देव आनंद-नूतन-मजरूह-सचिन दा या सगळ्यांनी साकारलेले एक गोड स्वप्नं आहे. ह्या गाण्यात ज्या वेळी ग्लासमध्ये बर्फ टाकताना थंडी वाजण्याची आणि तसं न करण्याची तिची धडपड बघत राहावी असे वाटते. तसेच देव जेव्हा ग्लास वर नॉक करतो त्या वेळी नाका वर फटका बसल्याची, तान घेताना प्रत्येकवेळी तिथल्या तिथे गिरकी घेणारी नूतन बघणे म्हणजे एक देखण्या musical आणि बहारदार चित्रीकरण यांचा सुंदर मिलाफ.

अशा या गुणी अभिनेत्री ला वयाच्या ५४ व्या वर्षी कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाने ग्रासले आणि १९९१ साली तिने या जगाचा निरोप घेतला. पण तिच्या अभिनय प्रवासामुळे तिने जी छाप सोडली आहे ती मात्र आज ही रसिकांच्या मनात कायम आहे.

– शुभांगी खरे

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..