नवीन लेखन...

मंगलाय सुमनो हरि:

मंडळी सप्रे म नमस्कार !

शनिवार २० एप्रिल २०२४ रोजी रात्री गडकरी रंगायतन —ठाणे येथे सुमन सुगंध हा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या गीतांचा कार्यक्रम बघण्याचा अभुतपूर्व योग जुळून आला !

मुळात सुमनजींची गाणी म्हणजे बासुंदी ! त्यात साखर म्हणजे मंगला खाडिलकर यांचं निवेदन ! आणि यावर केशराची अनुभूति म्हणजे स्वत: सुमनताईंची उपस्थिती !असंही आमच्या सद्गुरुमाउली परमपूज्य कलावती आईंच्या यांच्या नात्यातील असल्याने सुमनताईंबद्धल अधिकच आदर व आपुलकी होतीच , काल मंगलाताईंच्या आग्रहामुळे वर वर्णन केलेला केशरयुक्त बासुंदीचा योग जुळून आला आणि म्हणून लेखाचं शीर्षक आहे
मंगलाय सुमनो हरि:

२७ नक्षत्रांप्रमाणे २७ मराठी—हिंदी गाणी सादर केली गेली.मंदार आपटे , विद्या करलगीकर आणि माधुरी करमरकर असे सुरेल गायक असणार होते परंतू माधुरीजींना प्रकृति अस्वास्थ्यामुळे येता आलं नाही म्हणून निवेदक राजेंद्र पाटणकर यांच्या Timely Impact Punch प्रमाणे Impact Player म्हणून संगीतकार बाळ बर्वे यांच्या कन्या सुचित्रा भागवत या मंदार व विद्यासह गायनसेवेला उपस्थित होत्या…..

मराठीचे वाल्मिकी ग.दि.माडगूळकर यांच्या शब्दांना स्नेहल भाटकरजींच्या संगीताने सजलेल्या गणेशस्तुतीने विद्यांनी सुरुवात केली : तुझ्या कांतीसम रक्तपताका पूर्वदिशे फडकती आणि मन पार ४५—५० वर्ष मागे गेले…..माझं माहेर — मुंबईतील एक उपनगर गोरेगांव पूर्व येथील टिळक नगर आणि आसपास चा सार्वजनिक गणेशोत्सव …..नगरातील रहिवाशी दत्त निवासमधील रमेश डेकोरेटर्सचे कदम यांच्या रेकाॅर्डमधे हमखास गणेश चतुर्थीच्या पहाटेला सुरु होणारी ही गणेशस्तुती…..किती वर्षं झाली हा मधाळ स्वर ऐकून , मला तर कधी कधी वाटतं की खरोखरंच गणपतीबाप्पाही एखाद्या रविवारी पार्वतीकडे हटून बसत असावा की सुमन कल्याणपूरचं “तुझ्या कांतीसम रक्तपताका” ऐकव तरंच मी झोपेतून उठून मुखमार्जन करीन! १९६८ सालचं गाणं अब तक ५६ झाले तरी तितकंच सुश्राव्य आहे आणि येणार्‍या कित्येक पिढ्यांमधेही सुखेनैव नांदेल हे निश्चित् !

यानंतर १९६९ चा कवीवर्य मंगेश पाडगांवकरांचा सल्ला विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केला व सुमनजींनी आपल्याला ऐकवला तो शब्द शब्द जपून ठेव बकुळिच्या फुलापरी — बकुळीच्या फुलांसारखाच नाजुक गोड मोहक आवाजात सुचित्रा मय झाला !

दोन महिलांच्या आवाजाने वातावरण भारलेलं असताना मधुकर जोशींचे शब्द जे दशरथ पुजारींनी संगीतबद्ध केले ते आकाश पांघरोनी जग शांत झोपले हे , घेऊन एकतारी गातो कबीर दोहे मंदारजींनी सादर केलं.

मग जिथ्थे तिथ्थे च्या मंगलाजींच्या गमतीशीर टिपणीनंतर १९६१ च्या पुत्र व्हावा ऐसा मधील जनकवी ठाण्याचे पी.सावळाराम यांचे शब्द वसंत प्रभूंनी अजरामर चालीत बांधले ती सलज्ज तारुण्यातील तरल भावना विद्याजींनी सादर केली जिथ्थे सागरा धरणी मिळते , तिथ्थे तुझी मी वाट पहाते , वाट पहाते! यातल्या Waltz चा ( दादरा ठेका ) मंगलाताईंनी आवर्जून उल्लेख केला.

यानंतर मजरूह सुलतानपुरींचे शब्द सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले बात एक रात की मधील गाणं देव आनंदच्या जन्मशताब्दीचं निमित्त साधत सुचित्रा मय झाले — न तुम हमें जानों…..

१९६३ च्या सुभद्राहरण चित्रपटातील शांतारामजींचे शब्द आठवले जे प्रभाकर जोग यांनी संगीतमय केलेले आर्जव बघत राहूदे तुझ्याकडे सुचित्रा व मंदार यांनी सादर केले ! हल्ली नेहमी (लग्नाआधीपासूनंच) गुढगे टेकून अंगठीची लालूच दाखवत पुढे पुढे करणार्‍या ठोंब्या प्रियकराच्या त्या पाश्चात्य नाटकी मागणीपेक्षा प्रियेचं ( तेही जयश्री गडकरसारख्या सौंदर्यवती सुभद्रे चं ! )हे मराठमोळं गोड आर्जव हळुवार मोरपीस फिरवल्यासारखं मनाला स्पर्शून जातं…..

ज्या काळात काकाचं ( पक्षी : जतिन ऊर्फ राजेश खन्ना ) मेरे सपनोंकी रानी कब आएगी तू? गाजत होतं ( १९६९ ) त्याच काळात मराठमोळा रमेश देव सीमा ला पडद्यावर मधुसूदन कालेलकरांच्या शब्दांना एन.दत्तांच्या सुरावटीत विचारता झाला सांग कधी कळणार तुला , भाव माझ्या मनातला? आणि आपलंही प्रेम असल्याची कबुली असलेला पलटवार करते सीमा :रंग कधी दिसणार तुला लाजणार्‍या फुलातला? आणि हे भांव जिवंत केले मंदार —विद्या यांनी !

प्रियेच्या आर्जवाने संमोहित प्रियकर मग मराठी सोडून हिंदीमधे प्रियेला हसरत जयपुरी यांचे शब्द शंकर जयकिशनच्या चालीमधे घोळवत राजकुमार धर्तीवर सांगू लागला तुमने पुकारा और हम चले आए , दिल हथेलीपर ले आए रे आणि हे प्रियकर प्रेयसीचे कबुलीजबाब सादर केले मंदार—सुचित्रा यांनी.

सूफ़ी संगीतातील एक प्रकार मुनाजात याबद्धल भाष्य करत ( अल्लाह करम करना मौला तू रहम करना — या सुमनमय मधुर गीताचा उल्लेख करत ) मंगलाजींनी जानवर मधील एक अशीच मुनाजात ( पक्षी : प्रार्थना , स्तुति ज्यात स्वत:साठीही काही प्रार्थना असते ) जी मूलत: हसरत जयपुरींची होती व शंकर जयकिशनने त्यात उत्कट रंग भरून सुमनजींकडून गाऊन घेतली होती मेरे संग गा , गुनगुना कोई गीत सुहाना ती सादर केली विद्यांनी …

यानंतर मंत्रमुग्ध श्रोत्यांना परत मराठी भावविश्वात आणलं मंगलाताईंनी , अशोक जी. परांजपे यांच्या शब्दांना नादमय माधुर्यता देणार्‍या अशोक पत्की नामक अवलिया जादुगार संगीतकाराच्या गाण्याने केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर आणि हा गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर सुचित्रा यांनी व्यक्त केला… संचारी या बंगाली संगीत प्रकारावरून हे संगीत आल्याचं मंगलाताईंनी नमूद केलं…..

समुद्राच्या लाटांवर मनाला तरंगत ठेवणार्‍या
अशोक जी. परांजपे यांच्या शब्दांना तितकीच प्रवाही माधुर्यता देणार्‍या अशोक पत्की नामक अवलिया जादुगार संगीतकाराच्या गाण्याने श्रोत्यांना संगीताच्या लाटांवर आरूढ केलं नाविका रे वारा वाहे रे , डौलानं हाक जरा आज नांव रे म्हणत विद्या यांनी. भटियाली संगीत प्रकारापैकी एक संगीत असं मंगलाताईंनी आवर्जून नमूद केलं…..

यानंतर कलाकारांनी एक दृतगतीतील चौकार खेळला : सुचित्रा — अरे संसार संसार मोलकरीण , विद्या — असावे घरटे अपुले छान, मंदार विद्या — आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही , विद्या या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार

विंगेमधे बसलेल्या सुमनताईंना उद्देशून मुंबईचा जावई मधील गदिमा—सुधीर फडके यांचे कशी करू स्वागता? सादर केलं विद्या यांनी…..

आणि या स्वागतगीतानंतर मंगलाताई रंगमंचावर घेऊन आल्या वात्सल्यमूर्ती , पद्मभूषण , यंदाच्या म.टा.गौरवप्राप्त सु रांचा म नमोहक न जराणा अर्थात् सुमन कल्याणपूर यांना ! वय वर्षे ८७ फक्त ! पण मंगलाताईंनी त्यांना बोलतं केलं आणि त्यांनीही तितक्याच मार्मिक आणि मिश्किलपणे श्रोत्यांशी सुसंवाद साधला ! आनंद मनी माईना , केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर , जिथ्थे सागरा धरणी मिळते….. अशी गाणी गायल्या….. यानंतर ॠतुरंग तर्फे त्यांना एक मानपत्र अर्पण करण्यात आलं ज्याचं वाचन अतिशय छान निवेदन करणार्‍या राजेंद्र पाटणकर यांनी आधी केलं , शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम एक लक्ष एक हजार एक यासह सुमनताईंचा सत्कार करण्यात आला ! ज्यांनी कित्येक दशकं आपले अष्टौप्रहर सुश्राव्य केले अशा एका थोर व्यक्तीमत्वाचा सत्कार होताना आपण त्याचे साक्षीदार होणं ही एक परमभाग्याची गोष्ट आहे महाराजा !

यानंतर ( फक्त पाचच मिनिटं सांगून पंधरा मिनिटांचं ! )मध्यंतर झालं.

मध्यंतरानंतर…..

१९६३ च्या दिल एक मंदिर मधील जानेवाले कभी नहीं आते या मंदारजींच्या आर्त टाहोनंतर हसरत जयपुरी आणि शंकर जयकिशन यांचं दिल एक मंदिर है ~ असं विद्या यांनी विदित केलं…..

१९६८ चं रमेश आणावकर यांचं दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं मृदुल करांनी छेडित तारा ऐकवत विद्या यांनी भाव विभोर केलं…..

यानंतर मधुकर जोशी यांचं गीत जे मूलत: रिमझिम झरती श्रावणधारा असं होतं , ते सुमनजींनी पावसाच्या झिमझिम झरती श्रावणधारा असतात ना? असं म्हटल्यावर मधुकरजींनी पण “बरं , झिमझिम तर झिमझिम !” असं मान्य केल्याचा किस्सा मंगलाताईंनी सांगितला आणि श्रोत्यांमधे खसखस पिकली आणि त्या पार्श्वभूमीवर दशरथ पुजारींचे नादमय स्वर सुचित्रामय झाले…..

कुठल्याही स्त्रीच्या ह्रृदयाचा एक कोपरा ज्या माहेराने व्यापलेला असतो , त्या माहेरी जाऊन सुवासाची बरसात करणारे आणि डोळ्यांत पाणी आणणारे कृ.ब निकुंब यांचे शब्द कमलाकर भागवत यांच्या सुमधुर संगीताने नटलेले — घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात हे आर्त भाव सुचित्राजींनी गाऊन श्रोत्यांना हेलावून सोडलं…..
हे गाणं जसं सुमनजींनी गायलंय तसंच , ए.पी.नारायणगांवकर यांच्या संगीतात कालिंदी केसकर यांनी आणि वसंत देसाई यांच्या संगीतात फैय्याज यांनीही गायलं आहे ! एकाच गाण्याला ३ वेगवेगळ्या संगीतकारांच्या चाली आणि तीन वेगवेगळ्या सुश्राव्य गायिकांनी अजरामर केलेलं हे मराठीतील पहिलंवहिलं भावगीत असावं आणि तेही या जगातील सर्वश्रेष्ठ अशा स्त्री च्या भावनांना वाट करून देणारं ! आपण मराठी असल्याचा अभिमान वाटत ऊर भरून येतो महाराजा !

१९६५ साली मजरूह सुलतानपुरींचे जादुई आर्जव संगीतकार ख़य्याम यांनी स्वरबद्ध करत मुहब्बत इसको कहते हैं चित्रपटातील माझ्या माहेरच्या गोरेगांवातील छोटा काश्मिर ऊर्फ Observation Post ( O.P. ) येथे चित्रिकरण झालेलं ठहरिये होशमें आ लूँ तो चले जाइयेगा हे गाणं रफ़ी आणि सुमनजींच्या त्या लाडिक ऊँ हूँ सहित मंदार सुचित्रा यांनी सादर केलं.आणि पडद्यावर मास्टर विनायक कन्या नंदा आणि कपूर कुलोत्पन्न तेहेत्तीस दातांचा देखणा शशी कपूर ! एक दात डाव्या बाजूच्या वरच्या जबड्यात अधिक असताना फारच देखणा दिसणारा शशी कपूर हे हिंदी सिनेसृष्टीला पडलेलं ३३ दातांचं पहिलं स्वप्न ( आणि तसंच दुसरं स्वप्न म्हणजे मौशुमी चटर्जी ! )

यानंतर विद्या यांनी दिल एक मंदिर मधील शैलेंद्र यांचं जूहीकी कली मेरी लाडली हे शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं लडिवाळ नटखट गाणं सादर केलं…..

१९५१ साली मल्हार चित्रपटात इंदिवर यांच्या शब्दांना रोशन यांनी संगीतबद्ध करत एक गाणं राग गौड मल्हार मधे लताकडून गाऊन घेतलं होतं गरजत बरसत भीजत आईलो पुढे ९ वर्षांनी अब्दुल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी यांनी लिहिले गाणं रोशन यांनी याच चालीत बरसातकी रात चित्रपटात कमल बारोट आणि सुमन कल्याणपूर यांच्याकडून गाऊन घेतलं गरजत बरसत सावन आयो रे जे विद्या—सुचित्रा यांनी सादर केलं…..

१९६५ साली एक चित्रपट आला नूरमहल ज्यात एक गूढ वाटणारं गाणं होतं सबा अफ़गाणी यांचं , जे संगीतबद्ध केलं होतं जानी बाबू क़व्वाल यांनी सुमनजींच्या आवाजातील मेरे मेहेबूब न जा ( पडद्यावर चित्रा आणि जगदीप ) — विद्या यांनी सादर केलं.

१९६५ सालीच ३३ दातांच्या देखण्या शशी कपूरचा नंदासोबत एक सिनेमा आला होता जब जब फूल खिले आणि आनंद बक्षींच्या गीतांना कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध करून अजरामर केलं.यातलं कबूलीजबाब धाटणीचं गाणं सादर केलं मंदार विद्या यांनी : ना ना करते प्यार तुम्हींसे कर बैठे यानंतर १९६८ च्या ब्रह्मचारी मधील हसरत जयपुरी—शंकर जयकिशन यांचं आजकल तेरे मेरे प्यारके चर्चे हर जबानपर सादर केलं मंदार—सुचित्रा यांनी ! ( अख्ख्या दृष्ट लागण्यासारख्या कार्यक्रमात या गाण्यातील सॅक्सोफोनची धून नीट न वाजण्याची दृष्ट लागलेलं हे एकमेव गाणं महाराजा ! )

१९६१ च्या माॅडर्न गर्ल मधे आपल्या अजागळ पेहेरावावरून हिंदी सिनेसृष्टीमधे उपाधी लाभलेल्या गुलशन बावरा च्या गीताला स्वरबद्ध केलं रवी यांनी आणि ते ये मौसम रंगीन समाँ सादर केलं मंदार—विद्या यांनी.

मराठी चित्रपटसृष्टीमधे चंद्राला निंबोणीच्या झाडामागे झोपवण्याची किमया करत अजरामर अंगाईगीत लिहिणार्‍या मधुसूदन कालेलकर यांच्या शब्दांना एन.दत्ता यांनी स्वरबद्ध केलं आणि निंबोणीच्या झाडामागे सादर केलं विद्या यांनी…..

गदिमा—बाबूजी यांच्या एकटी मधील मातृह्रृदयाने मुलाची काढलेली काल्पनीक दृष्ट सुचित्रा यांनी काढली : लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू

१९६४ च्या साँज और सवेरा मधील नायक—नायिकेची खंत हसरत जयपुरींनी मांडली व शंकर जयकिशन यांनी स्वरबद्ध केली अजहु न आए बालमा , सावन बीता जाय सादर केलं मंदार आणि विद्या यांनी !

मंडळी , काही काही कार्यक्रम संपूच नयेत असं वाटतं , पण कालमर्यादा असते त्यामुळे साँज और सवेरा ने सुमधुर केलेली बेला सावन बीता जाय या सुरेल तक्रारीवर संपली आणि कार्यक्रम संपला मंगलाय सुमनो हरि: आणि अस्मादिक् आणि सौभाग्यवती संगीताय रमत: घरी: आलो !

असा “हा सुमन सुगंध आमच्या जीवनात दरवळला तसा येणारी अनेक वर्षे हा लेख वाचणार्‍या रसिक वाचकांच्या जीवनातही दरवळो !” ~ हीच पाचां उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण !

जाणिजे ,

लेखनालंकार ,
मर्यादेयं विराजते !
© उदय गंगाधर सप्रे म—ठाणे
सोमवार २२ एप्रिल २०२४ दु.१.१७ वा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..