नवीन लेखन...

मंचक महात्म्य – डोहाळे आणि भीमा काकी !

जगाच्या पाठीवर मंचकरावांसाठी सर्वात कठीण काम म्हणजे ‘विचार करणे ‘ हेच होते , आणि वारंवार ते त्यांना करावे लागत असे . आत्ता हि ते आपल्या झुपकेदार मिशीचे डावे टोक चिमटीत धरून विचारमग्न झाले होते . चिंतेचे कारण होते कि ‘ भीमा काकीस अर्जेंट कसे बोलावून घावे ?’ असे काय कारण होते कि भीमा काकीस पाचारण करण्याची वेळ अली होती ?

त्याचे काय झाले कि सकाळी सकाळी गिरिजाबाईना फोडणीच्या वासाने (  म्हणजे त्यांनी तसेच सांगितले होते ) दोन उलट्या झाल्या होत्या ! थोडा वेळ विश्राम करून त्या परत घरकामात गुंतल्या होत्या . पण शेजारधर्माच्या आद्य नियमाप्रमाणे बारीक लक्ष ठेवून असलेल्या रा रा भुजंगरावांनी आपल्या चातुर्यचंपक कलिका पत्नीस, खबर काढण्याच्या उद्देशाने , गिरिजेच्या भेटीस रवाना केले .

“मंचकभौजी , आता गिरिजेच्या सोबतीसाठी कोणी तरी नातेवाईक बाई घेऊन या ! त्यांना आधाराची आणि सोबतीची गरज लागेल ! ” गिरिजेस भेटून भुजंगीणबाई परत जाताना म्हणाल्या .
” सोबत ? ती कशाला ? आम्ही आहोतच कि.  ”
“अहो .तिला बहुदा ‘ दिवस ‘ गेले असावेत असा माझा अंदाज आहे ! बाई माणूस सोबतीला असेल तर मनातले सांगता येते . काही खावेसे वाटले तर ती तुमच्या पेक्षा त्या बाईकडे अधिक मोकळे पणे सांगू शकेल !”
“का ? गिरिजाबाई आम्हास  पण सांगू शकतात ! अन आला दिवस जातोच कि त्यात काय विशेष ? गिरिजाबाईंचे दिवस काय जगावेगळे आहेत ?”
“भौजी ,तुम्हाला इतकंही कस काळात नाही ? आता तुम्ही ‘बाप ‘ होणार आहेत ! मला वाटत ते मी सांगितलं . आता तुमचं तुम्ही बघा . येते मी ,घरात काम पडलीत . ”
भुजंग वाहिनी निघून गेल्या .
मंचकरावानी गिरिजाबाईस हाक मारली .
“या भुजंग वाहिनी काय म्हणाल्या आम्हास नीटसे कळले नाही ! आम्ही असताना तुम्हास वेगळ्या ‘आधाराची आणि सोबतीची ‘ काय गरज आहे ? तुम्हास असे काय झाले आहे ? आणि आम्ही ‘ बाप ‘ होणार हे आमच्या आधी या भुजंगीणबाईस कसे काय कळू शकते ?” मंचकरावांनी गिरिजाबाईस विचारले . गरीजाबाईंच्या नाकाचा शेंडा ,हनुवटी आणि कपाळ आज चमकदार दिसत होते . चेहऱ्याचे ‘तेज ‘ म्हणतात ते हेच असावे !
गिरीजाबाईंसाठी काम कठीणच होते . मग बराचवेळ त्या ‘आई ‘होणार असल्याचे मंचकरावाना समजावून सागत होत्या . आणि हे समजावून सांगणे खूप गरजेचे पण होते . कारण शंका समाधानासाठी हा बाबा त्या दारुड्या झुकांड्याला पण विचारतो !
“आत्ता थोडासा उलगडा झाल्या सारखे आम्हास वाटतय ! तुमच्या माहेरची , या कार्यासाठी कोणी  उपयुक्त व्यक्ती आहे का ?”
मूकपणे गिरीजाबाईनी सावकाश  नकारार्थी मान हलवली .
” आमच्या माहितीत केवळ भीमा काकी आहेत ! त्यांना स्वतः चे मुल बाळ नाही . पण अनुभव दांडगा आहे ! कारण आमचे संगोपन त्यांनीच केले होते ! ”
येथे ‘भीमा काकी ‘ यांचा अल्प परिचय अनाठाई होणार नाही .

‘ माय मरो , अन मावशी उरो ! ‘असे म्हणतात . पण मंचकरावानची आई मेली , तिला बहिण भाऊ कोणीच नव्हते . अख्या कुटुंबात एकच स्त्री होती , ती हि ‘भीमा काकी ‘ ! लग्ना नंतर वर्षभरात हनुमत काका या भीमा काकीच्या जाचाला कंटाळून घर सोडून पळून गेला होता !भीमा काकीनी मंचकरावानचा अगदी आई सारखा प्रतिपाळ केला होता . आता हा प्रतिपाळ ‘सावत्र आई ‘सारखा होता ,यात त्या बिचारीचा काय दोष ?हे मंचकरावानचे भोग असावेत ! तरी ते भिमाकाकीस सांभाळत होते . गावा  कडील मंचक वाड्यातले  दोन खण त्यांना राहायला दिले होते . महिना हजार -दोन हजाराची मनी ऑर्डर पण करत असत . शेत मालातला हिस्सा तर भीमा काकी हक्काने घेत असे !असो . गीरीजेसाठी त्यांना बोलावणे गरजेचे होते . पण कसे ? याच विचारात मंचकराव अडकले होते .

कसे बरा निरोप पाठवावा भिमाकाकीस ? मोबाईलचा उपयोग नव्हता , काकी कडे मोबाईल नव्हता . इतरांच्या सांगण्यावर ती येणार नव्हती . तार -नाहीतर पत्र ?नकोच दोन्हीचा आजकाल भरोसा नाही .
‘अरेच्या असेच करू ! ‘ आत्ता सुचलेला उपाय खात्रीशीर होता . चार  दिवसात भिमा काकी दत्त म्हणून उभी ठाकणार होती ! सोप्प होत . आज एक तारीख ,आज मंचकरावांची मनी ऑर्डर नाही पोहोंचली तर —— भिमाकाकी नक्कीच धडकणार होती !
000
” मंचक्या SSS ” दारातून पुकार झाला . आलम दुनियेत मंचकरावांना या नावाने हाक मारणारी एकमेव व्यक्ती होती, ती म्हणजे भीमा काकी ! शेवटी ती आलीच होती .
वय वर्ष साठीच्या पुढे कितीही . उंची साधारण पाच फूट ,उंची पेक्षा रुंदी काकणभर ज्यास्तच ! जाड भुवया , मांडी घालून बसल्या सारखे पसरट नाक . थोडक्यात मिश्या लावल्यातर ‘रावण ‘ अन बिन मिशाची ‘पुतना मावशी ‘ म्हणून मद्रासी सिनेमात खपून गेली असती !एकोणीशे सत्तावन्न -आठ्ठावनच गावरान मॉडेल !
“या या काकी घरात या . ” लगबगीने उठून मंचकराव सामोरे गेले .
“मेल्या , पैसे का नाही पाठ्वलेस ?मला यायचा जायचा फुकाचा त्रास झाला ! अन ‘ या घरात ‘ काय ? काही रीत – भात  आहे का नाही ? तुकडा कोण ववाळून टाकणार ? तुझा बाप !”
“अहो , हंडाभर भात ठेवलाय शजवून ! अन ‘तुकडा ‘ काय ,चांगल्या चवडभर पोळ्या केल्यात कि —–!”
तेव्हड्यात घरातून गिरिजाबाई शिळ्या पोळीचा तुकडा आणि हातात पाण्याचा तांब्या घेऊन आल्याचं . त्यांनी काकीच्या पायावर पाणी घातले , पोळीचा तुकडा ओवाळून फेकून दिला .
” आता या घरात .” गिरिजाबाई अदबीने म्हणाल्या .
“हू ! बायकोला कळत हो तुझ्या . पोर गुणांची दिसतीय ! तरी पण मी घरात येणार नाही ! “काकी हटून बसली .
“पण का ? ” मंचकरावांनी बुचकुळ्यात पडून विचारले .
“मंचक्या , रोज पाण्यात भिजवलेले बदाम खात जा ! स्मरण शक्ती वाढेल ! गेल्या खेपेस ‘तुझ्या घराचा उंबरा ओलांडून घरात पुन्हा पाऊल टाकणार नाही ‘असा मी पण केला होता , तो मी कसा मोडणार ?”
“इतकाच ना ! दारातून नका  येवू खिडकीतून या ! ”
“मेल्या तुझ्या घराच्या खिडक्या माझ्या मापाच्या नाहीत ! ” खिडकी कडे पहात भीमा काकी गरजली !
थोडा वेळ विचार करून मंचकराव घरात गेले . त्यांनी  एक भक्कम घन आणला . दोन टोल्यात दाराच्या चौकटीतून उंबरा अलग झाला ! मग विजयी मुद्रेने भीमा काकीनचा गृहप्रवेश झाला !
०००
गिरिजेची सखोल चौकशी ,जेवणे खाणे ,वामकुक्षी आवरल्यावर काकींनी मंचकरावांना बोलाविले .
“मंचक्या , तुझी बायको पोटुशी आहे ! तिला काय काय डोहाळे लागतील माहित नाही . पण ते सगळे डोहाळे पुरवले पाहिजेत ! ”
“काकी ,हे डोहाळे काय भानगड असते अन ते पुरवायचे म्हणजे काय करायचे ?”
” अरे ठोंब्या , पोटातलं पोर आईला काही काही मागत असत . आंबट – चिंबट ,तर कधी चटक -मटक ,खमंग खावं वाटत . कधी मोकळ्या बागेत जावं वाटत ! थोडक्यात तिला म्हणजे गिरिजेला वाटेल ते खाऊ घालावे ,वाटेल ते करू द्यावे ! तिचे सगळे लाड पुरवावेत ! यालाच डोहाळे पुरवणे म्हणतात ! पण तू नको काळजी करुस . आता मी अली आहे ना ! मी गिरिजेस सांगून ठेवले आहे ‘ बाई ,तुला हवे ते मला सांग ,मी घेते मंचक कडून मागून ! ”
“का ? त्यांना आम्हास समक्ष सांगता येईल कि , काकी तुमची मध्यस्थि कशाला ?”
“तुला नाही कळायचं ! काही गोष्टी तुला सांगताना तिला संकोच वाटेल म्हणून माझी मध्यस्थि !”
” पण समजा तुमचे हे डोहाळे नाही पुरवले तर ?”
” माझे नाही ! तुझ्या बायकोचे ! डोहाळे नाही पुरवले तर होणाऱ्या लेकराचे कान फुटतात . ते भैर होत !”
” बापरे !असं असेल तर तुम्ही  म्हणल तसे करू . पण लेकरू माझ्या सारखं धडधाकट आणि गिरिजाबाई  सारखं गोर झालं पाहिजे . ”
” गुटगुटीत लेकरासाठी उद्या पासून तिच्या आहारा कडे मी जातीने लक्ष देणार आहे ! “शेवटी काकींनी निर्णय जाहीर केला .
दुसरे दिवशी पासून एक शेरा ऐवजी दोन शेर दुधाचा रतीब करण्यात आला . ‘ दूध पिल्याने लेकरू दुधासारखे गोरे होते !’ इति काकी . त्याच बरोबर केशर पण आणण्यात आला . ‘ केशराने लेकराचे ओठ आणि गाल गुलाबी होतात ‘ काकी उवाच !नंतर काकीच्या यादी प्रमाणे मंचकरावांनी जो ‘माल ‘ घरात आणून टाकला तो येणे प्रमाणे .
काजू गरे सव्वा शेर , बदाम सव्वाशेर , खारीक सव्वाशेर , म्हशीचे तूप सव्वाशेर , चारोळी गोडंबी सव्वाशेर , मनुका सव्वाशेर ,पिस्ता सव्वाशेर , अक्रोड सव्वाशेर . सुरवातीस यादी वाचून मंचकराव ‘काकी काय सत्यनारायण करणार आहे कि काय ?’ असे पुटपुटले होते .असो एकंदर काकींनी गिरिजेसाठी जी ‘सकस आहार योजना ‘ राबवली होती ती किती भव्य होती ,याची वाचकांना कल्पना  यावी म्हणून हि ‘शॅम्पल ‘यादी दिली आहे . शिवाय मोसमीफळांचा ,आणि वाण सामानाचा बाजार वेगळा होता !
०००
एक दिवस मंचकराव चार सहा उचापती करून घरी परतले . दाराच्या ओट्यावर भीमा काकी ,लुगड्याच्या ओच्यात काही तरी  घेवून खात बसल्या होत्या .
“काय खाताय काकी ?” मंचकरावांनी पुच्छा केली . तेव्हड्यात काकींनी तोंडात म्हणून फेकलेला बदाम पुढे आलेल्या दातावर बाउंस होऊन मंचकराव कडे उडाला ,तो त्यांनी चपळाईने कॅच केला ! त्यामुळे ‘शेंगदाणे खातीयय ‘म्हणण्याचा चान्स हुकला .
” बदाम खातीयय !” नाईलाजाने त्या म्हणाल्या
“खा ,खा . पण तुम्ही हे गिरिजाबाईंसाठी आणवले होते . त्या खातात कि नाही ?”
“कशाची खातेय ? पोटात अन्नाचा कण ठरत नाही ,बिचारीच्या ! जबरदस्त डोहाळे आहेत बाबा ! पण मीच अजून तिला बदाम खायला देत नाही !”
“का ?”
“अरे काही बदाम खऊट असतात ! काही कुजके असतात ! तर काही कडू पण असतात !मग कसे देणार ? त्या साठी आधी मी खाऊन पाहत होते !”
“असे असेल तर मग हरकत नाही . निघाले का काही खऊट , कडू बदाम ?”
” नाही ! एकही नाही ! सगळे चांगलेच होते ! अजून आणून ठेव , आता सगळेच संपले आहेत !”काकी पदर आणि साडी झटकत घरात निघून गेल्या .
बाकी काकी दूध पिल्याने ‘रंग दुधासारखा गोरा होतो ‘ म्हणतेते खरेच असावे . कारण  काकींचा रंग उजळ होता !
०००
संध्याकाळी मंचकराव बाहेर अंगणात वारवाशी बसले होते . तेव्हड्यात इकडे तिकडे पाहत काकी त्यांच्या पाशी आल्या .
“मंचक्या , जरा कान इकडे कर ! “आणि त्या मंचकरावच्या कानात काहीतरी कुजबुजला .
” काय , बिडीचा कट्टा ?”बिडीचा चटका बसल्यागत मंचकराव बसल्या जागी उडाले .
“मेल्या ,ओरडू नकोस ! कोणीतरी तुझा पूर्वज पोटी येणार असे दिसतंय ! सकाळी गिरीजा ‘बिडी ओढावी वाटतेय !’ म्हणत होती !”
” अहो ,पण गर्भार पणात धूम्रपान म्हणजे —-”
” अरे डोहाळेच ते , त्याला इलाज नसतो !
” तरी —”
” कान फुटेल लेकरांचा ! ”
” ठीक ,देईन उद्या आणून . ”
” उद्या नको ! ‘तात्काळ ‘ मध्ये आत्ताच घेऊन ये ! ”
मंचकरावानी उंची फिल्टर असलेले सिगारेटचे पाकीट आणून काकींच्या हातावर ठेवले . काकींना चेहऱ्यावरचा आनंद लपवता आला नाही .
रात्री जेवणे झाल्यावरमागल्या अंगणातील तुळशी वृंदावनाच्या दिव्यावर धूम्रकण्डिका चेतवून भीमा काकींनी धूम्रपानाचा यथेच्छ आनंद घेतला . तुळशीवृंदावन या आनंदास केवळ साक्षीचा नव्हते तर ते भीमा काकीच्या पाठीशी होते . त्यालाच तर त्या टेकून बसल्या होत्या !
००००
” काकी , तुमचे गिरिजे कडे लक्ष आहे ना ? काल त्या ‘नीट झोप लागत नाही ‘अशी तक्रार करत होत्या . ” मंचकरावांनी काळजीच्या सुरत विचारले .
” आहे तर ! मला पण म्हणाली होती ! पण मेल्या तू कशाला तिला विचारायला गेलास ? गिरिजे पासून जरा लांबच रहात जा ! ”
“त्या मला चहा देताना सहजच —”
“कामाच्या रगाड्यात मी विसरले . तुला ते झोपीच सांगणारच होते ! कर कान इकडं !”
“एक ‘ चपटी ‘ ठेव देऊन माझ्या जवळ ! झोपताना चार चमचे देते ! मग बघ कशी म्हशी सारखी झोप लागेल गिरिजेला !अन हो, चांगली इंग्रजी आण , गावठी नको ! ”
मंचकरावांनी या कामात अनोखी चपळाई दाखवली होती . एक ‘ तुकडा ‘ त्यांनी स्वतः साठी पण गुपचूप फडताळात आणून ठेवला .
तेव्हा पासून शांत म्हशी सारखी  झोप लागत होती ! अर्थात मंचकरावाना आणि भिमाकाकीला !

००००
आज गीरीजेच्या  ‘डोहाळ्या ‘ प्रित्यार्थ भीमा काकीनी ‘सामिष ‘ भोजनाचा घाट घातला होता . सर्वत्र मटणाचा नुसता घमघमाट सुटला होता . पण गिरीजा मंचक्या आसपास घुटमळत असल्याचे भीमा काकीच्या नजरेतून सुटले नव्हते . शेवटी त्यांनी गिरिजेस टोकालेच .
” का ग गिरीजे ? काय पाहिजे ?”
” काही नाही . मला न सकाळ पासून —–”
“सांगा , सांगा गिरिजाबाई तुम्हास सकाळ पसन काय वाटतय ?”मंचकरावानी पण आग्रहाने विचारले .
“मला न — घोडीवर बसून वरात —-”
“बापरे , हे कसले डोहाळे ? —“मंचकराव अडखळत म्हणाले . लेकराचे पाय पाळण्यात दिसतात हे त्यांना एकून माहित होते . पण या लेकराचे पाय आईच्या पोटातूनच दिसायला लागले होते !
भीमा काकी चटकन भानावर अली .
“चल मंचक्या  ,मेल्या तूच हो आता ‘घोडा ‘ ! ”
” अहो काकी —-“मंचकराव का ,कु  करू लागले . पण भीमाकाकी खमकी होती . तिने जवळच्या  खुंटी वरचा चाबूक काढून गिरिजेच्या हाती दिला !
“मंचक्या , हो चटकन ‘घोडा ‘ नाहीतर लेकरू भैर होईल ! ”
नाईलाजाने मंचकराव ओणवे झाले .
” मला ‘घोडा ‘ नको ‘ घोडी ‘ हवी !  अन वरात पण ! “गिरिजाबाई कुजबुजल्या . भीमा काकी आणि मंचकराव गिरिजाबाईच्या तोंडाकडे पहातच  राहिले !
“काकी ,आता हो काय करायचे ? मी तुम्हास हतजोडून विनंती करतो , थोडा वेळासाठी तुम्हीच व्हा ना ‘ घोडी ‘ ! नाही म्हणू नका ! लेकराचे कान फुटतील ! ”
भीमा काकीची दातखीळ बसली होती !
शेवटी हो ना करता काकी ‘ घोडी ‘ झाली . मंचकरावानी पळी ने ताम्हण वाजवून वरतीचा बँड केला . गिरिजेने ‘ घोडी ‘ घरभर फिरवली . अधनमधन चाबूक पण वाजवला !
०००
कमरेला पट्टा बांधून खारवलेल्या शेंगदाण्याचा एक एक दाणा तोंडात फेकत , भीमा काकी एस टी च्या खिडकीत बसली होती . गीरीजेन चांगलच कंबरड  मोडल होत ! तळपट येवो तिला अन त्या मचक्याला ! कंडक्टरने डबल बेल दिली , तसे ते उन्हात तापलेलं लाल धूड थरथरू लागल . गाडी निघण्याच्या बेतात होती .
“काकी , अहो तुमच हे गठुड घरीच विसर होत . “मंचकरावांनी ते गाठूड खिडकीतून काकीला दिल आणि गाडी निघाली .
सगळ समान तर घेतल होत . मग हे गाठूड कसल ? काकीला धीर निघेना ,त्यांनी ते सोडून पाहिलं . एका डब्ब्यात सुक्या मेव्याचा चार सहा पुरचुंड्या होत्या ! त्याच्या वर एक सिगारेटच पाकीट , अन एक बिडीचा कट्टा !बुडाला काही तरी जड लागत होत , काकीनी चापचून पहिले तर ‘ चापटी ‘ बाटली ! सगळ्यात वर एक कागदच चीटूर ! काकीनी  ते उघडल .
‘ काकी , बारश्याला या ! गावाकडे मिळत नाही म्हणून तुमच्या ‘ डोहाळ्यांची ‘ अल्प सोया करीत आहोत ! ता. क. — आता उंबरठ्याची  अडचण नाही .  घराचा उंबरा काढून ठेवलेलाच आहे . तुम्ही आल्यानन्तर बसवेन ! ‘
भीमा काकींनी डबडबलेल्या नजरेने  खिडकीतून मागे वळून पहिले . धुळीच्या लोटातून दूरवर हात हलवणाऱ्या ‘ मंचक्या ‘ची अंधुक आकृती दिसत होती !

इति चतुर्थ अध्याय ऑफ ‘मंचक माहात्म्य ‘ END -M !

— सु र कुलकर्णी.

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..