भाऊच्या धक्क्यावरुन रेवसला जाणाऱ्या लाँच मध्ये बसल्यावर झुक झुक झुक झुक अगीनगाडी धुरांच्या रेघा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया… याऐवजी झुळ झुळ लाटांचा आवाज ऐकूया समुद्राच्या पाण्यावर हेलकावूया गार गार खारा वारा खाऊया बोटीने मामाच्या गावाला जाऊ या. अशी अवस्था माझ्या बालमनाची होत असे.
मला आठवते तेव्हापासून आई बाबा आणि माझा भाऊ आम्ही चौघे डॉक यार्ड रोड स्टेशन वर उतरून तिथून पन्नास नंबर च्या डबल डेकर बस ने भाऊच्या धक्क्यावर पोहचायचो. बस तशी रिकामीच असायची पाच मिनिटांच्या प्रवासातही बस च्या वरच्या मजल्यावर जाऊन सगळ्यात पुढल्या सीटवर बसून खिडकी बाहेर डोकं काढायचो. आता बऱ्याच नवीन फोर व्हीलरच्या सन रूफ बाहेर डोकं काढून मजा बघणाऱ्या लहान मोठ्या मुलांना बघुन तीस वर्षांपूर्वी सन रुफ सिस्टीम नसलेल्या त्या काळात आम्ही डबल डेकर बस मध्ये अनुभवलेल्या सुखाची सर हल्लीच्या पिढीला येत असेल का असा प्रश्न पडतो.
डॉकयार्ड रोड स्टेशन वरुन बस निघाली की काही अंतर गेल्यावर भाऊच्या धक्क्यावरील मासळीचा वास यायला लागायचा. रस्त्यांवर मासळी नेणारे ट्रक आणि हातगाड्या दिसायच्या त्यात मोठ मोठ्या वेताच्या पाट्यांमध्ये बर्फात असलेली मासळी, त्यांचे गळणारे पाणी आणि ओलेचिंब झालेले रस्ते आणि त्याचाच सगळीकडे येणारा भपकेदर उग्र वास. परंतु त्या वासाने कधी नाक दाबावे किंवा नाकावर रुमाल धरावा असे वाटले नाही. रेवस ला उतरुन गर्दीने खचाखच भरणाऱ्या रेवस अलिबाग बस मध्ये कसेबसे चढायला मिळायचे पण मांडव्याला पोचायची ओढच अशी असायची की त्यापुढे प्रवास कसा होतोय याबद्दल कुठलीही तक्रार नसायची.
ऐंशीचे दशक संपून नव्वद चे सुरू झाले होते. आमचे रम्य बालपण आमच्या मामाच्या मांडवा या सुंदर गावात सुट्ट्यांमध्ये नाना नानींच्या सान्नीध्यात समृध्द होत होते. नव्वद च्या दशकाच्या सुरवातीलाच महानायक अमिताभ बच्चनच्या अग्निपथ सिनेमातील इन्स्पेक्टर असलेल्या विक्रम गोखले यांना उद्देशून विजय दीनानाथ चौहान, पुरा नाम,बाप का नाम दीनानाथ चौहान, मां का नाम सुहासिनी चौहान, गांव मांडवा, उम्र छत्तीस साल नौ महिना आठ दीन आणि मागे घड्याळात बघून सोल्हवा घंटा चल रहा हैं हा डायलॉग खुप फेमस झाला.
आम्हाला असं वाटायला लागले की मांडवा हे नाव तेव्हापासून जास्त चर्चेत यायला लागले. त्यानंतर अलिबाग से आया क्या या कुत्सित डायलॉग पासुन ते हो मी अलिबागहून आलोय हे स्वाभिमानी उत्तर मिळायला लागल्यावर मांडवा आणि अलिबाग पर्यटन स्थळ म्हणुन आज मुंबई आणि पुणेकरांसह संपूर्ण देशात नावारुपाला येत आहे.
नव्वद चे दशक संपता संपता मांडवा जेट्टी वरुन सुमन मॉटेल्स या कंपनी कडून एसी कॅटेमरान सर्व्हिस सुरू झाली, त्या कंपनीच्या बस अलिबाग हून मांडवा जेट्टी पर्यंत यायच्या परंतु त्यांचे तिकीट खुप महाग असल्याने थोड्याच काळात ती सर्व्हिस बंद पडली. त्यानंतर अजंता सहकारी संस्थे सोबत अलिबागला पाल सिंग नावाचे सरदारजी होते त्यांनी निळया रंगांच्या बसची अलिबाग ते मांडवा जेट्टि ट्रान्सपोर्ट सर्व्हिस सुरू करून पुढे मांडवा जेट्टी ते गेट वे लाँच अशी तीस रुपयात अलिबाग ते गेट वे ऑफ इंडिया अशी अजंता लाँच सर्व्हिस सुरू केली.
त्यानंतर मालदार आणि पी एन पी अशा एसी आणि पाऊण तासात गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी जाणाऱ्या कॅटेमरान सुरू केल्या गेल्या. पावसाळ्यातील तीन महिने सोडले तर सकाळी सहा पासून रात्री साडे आठ पर्यंत आता लाँच आणि बोटीच्या फेऱ्या सुरू असतात. तीन वर्षांपूर्वी एम टी एम कंपनी कडून भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी अशी रो रो सर्व्हिस सुरू झाली ज्यामधे शेकडो कार आणि हजारो प्रवासी एका वेळी एका फेरीत इकडून तिकडे जात असतात.
रेवस धक्क्यावरून भाऊच्या धक्क्यावर अजूनही लाँच सर्व्हिस सुरू आहे पण गेल्या पंचवीस वर्षांत तीस रुपयांपासून सुरू झालेल्या अलिबाग मांडवा गेट वे ऑफ इंडिया या लाँच सर्व्हिस आता कमीत कमी दीडशे रुपयांपासून अडीचशे रुपयांपर्यंत गेल्या आहेत.
खरं म्हणजे आताचे मांडवा बंदर किंवा मांडवा जेट्टी ही पूर्वी आर सी एफ च्या खत कारखान्यासाठी उभारली गेली होती. कारखान्याला लागणारी मशीनरी साहित्य, कामगार आणि अधिकाऱ्यांची मुंबई हुन ने आण करण्यासाठी. कारखाना उभारला गेला आणि मांडवा जेट्टी कित्येक वर्ष वापराविना बंद पडून राहिली. शेकापच्या अलिबागच्या तत्कालीन आमदार आणि मत्स्यव्यवसाय व औकाफ मंत्री असलेल्या मिनाक्षीताई पाटील यांनी पुढाकार घेतला आणि आर सी एफ ने बांधलेली मांडवा जेट्टी जीर्ण होऊन पडण्या पुर्वी आता अस्तित्वात असलेली नवीन जेट्टी उभी राहिली.
फार पुर्वी ब्रिटिशांच्या काळात मांडवा हे अत्यंत महत्वाचे बंदर होते. ब्रिटिशांनी मांडवा जवळील रहाटले आणि कोळगाव या गावांतील टेकडीवर दीपस्तंभ उभारला होता जो अजूनही दिमाखात उभा आहे. आजही हा दीपस्तंभ मांडव्याची चिमणी म्हणून ओळखला जातो.
मांडवा जेट्टीच्या पूर्वेला दगडाचे बांधकाम असलेला एक लहान धक्का दिसतो ज्यावरून पूर्वी म्हणजे साधारण साठ च्या दशका पर्यंत संपूर्ण मुरुड, अलिबाग तालुका मुंबईशी समुद्रमार्गे जोडला गेलेला होता, कोकणातील व्यापार धरमतरचा पुल होईपर्यंत याच मांडवा बंदरातून मुंबईशी होत होता.
पुर्वी शिडाच्या होड्या आणि मचवे असायचे नंतर मोटार लाँच आल्या पण धरमतरचा पुल झाला, रेवस बंदर झाले आणि मांडवा बंदरातून होणारी जलवाहतूक बंद पडत गेली. नव्वद चे दशक संपता संपता सुमन मॉटेल्स या कंपनीने सुरुवात केल्यावर अजंता पी एन पी आणि मालदार या कंपन्यांनी मांडवा या ऐतिहासिक बंदराला पुन्हा एकदा नावारूपाला आणले. मांडवा बंदर हे आता निसर्गरम्य अलिबागचे प्रवेशद्वार झाले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
अलिबाग तालुक्याचे सौंदर्य मांडवा बंदरात उतरल्यावर कोणालाही जाणवल्याशिवाय राहणार नाही. स्वच्छ समुद्रकिनारा आणि या समुद्रात स्थानिक कोळ्यांच्या रंगीबेरंगी लहान मोठया होड्या. समुद्रात नाक खुपसणारी टेकडी आणि बंदरापासून थोड्याच अंतरावर वादळ वारा आणि लाटांचा मारा खाऊनही घट्ट पाय रोवून असणारा निश्चल असा काशाचा खडक. लांबून काशाचा खडक हा पांढरा वाटतो पण माझ्या भाऊ मामाने एकदा या खडकावर जाऊन जेवणाचा बेत बनवला होता, तिथेच जाऊन खेकडे पकडायचे आणि तिथेच शिजवून खायचे. तिथं मी पहिल्यांदा गेलो होतो पण समुद्रातील सी गल पक्षांनी केलेली विष्ठा यामुळे तो खडक पांढरा दिसतो आणि त्या विष्ठेचा घाण वास हे वास्तव समजल्यावर तिथं पुन्हा जाण्याचे नांव काढणार नाही हा निश्चय त्या पहिल्याच भेटीत केला.
मांडवा येथील समुद्र पोहण्यासाठी किंवा खेळण्यासाठी खुप सुरक्षित आहे. इथे अपघात झाल्याचे आजवर कधी पाहिले किंवा ऐकले नाही. शाळेत असताना आम्ही समुद्रावर क्रिकेट खेळणे, वाळूत किल्ले बनवणे, भुयार बनवून भरती येऊन त्या किल्ल्यांवर आणि भुयारात पाणी जाऊन विरघळताना बघितले आहे. मांडव्याच्या टेकड्या चढणे, चिमणी वर चढणे, आंब्याच्या आणि वडाच्या झाडांवर सुरपारंब्या खेळणे असे सगळे खेळ खेळलो आहोत. भरतीला पोहणे, चांदण्या रात्रीत मध्यरात्री समुद्राची गाज ऐकत आकाशातील ग्रह तारे बघत बसणे. पावसाळयात खवळेल्या आणि उसळणाऱ्या फेसाळ लाटा ते तलावासारखा शांत समुद्र अनुभवला आहे.
पावसाळ्यातील चार महिने तर मांडवा असं काही बहरून जातं की शब्दांत वर्णन करता येत नाही. गेल्या काही वर्षांत इथल्या टेकड्यांवर मोठया प्रमाणात झाडांची लागवड केली गेलीय त्यामुळे पावसाळ्यात मांडवा परिसर अत्यंत हिरवा गर्द होउन जातो. संध्याकाळी मांडव्याच्या ब्रिटिशकालीन धक्क्यावर बसून चिमणी कडे बघितले असता चिमणीला असणाऱ्या झरोके समोरा समोर येऊन पलीकडील सूर्यप्रकाश दिसत होता. चिमणी असलेल्या टेकडीच्या पलीकडे तांबडा झालेला सुर्य अस्ताला जातान दिसतो. पण मांडवा जेट्टीच्या पश्चिमेपलीकडील किनाऱ्यावरून अस्ताला जाणारा सुर्य समुद्रात गडप होताना वर आकाशात तांबड्या रंगांच्या अनेक छटा पसरवताना आणि समुद्रात हेलकवणाऱ्या सोनेरी लाटा किनाऱ्याकडे वळताना बघून रोज रोज पुन्हा पुन्हा संध्याकाळी किनाऱ्याकडे पाय ओढले जातात.
मांडवा केवळ निसर्गरम्य अलिबागचेच नाही तर पुन्हा एकदा कोकणचे प्रवेशद्वार ठरत आहे आणि सगळ्यांना अभिमानाने सांगत आहे येवा कोकण आपलेच असा.
फोटो कर्टसी – प्रणित माने ( मांडवा)
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
कोन, भिवंडी, ठाणे.
140923
काहीशा अपरिचित आणि अनभिज्ञ अशा रोमांचक आणि आव्हानात्मक मर्चंट नेव्ही या करिअर संदर्भातील प्रकाशित माझी पुस्तकं,
सृजन संवाद प्रकाशन, ठाणे,
(महाराष्ट्र बुक सेंटर,डोंगरे हॉल, अलिबाग येथे आणि अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर उपलब्ध)
१) “द फ्लोटिंग लाईफ इन मर्चंट नेव्ही ”
( मराठी वाड्मय परिषदेचा अखिल भारतीय अभिरुची गौरव आणि सारांश राज्य स्तरीय पुरस्कारप्राप्त)
२) “सातासमुद्रापार ”
( वा. अ. रेगे पुरस्कार आणि सारांश राज्य स्तरीय पुरस्कारप्राप्त)
संपर्क: 8928050265
Leave a Reply