नवीन लेखन...

मंगळ – एक लघुकथा

नाना हे गावातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व. नानांच्या नावातच दोनदा ‘ना’ असल्यामुळे त्यानी कधी कोणाला नंतर ना म्हटलेच नाही. नानांच वय साधारण 60 वर्षे पण नाना आजही 10 वर्ष वयाच्या बालकांपासुन तर मरणासक्त झालेल्या म्हाताऱ्यां पर्यंत उत्तम पध्दतीने जुळवून घेतात ते नानांच मोठ कौशल्यच म्हणाव लागेल. गावाच्या सातशे आठशे उंबरठ्यांमध्ये नानांची परिस्थीती सर्वात चांगली. मस्त टुमदार घर, घराशेजारी छानशी परसबाग, उत्तम बारमाही शेती, गाडी वगैरे सर्वच नानांकडे कडे उपलब्ध. नानांचा स्वभावही अध्यात्मिक, सहकार्यात्मक असल्यामुळे गावात कोणाला काहीही अडचन आली तरी सर्वात पहीले ती अडचन नाना स्वतःहून सोडवायला तयार असतात आणि अशा स्वभावामुळे नानांचा शब्द गावात प्रमाणच म्हणावा लागेल. नानांना अध्यात्माची खुप आवड .आपले संपुर्ण आयुष्य अध्यात्मात गेल्यामुळे नानांच हृदय ही भक्तीने तुडुंब भरलेले असे. कोणतीही गोष्ट करायची म्हणजे पहीले ती योग्य का अयोग्य, ती कधी करावी, तीचा योग्य मुहुर्त कोणता, कशा पध्दतीने करायची असा सर्व व्यवस्थित पंचांग ब्राह्मणांकडुन काढल्याशिवाय नानांनी उभ्या आयुष्यात काहीच केले नाही.
नानांचा एकुलता एक मुलगा , वसंता. तसे पाहिले तर वसंताही नानांसारखाच सत्वशील, अध्यात्मिक, बलदंड देह, बघताच क्षणी कोणाच्याही पटकन नजरेत भरेल असा देखणा,उंच, गोरापान तरूण. वसंता आता उपवर झाल्यामुळे नानांना त्याच्या लग्नाची काळजी वाटायला लागली, आणि साहजिक आहे घरात उपवर मुलगी किंवा मुलगा असला तर पित्याला काय काळजी असते ती वेगळी सांगायला नको. ऐन तारुण्यात आल्यावर त्यांना सांभाळन खुप कठीण काम असत हे नानांना चांगल माहीत होत. म्हणुन नानांनी पुढच्या वर्षी वसंताच दोन चे चार हात करून टाकायचे असा मनोमनी विचार केला होता.

बोलता बोलता वर्ष निघुन गेलं, वसंताच्या लग्नाची चर्चा घरात सुरू झाली व त्यादृष्टीने वसंताच लग्न करून टाकायच अस पक्क नियोजन नानांनी लावल. परिसरातील सर्व आप्तेष्टांना नानांनी निरोप दिला. आपल्या कुटुंबाला साजेशी, वसंताला अनुरूप अशी मुलगी शोधण्यासाठी योग्य असा संपर्क सुरू केला. ग्रामीण भाग असल्यामुळे आणि नानांचा स्वभाव खुप चांगला असल्यामुळे सर्व गावकऱ्यांनाच वसंताच्या लग्नाची आतुरता होती. तत्पूर्वी नानांनी वसंता ची कुंडली आपल्या नेहमीच्या ब्राम्हणाकडुन काढुन घ्यायचे ठरवले व दुस-या दिवशी सकाळी सकाळीच ब्राम्हणाला नानांनी घरी बोलावून घेतले. ब्राम्हणाच यथायोग्य आदरातिथ्य करुन झाल्यावर नानांनी वसंताची जन्म तारीख व वेळ ब्राम्हणाला दिली. त्यानुसार ब्राह्मण गुरूजींनी कुंडली काढली व म्हणाले, “नानाजी , वसंताला तीव्र मंगळ आहे , त्यामुळे वसंताच लग्न हे तीव्र मंगळ असलेल्या मुलीशीच व्हावे नाहीतर आपल्या कुटुंबावर अरिष्ट ओढवेल. आपण जर तीव्र मंगळ असलेल्या मुलीशी वसंताच लग्न केल तरच ते टिकेल अन्यथा नेहमी आपल्या कुटुंबात वाद विवाद असतील, आपल्या कुटंबाची जी भरभराट आणि नाव लौकिक आहे तो लयास जाईल व लग्नाचाही घटस्फोट होईल.” हे सर्व ऐकुन नाना अचंबिततच झाले. नानांना काही सुचतच नव्हते, अशी कुंडली कशी येऊ शकते माझ्या वसंताची त्या विचारातच नाना अर्धे झाले, नाना पहील्या पासुन अध्यात्मिक आणि या सर्व गोष्टींकडे खुप विश्वासाने पाहत असल्यामुळे त्यांनी ह्या सर्व बाबी खुप गांभिर्याने घेतल्या. आजही वसंताला खुप स्थळ येत होती, मुलीकडचे अश्या सर्व बाबी असतांनाही वसंताला मुलगी द्यायला तयार होते .कारण नानांच्या कुटुंबाचा परीसरात तेवढा नाव लौकिक होता. परिस्थीती चांगली होती ,वसंताही सुशील व देखना तरूण होता. पण नानांना हे सर्व मान्य नव्हते. माझ्या वसंताला मुलगी करू तर मंगळ कुंडली असणारीच असा अट्टाहासच धरला.

ब्राम्हणाने काढलेली वसंताची कुंडली नानांनी खुप गांभीर्यपूर्वक घेतली होती. त्यादृष्टीने त्यांनी आपल्या वसंता साठी मुलगी शोधायला सुरूवात केली. नानांकडे पैशांची रेलचेल होतीच, म्हणुन नानांनी उभा महाराष्ट्र पालथा घातला पण वसंताच्या कुंडली ला कुंडली जुळेल अशी मुलगी काही नानांना मिळत नव्हती. सहाजिकच आहे कारण मंगळ कुंडली असणारे किती तरी जनांचे लग्न ही होत नाही हल्ली समाजात. कुंडली पाहीली आणि थोडाफार सौम्य मंगळ असला तरी लोक नाही म्हणतात. मंगळ वाल्यांना मंगळीकच मुलगी करावी लागते, असा प्रवाहच झाला आहे. नांनाना आपल्या समाजातील चांगले बुध्दीवादी लोक सांगत होते की, “नानासाहेब कुंडली वगैरे असे काहीही नसतं हो, तुम्ही कितीही शोधा पण जे प्रारब्धात असेल तेच घडेल, आणि शिवाय मुलगी वाले मुलगी द्यायला तयार आहेत तर मग तुम्हाला काय अडचन.” पण नानांच्या सनातनी डोक्यात पंचांग खुप ठेचुन ठेचुन भरले होते, त्यामुळे ते कुणाचे ऐकुण घेत नव्हते. माझ्या वसंताला बायको करेल तर त्याच्या कुंडलीशी जुडणारीच, म्हणजे मंगळीकच असा नानांनी पक्का चंग बांधला होता. नानांच्या अट्टहासामुळे बघता बघता दोन- तीन वर्षे मुली पाहण्यात निघुन गेली. आता नाना ही खुप निराश झाले होते. कारण ज्या घरात उपवर मुलगा किंवा मुलगी असते आणि त्यांचे लग्न होत नसेल त्या कुटुंबाची मानसिकता काय असते हे त्यांनाच माहीत असते. रात्ररात्र पालकांना झोप लागत नाही, त्यांची खुप तगमग होत असते. सुरूवातीला खुप मोठे अपेक्षांचे ओझे घेऊन जाणारे पालक नंतर कोणाशीही मुलाच किंवा मुलीच लग्न लावुन देण्यास तयार होतात. तशी परिस्थिती नानांची झाली होती. नाना हतबल झाले होते, त्यामुळे नानांनी पुन्हा त्यांच्याशी संपर्क केला जे अगोदर वसंताला मुलगी द्यायला तयार होते ,तेही आता नाही म्हणायला लागले, वसंताच वय वाढत होत पण लग्न काही होत नव्हत. नानांची अवस्था आता बघण्यासारखी झाली होती.

कार्तिकी एकादशी आली, तुलसी विवाह संपन्न झाला. नानांनी यावर्षी पुन्हा जोमाने निराश न होता वसंताला मुलगी शोधायला सुरूवात केली. मुलगी शोधता शोधता रक्ताचे पाणी केले, नानांनी आपल्या सर्व शक्तीनीशी अथक परीश्रम केले. होते नव्हते तेथे संपर्क केला. उभ्या महाराष्ट्रात होत असलेले वधूवर परिचय मेळाव्यांना उपस्थिती दिली. आणि मग मात्र या वर्षी नानांच्या परीश्रमाला फळ आले. महाराष्ट्राच्या दक्षिणेत नानांना वसंतासाठी जशी मुलगी हवी तशी मुलगी मिळाली. आपल्याच समाजात, मंगळ असलेली, देखणी, सुशिक्षित अशी मुलगी मिळाली म्हणुन नानांना खुप आनंद झाला.

‘आनंद सागु कीती ग बाई ,आनंद सांगु किती ‘ अशी स्थिती नानांची झाली होती. नानांना पाहीजे तसे स्थळ वसंतासाठी चालून आले होते. कुंडली ही जुळली होती. मन जुडोत ना जुडोत पण गुण मात्र चांगले जमले होते. ब्राम्हणानेही होकार दिला की, नाना साहेब खुप चांगले स्थळ आहे , वसंताच लग्न करायला काहीच हरकत नाही. नानांनी पुढे कोणत्याही प्रकारचा विलंब न करता, आपल्या समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे पुढील सोपस्कर पार पाडुन घेतले. वसंताही मुलगी पाहुन आला. खुप सुंदर लक्ष्मी नारायणाच्या जोडी सारखी जोडी दिसत होती. नानांच्या ईब्रतीला शोभेल अशा भव्य शामियान्यात वसंताच लग्न करण्यात आले. परिसरातील सर्व प्रतिष्ठीत लोकांना आमंत्रित करण्यात आले. सर्व प्रकारच्या पंच पक्वान्नाची मेजवानी देण्यात आली. आणि अतिशय शुभ घटीकेवर वसंताच्या गळ्यात वरमाळा पडली. वसंता चतुर्भुज झाला. नानांच्या मनाप्रमाणे विवाह सोहळा संपन्न झाला, त्याचे समाधान नानांच्या चेहऱ्यावर स्पष्ट पणे दिसत होते.
विवाह सोहळा संपन्न झाला. वसंता आता मधुचंद्राचला जायचे नियोजन करत होता. त्याला असे वाटत होते की, आपण देशाच्या उत्तरेस हिमालयात मधुचंद्राचे सुवर्ण क्षण घालवावेत आणि तशी नानांची ही ईच्छा होती. पण नवीन आलेल्या महाराणीच्या डोक्यात काही वेगळेच शिजत होते. वसंताच्या सौ. ने मधुचंद्राचला उत्तरेस जायला नकार दिला. तीला दक्षिणेस केरळ/तामिळनाडू कडे जायची ईच्छा होती आणि ती तिथेच जायचं म्हणत होती. वसंता ने खुप शर्तीचे प्रयत्न केले पण महाराणी ऐकायला तयार नव्हती. मधुचंद्र होईल तर दक्षिणेसच अशी अडुनच बसली. वसंताला काही कळत नव्हते की काय सांगावे, काय समजवावे. नानांनी ही सूनबाईस समजावण्याचा प्रयत्न केला परंतु सुनबाईने स्पष्ट मत मांडले की ,” नानाजी मधुचंद्राचला कुठे जायचे हा आमचा वैवाहिक आयुष्याचा खुप वैयक्तिक प्रश्न आहे तुम्ही यात काहीही बोलु नका , कुठे जायचे ते आम्ही ठरवू”.नानांना पुढे काहीही बोलता नाही आले.

शेवटी वसंताचे प्रयत्न संपले, खुप समजावले , विनवण्या केल्या पण महाराणी काही हिमालयात मधुचंद्राला जायला तयार झाली नाही. वसंताच स्वतः तयार झाला, मग दोघेही दक्षिण भारतात तामिळनाडू च्या समुद्र किना-यावर मधुचंद्राचला निघाले. वसंता खुप निराश होता पण त्याला पर्याय नव्हता. आपली पत्नी खुप हेकेखोर आहे ,तीचा हट्ट तीने सोडला नाही आणि ईकडेच मधुचंद्राचला यावे लागले, याची सल त्याला मनोमन बोचत होती. पण वसंता ने मन मोठे केले आणि सर्व सोडून दिले. मस्त दोघांनी मधुचंद्राचा आनंद घेतला.
महाराणीचा स्वभाव खुप जमदग्नी होता, ती प्रत्येक गोष्टीत वाद घालत होती, नानांच काहीही एकत नव्हती,सर्व कुटुंबाचा आत्ताच ताबा घ्यावा असा ही ती विचार करत होती. आणि त्यातुन थोड्याच दिवसात त्यांच्यात खुप भांडनं होऊ लागली. नानांना प्रत्येक वेळी खाली मान घालावी लागे. नाना विचार करत असे की ब्राम्हणाने सांगितले तसेच सर्व झाले आहे. मंगळीकच मुलगी करावी नाहीतर आपल्या घरात खुप वाद होतील, आपली प्रतिष्ठा लयास जाईल या ब्राम्हणाच्या शब्दाला ऐवढया गांभिर्याने घेतल्यावर आणि तशीच मुलगी केल्यावरही असे होत आहे यावर नानांचा विश्वास बसत नव्हता. परंतु नाना व वसंता दोघेही खुप समजुतदार असल्यामुळे तिला तीच्या मनाप्रमाणे वागवुन घेत होते. म्हणुन सर्व चालु होते. तिच्या मनाप्रमाणे थोडेही झाले नाही तर ती हंगामा करत होती. तीने सर्व कुटुंबाच्या मुसक्या आवळून घेतल्या होत्या. पण आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि ईब्रत जाऊ नये म्हणुन हे सर्व घरातल्या घरात चार भिंतींमध्ये होत होते. पण हे किती दिवस चालायचे याची नाना व वसंता दोघांनाही शाश्वती देता येत नव्हती. खुप वैतागून गेले होते दोघेही या सर्व बाबींना, काय करावं काही सुचत नव्हते त्यांना. मजबुरीचे जीवन यांच्या वाट्याला आले होते.

असेच दिवसामागुन दिवस जात होते. सुनबाई यांच्या सोबत राहतांना भांडन तर करतच होती शिवाय आत मनातल्या मनात विस्तवाचे बेत शिजवत होती. एके दिवशी नानांनी शेतीचा माल विकून खुप मोठी रक्कम आणली आणि घरात ठेवून दिली. नाना ही आणि वसंताही खुप स्वच्छ मनाचे आणि साध्या स्वभावाचे लोक होते. परंतु सुनबाई त्यांना खुप त्रास देत होती. सुनबाईने नानांनी कपाटात ठेवलेले सर्व पैसे काढुन घेतले व कोणाला काहीही न सांगता माहेरी निघुन गेली, जातांना वसंता साठी एक चिठ्ठी ठेवुन गेली की ,”माझं तुमच्या घरात मन लागत नाही, वसंताही मला आवडत नाही, माझं कुणा दुसऱ्यावर प्रेम आहे, आणि तो माझ्यावर खुप प्रेम करतो. मी घरच्यांच्या दबावाखाली वसंताशी लग्न केलय, मला घटस्फोट हवाय. सर्व पेपर्स पाठवुन द्याल. मी सह्या करून देईल.”

हे सर्व वाचून नानांची व वसंताच्या पायाखालची जमीनच सरकली. काही सुचत नव्हते की हे काय झाले. आयुष्य खराब झालय माझ्या वसंताचे. मी का म्हणुन लागलो कुंडली च्या मागे . एका पेक्षा एक चांगल्या मुलींची स्थळ आलीत मी कुंडली जमत नव्हती म्हणुन नाही म्हटली आणि ही कुंडली जुळवून आणलेली सुन. कुंडली,गुण जमले पण स्वभाव, मन , विचार काहीच नाही जमले. म्हणुन लग्न झाल्यावरच मधुचंद्रा पासुन वादविवाद सुरू झाले. आता नानांचे डोळे उघडले होते. आता नानांना आपल्या अध्यात्मात वाचलेली संत तुकारामांची ओवी आठवत होती……

“पंचांगाच्या मागे लागतो अडाणी, पाहे शुभ अशुभ क्षणोक्षणी”

पण नानांकडे आता मनस्तापा शिवाय काहीच उरले नव्हते.

लेखन – 
तुषार सोनार

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..