नवीन लेखन...

मंदिरप्रवेश-लढा आणि स्त्री-पुरुष-समानता

एप्रिल १७, २०१६ च्या लोकसत्ता-लोकरंग मधील मंगला आठलेकर यांचा ‘याला धर्मसुधारणा म्हणता येईल काय ?’ हा स्त्रियांच्या मंदिर-प्रवेशासंबंधीचा लेख वाचला ; व ८ मे, २०१६ च्या लोकरंगमधल्या. त्या लेखावरील प्रतिक्रियाही वाचल्या. आठलेकरांचा लेख उत्तम आहे. मात्र, आठलेकरांचा लेखातील कांहीं विचार वाचून सखेद आश्चर्य वाटलें. तेंच प्रतिक्रियांचेंही. या विषयावर अधिक-खोलवर विचार व्हायला हवा होता, असें मला वाटतें.

आठलेकरांच्या कांहीं वाक्यांना (statements) दुजोरा द्यायलाच हवा. उदा. ‘स्त्रीची दुय्यमता या धर्मशास्त्रांनी वारंवार अधोरेखित केली’ ; ‘लिंगभेदावर आधारित असलेल्या व्यवस्थेला निग्रहानें नकार दिलाच पाहिजे’. अशा स्टेटमेंट्स बद्दल त्यांच्याशी मतभेद असण्याचें कारणच नाहीं. प्रश्न आहे तो, त्यांनी मंदिरप्रवेशाच्या बाबीचा जो अर्थ लावला आहे, त्याबद्दल. मात्र, कांहीं मतभेद असले तरी, मी त्यांना ‘पुरुषधार्जिणी’ असें अभिधान देणार नाहीं.

पुढे जाण्यापूर्वी मी हें स्पष्ट करूं इच्छितो की, मी कर्मकांड मानीत नाहीं, तसेच मी निधर्मी व बेसिकली निरीश्वरवादी आहे, आणि मी स्त्री-पुरुष समानता मानतो. हें स्पष्ट करायचें कारण म्हणजे, मला देव-धर्म-पुजारी वगैरेंची बाजू मांडायची नाहीं , किंवा पुरोगामी-प्रतिगामी या वादातही शिरायचें नाहीं. थोडक्यात म्हणजे, ‘आय् हॅव नो पर्सनल ऍक्स टु ग्राइंड’ . तसेच, हेंही स्पष्ट करायला हवें की, आठलेकर यांनी उल्लेखलेल्या तृप्ती देसाई व केवडकर यांच्याविषयी, त्यांच्या विविध विषयांवरील मतांविषयी, आणि त्यांच्या आपसातील-संबंधांविषयी मला कांहींही माहिती नाहीं. त्याचप्रमाणें, इलेक्ट्रॉनिक मीडियांसंबंधी कांहींही मतप्रदर्शन मला करायचें नाहीं. अशा गोष्टींमध्ये शिरल्यास, मूळ मुद्दा बाजूलाच पडेल. त्यामुळे त्या सगळ्यात न शिरतां, मी सरळ, आणि केवळ, मूलभूत मुद्यालाच स्पर्श करत आहे.

आपण हें ध्यानात ठेवायला हवें की, शनि-शिंगणायुर हें फक्त, एक ‘पूजास्थळ’ आहे ; पण तिथें आहे तशीच स्थिती त्र्यंबकेश्वर, साबरीमाला , हाजी अली वगैरे अनेक ठिकाणीही होती व आहे. अहो, हिंदूधर्मात, एखादी पूजा जर जोडप्यानें करायची असेल, व पत्नी तिथें नसेल, तर पती तिच्या स्थानीं ‘सुपारी’ किंवा अन्य कांहींतरी ठेवून पूजा करूं शकतो (जसें, उत्तररामचरित्रात, रामानें , सीतेची मूर्ती ठेवून केलेलें आहे) . पण हा,अधिकार स्त्रीला नाहीं. मुस्लिमांमध्ये, पुरुष तीनदा ‘तलाक’ असें म्हणून ( हल्ली तर ई-मेल पाठवूनही) पत्नीला डायव्होर्स देऊं शकतो, पण अर्थातच, हा हक्क पत्नीला उपलब्ध नाहीं. खरें तर, स्त्रियांना मंदिर-प्रवेशाचा अधिकार मिळण्याचा मूळ प्रश्न, धर्माशी संबंधित नसून स्री-पुरुष-समानतेशी निगडित आहे. मंदिरात किंवा त्याच्या गर्भागारात प्रवेश मिळण्यासाठी लढणें, किंवा हाजी-अली दर्ग्यात प्रवेशासाठी झगडणें, म्हणजे स्त्री-पुरुष-समानतेसाठी झगडणें . मान्य आहे, अशा अनेक बाबी आहेत, जिथें समानतेसाठी लढा द्यायला हवा . तसा, अनेक-अंगीं, अनेक-पदरी लढा चालूच आहे, असें मला वाटतें. एके काळी, ‘तथाकथित- प्रगत’, अशा पाश्चिमात्य राष्ट्रांमध्येसुद्धां महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यासाठी महिलांना लढा द्यावाच लागला. १९३० च्या सुमारास त्यांना तो हक्क प्राप्त झाला. महाराष्ट्रात, स्त्री-शिक्षणासाठी महात्मा फुले, महर्षि कर्वे यांना लढा द्यावा लागला. हल्लीहल्लीच, टेनिसच्या क्षेत्रात, ग्रँड-स्लॅम स्पर्धांमध्ये स्त्रियांना मिळणारी बक्षिसाची रक्कन ही पुरुषांएवढी असायला हवी, या समानतेसाठी, मार्टिना नव्हरातिलोव्हानें लावून धरलें. हाही स्त्री-पुरुष-समानतेच्या लढ्याचाच एक भाग आहे. तसेंच, मंदिरप्रवेश हाही या समानतेच्या लढ्याचा एक भागच आहे. आणि, आपण तसेंच त्याच्याकडे पहायला हवें.

मंदिरप्रवेशासाठी लढणें या गोष्टीचा, ‘देव मानणें’ किंवा ‘धर्म मानणे’ आवश्यक आहे , असें नाहीं. साने गुरुजी हे समाजवादी होते. ही सर्व मंडळी निरीश्वरवादी, निधर्मी असतात. तरीही, साने गुरुजींनी १९४८-१९४९ च्या सुमारास, पंढरपुरच्या विठ्ठल-मंदिरात हरिजनांना (दलितांना) प्रवेश मिळावा म्हणुन लडा दिला, प्राणांतिक उपोषणही केलें. स्पष्ट आहे की, त्यांचा हा लढा सामाजिक-असमानतेशी निगडित होता. आठलेकर यांच्या, ‘हा हक्क नव्हता म्हणून स्त्रिया आयुष्यातल्या कोणत्या मोठ्या संधीपासून वंचित राहिल्या आहेत?’ ; ‘गाभार्‍यात प्रवेश हवा या मागणीत कोणती धर्मसुधारणा आहे?’ , या स्टेटमेंटस् ‘मिसप्लेस्ड’ आहेत, हें साने गुरुजींच्या उदाहरणावरून स्पष्ट आहे. त्यावर अधिक टिप्पणी करायची आवश्यकता नाहीं.

वैदिक काळात स्त्रियांना यज्ञ करण्याचाही अधिकार होता. त्या काळानंतर, शतकानुशतकें स्त्री पुरुषांमध्ये असमानताच होती, व तें अयोग्यच आहे. मध्य-युगात तर ती दरी भयानकच होती. पण १९ व्या – २०व्या शतकात स्त्री-पुरुष-समानतेच्या हक्कासाठी लढाईची ठिणगी पडली, आणि ती आतां, भिन्नभिन्न ठिकाणीं, विविध प्रश्नांच्या माध्यमांमधून, अनेक अंगांनी, प्रस्फुटित होत आहे ; मग तो लढा मंदिरप्रवेशाचा असो, लोकसभेत किती टक्के जागा स्त्रियांसाठी रिझर्व असाव्यात हा असो, मुलींच्या शिक्षणाचा असो, स्त्री-भ्रूणहत्येचा असो, सुनांवर अत्याचाराचा व सुनांना जाळण्याचा असो, ‘खटना’ ( female circumcision) चा असो, ‘Right to Pee’ चा असो, विनयभंगाचा असो, ‘मॅरिटल रेऽप’ चा असो, तलाकचा असो, पोटगीचा असो, हँडिकॅप्ड व चॅलेंज्ड स्त्रियांच्या संरक्षणाचा असो, किंवा अन्य कांहीं असो. प्रत्येक मुद्दयावर लढा हा व्हायलाच हवा, आणि सुजाण नागरिकांनी त्याला पाठिंबा द्यायलाच हवा. समाजात दुसरे अनेक प्रॉबलेम्स आहेत, म्हणून एखाद्या मुद्दयवर लढा द्यायचा नाहीं, असें शक्य आहे काय ? साने गुरूजींना नक्कीच माहीत होते की विठ्ठल-मंदिरात प्रवेशासाठी लढा देऊन दलितांचे आर्थिक प्रश्न कांहीं संपणार नव्हते. पण, जिथे-जिथें असमानता आहे, तिथें-तिथें लढा द्यायला हवा, या भावनेनेंच त्यांनी विठ्ठलमंदिराचा लढा दिला. ते तो लढा जिंकले ; स्त्रियाही पूजास्थळांचे कांहीं लढे जिंकत आहेत, कांहीं नाही. पण, असेंच असतें. कांहीं कांहीं लढे जिंकले जातात, कांहीं हरले जातात ( उदा. १८५७ चें स्वतंत्र्ययुद्ध). पण ठिणगी पडली की, तिच्या शॉर्ट-टर्म परिणामांबरोबरच, दूरगामी परिणामही असतात, आणि त्यांचाही विचार व्हायला हवा. तरच अशा लढ्यांचें महत्व अधोरेखित होईल. साथ देतां आली तर उत्तमच ; पण तें जमत नसल्यास, किमान, ‘आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ इतपत तरी सपोर्ट करायला हरकत नसावी.

– सुभाष स. नाईक
सांताक्रूझ, मुंबई
M- 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..