भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत शत्रू असले तरी एक अशी वस्तू आहे जी दोघांमध्ये समान आहे. आंबा हे भारत व पाकिस्तान यांचे राष्ट्रीय फळ आहे. आंब्याचं झाड हे बांगलादेशाचे राष्ट्रीय झाड आहे आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्हही आहे.
आंब्यांचा उगम –
आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक फळ आहे. आंब्यांचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे, परंतु दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियामधले मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षाचा जीवाश्मांचा इतिहास पाहता आंब्याचा उगम याच भागात झाला असे मानण्यात येते.
अवीट गोडीच्या या फळाला कोकणाचा राजा असेही संबोधले जाते. एप्रिल ते जून हा या फळाचा हंगाम आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीत आंब्याला विशेष महत्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात.
आंब्याचा मोहर –
आंब्याच्या फुलांना मोहर असे म्हणतात. त्याला एक प्रकारचा मंद सुवास असतो. आंब्याचे फळ हे वनस्पतीशास्त्रातील ”drupe” या प्रकारातील असते. या प्रकारात फळाच्या बाहेरील भागात गर असून आतमध्ये कोय असते.
आंब्याचा माच –
कृत्रिमरीत्या आंबा पिकवण्यास आंब्यांचा माच लावणे असे म्हणतात. एखाद्या खोलीत वाळवलेले तणस वा भाताचे वाळवलेले गवत पसरुन त्यावर झाडावर पिकण्यास सुरुवात झालेल्या कैर्या ठेवतात. त्यावर पुन्हा गवत वा तणसाचे अच्छादन करतात. साधारणत: १०-१५ दिवसांत, झाकल्या गेल्यामूळे निर्माण झालेल्या उष्णतेने आंबा पिकतो.
आंब्याचे झाड –
आंब्याचे झाड हे साधारणपणे ३५ ते ४० मीटर एवढा उंच असते. आंब्याची पाने सदाबहार असतात. पानांचा आकार १५ ते ३५ सेंटिमीटर लांब, तर ६ ते १६ सेंटिमीटर रुंद असतो. कोवळे असताना पानांचा रंग काहीसा केशरी-गुलाबी असतो व तो जलदपणे उजळ आणि गडद होतो. पाने जशी मोठी होतात, तसा त्यांचा रंग गडद हिरवा होतो.
आंब्यांचा आकार –
आंब्यांच्या जातीप्रमाणे त्याच्या फळाच्या आकारात बराच फरक असतो. साधारणपणे आंब्याच्या फळाचा आकार १० ते २५ सेंटिमीटर लांब, तर व्यास ७ ते १२ सेंटिमीटर असतो. फळाचे वजन २.५ किलोग्रॅमपर्यंत असू शकते.
Leave a Reply