नवीन लेखन...

मनमवाळ

” साब, क्या हुवा ? आज बॅटरी डाऊन? “
काल युनुसभाईंचा फोन आला आणि माझ्या ” हॅलो ” वरून त्यांनी ताडलं माझी तब्येत बरी नाही. सुमारे चार दशकांहून अधिक काळ संपर्कात असलेल्या युनुसभाईं मेकॅनिक यांचे आणि माझे दाट मैत्रीचे संबंध.
फार वर्षांपूर्वी नायर हॉस्पिटलच्या मागे “लाल चिमणी कंपाऊंड ” मधे असलेल्या मोकळ्या जागेत एका गोडाऊन शेजारी युनुसभाईंचे गॅरेज होते. गोडाऊन च्या भिंतीला बसवलेले लोखंडी स्टँड, त्यावर गाड्यांचे छोटे सुटे भाग , हातोड्या , पान्यांचे खोके आणि गॅरेजचे इतर सामान लावलेले. त्या बरोबरच पुढून निळा, बाजूने तपकिरी आणि मागे हिरवा रंग असलेले गोदरेज सारखे एक लोखंडी कपाट. कार रंगवताना रंगाची एखादी trial घेण्यासाठी रंगाऱ्याने जवळच्याच त्या कपाटाचा उपयोग केल्यामुळे ते असे कुरूप झालेले. त्यात किंमती पाने आणि गॅरेज मधे आलेल्या गाड्यांचे काढून ठेवलेले सामान ठेवलेले असे. या कपाटावर त्यांचं विलक्षण प्रेम .
” युनुसभाई, ये इस्टमन कलर कपाट अब निकालो, नया ले लो ” . असं अनेक वेळा त्यांना सांगूनही त्यांचं ठरलेलं उत्तर
” साब , उसके सूरतपे मत जाना , मेरे उस्तादने गॅरेज इस्टार्ट करनेके लिये इजाजत दी तब ये कबाट मुझे दिया था l तबसे उसने मेरा साथ दिया है l इसने अपने अंदर रखा एक आना भी देखा हैं और हजारका नोट भी “. युनूसभाईंनी गॅरेज चालू केल्यापासूनचा तो साक्षीदार त्यांना फार प्रिय होता.
युनूसभाई त्या काळी अवघ्या दक्षिण मुंबईत पेट्रोल कार चे पट्टीचे मेकॅनिक म्हणून प्रसिद्ध . इंजिन tuning करण्यात त्यांचा हात कोणी धरु शकत नव्हते.
मारुती कार बाजारात येऊ घातल्याचा तो काळ. रस्त्यावर फक्त FIAT आणि AMBASSADOR या दोनच मॉडेल्स च्या गाड्या दृष्टीस पडत असत.
त्यांच्याकडे पार दादरा नगर हवेली पासून गाड्या दुरुस्तीसाठी येत असत. काम इतकं चोख की एकदा आलेली गाडी पुन्हा दुसरीकडे जाणे शक्य नाही.
अर्थात , युनुसभाई , ना कधी स्वत:च्या कामाची जाहिरात करत ना कधी त्यांना तसे करण्याची जरूर भासे.
गाडी कामासाठी आली , की मालकाच्या तरुणपणापासून त्याला वर्षानुवर्ष ओळखणारे युनुसभाईं त्याच्याशी अरेतुरेच्या सलगीने गाडीच्या कामा व्यतिरिक्त गप्पा सुरू करत.
” गुड्डी का एडमिशन हुवा क्या ? उसको वो चर्चगेटवाला कॉलेज चलेगा ? मेरे पास वो चवालीस पचपन काली फियाट आती है देखो l केइम के डॉक्टर की, उसका भाई उधर बडी जगह पे है l एक काम कर , तू दोपहरको आ जा l उसको जाकर मिलते है l ज्यादासे से ज्यादा ना बोलेगा l “
मग दुपारी स्वतः जाऊन , लहानपणापासून पाहिलेल्या त्या गुड्डीचे काम करून येणार. बरं , कोणतेही काम त्यांच्या ओळखीने झाल्याची शेखी मिरवणे दूर राहिले , त्याचा उल्लेखसुद्धा पुन्हा कधी ते करणार नाहीत. .
गॅरेजच्या माध्यमातून त्यांच्या ओळखी अफाट. अगदी यशवंतराव चव्हाण यांच्या पासून ते मोठया मोठ्या व्यावसायिक व्यक्तींशी.पण त्यांनी कोणाचा कधीही गैरफायदा घेतला नाही . मात्र त्या त्या व्यक्तींच्या गाड्यांचे क्रमांक आणि मॉडेल्स त्यांच्या तोंडावर असतात.
” साब , चव्हानसाबकी लाल दियेवली प्लायमाउथ थी l बी एम एल सैतालीस छत्तीस. कही टूर पे जाते थे तो उनके एक रिशतेदार थे जगताप करके , वो पहले इधर गाडी लाते थे l मैने गाडी ओ के करनेके बाद तुम्हारे नागपाडा पोलिस एम टी सेक्शन मे जाती थी वायरलेस फिटींग चेक कराने और फिर वहाँसे उनके बंगलेपर l”
या माणसाला “उपरवाले “ने भरभरून असे काही दिले नसले तरी साऱ्यांचे भले चिंतण्याची वृत्ती आणि परदुःखाने व्यथित होणारं स्वच्छ मन हे त्यांचे जन्मजात दागिने . आणि त्यामुळेच त्यांचे संबंध गरीबांपासून श्रीमंतां पर्यंत वर्षानुवर्षे अबाधित राहीले.
त्यांच्या जुन्या गॅरेजच्या बाहेर फार पूर्वीची काथ्याच्या दोरीने विणलेली आणि तितकीच विटलेली एक बाज ( खाट ) होती. बसणारा जरा आत सरकून बसला की एखाद्या झोळीत पडावा अशा सैल दोऱ्यांची आणि कळकट अशी. तिच्या दांड्यावर अगदी जपून टेकावे लागे. आपण असे बसलो की युनूस भाई , जैन हॉटेल मधे दूधसोडा किंवा चहा सांगायला गॅरेज मधील एखाद्या पोऱ्याला पिटाळणार आणि रिकामा बॅटरी बॉक्स उलटा करून त्यावर समोर बसून गप्पा मारायला सुरुवात करणार .
आपल्या कारचे काहीही काम नसताना घटकाभर केवळ युनूसभाईंना भेटण्यासाठी येऊन त्या बाजल्यावर टेकून कटिंग चहा घेऊन गेलेल्या किती तऱ्हेच्या व्यक्ती मी तिथे पाहिल्या त्याला हिशोब नाही.
निवृत्त हायकोर्ट न्यायाधीश, दूसरे ज्यांची वेळ दोन दोन , तिन तिन महिने मिळत नसे आणि दर आठवड्यातील दोन दिवस दुबईला आणि उरलेले चार दिवस मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि मद्रास येथे असणारे एक प्रसिद्ध सर्जन, एक थिएटर मालक, एक ग्रँट रोड मधील ८/१० इमारतींचा पारशी मालक, एक फार मोठ्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा सर्वेसर्वा , एक पश्चिम मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक …असे एक ना अनेक.
मला कधी कधी प्रश्न पडत असे, car to carpet असं five – star राहणीमान असलेली ही इतकी मोठी माणसे केवळ काही मिनिटे युनुसभाईना भेटायला घरून उठून इथे काय म्हणून येत असावीत ! मात्र त्याचं उत्तरही मला सापडलं. समुद्राच्या पुढ्यात उसळत्या लाटांसमोर अलिशान प्रासादतुल्य बंगल्यात राहणाऱ्या एखाद्याच्या मनाला, नितळ पाण्याच्या झुळझुळणाऱ्या झऱ्याशेजारी एकांतात बसल्यावर जी शांती लाभते , ती, तो समुद्र देऊ शकत नाही. निर्मळ मनाचे युनुसभाई त्यांच्यासाठी असा झरा होत. त्यांचे वागणे बोलणे सर्वांशी सारखे. अगदी बड्या लोकांच्या ड्रायव्हर्सशी सुद्धा ते आत्मीयतेने वागणार, बोलणार.
दक्षिण मुंबईतील एका पिढीजात श्रीमंत इस्टेट मालकाचे वृद्धापकाळाने निधन झाले . त्याचा परदेशातील पुतण्या , त्या दिवंगत काकांनी मृत्यूपूर्व तयार करुन ठेवलेले युनूसभाईंच्या नावाचे एक पाकीट घेऊन त्यांना भेटायला आला. पाकीट उघडले तर त्यात एक कागद . त्यावर ” ए युनूस ” हे दोनच शब्द लिहिलेले आणि आत एक लाख रुपयांच्या नोटांची गड्डी गुंडाळलेली. युनूसभाई ने ते पैसे परत घेऊन जावे म्हणून पुतण्याला खूप आर्जव केले, परंतु त्याने ऐकले नाही. ही दिवंगत व्यक्तीसुद्धा पूर्वी मधेच कधीतरी युनूसभाईंना सहज म्हणून भेटायला येऊन घटकाभर त्या खाटेवर टेकणाऱ्यांपैकी. त्या दोन शब्दांपलीकडे कागद कोरा होता. मला वाटतं , युनूसभाईंप्रति असलेल्या त्याच्या भावना लिहायला शब्द आणि कागद दोन्ही अपुरे पडले असते. त्या दोन शब्दांच्या हाकेत दोन्ही मनांचं , त्याच्या तळापासून याच्या तळापर्यंत सगळं काही पोचलं असेल.
अजून एक असच आपलेपणाचं उदाहरण.
माणूसपण जपणाऱ्या माणसा माणसांची भेट झाली की जातीधर्मापलीकडच्या आत्मीयतेचा अलगद प्रत्यय येतो. मुंबई विमानतळा शेजारी असलेल्या एका अलिशान हॉटेलचा मालक असाच युनूसभाईंचा चाहता. १९८४ ला मुंबईत झालेल्या भीषण दंगलीची चाहूल लागताच त्याने दोन गाड्या पाठवून युनूसभाईंना काही बोलू न देता त्यांचा कुटुंबकबिला उचलून सरळ आपल्या हॉटेलमधे दोन खोल्यात नेऊन ठेवला आणि परिस्थिती पूर्ण निवळेपर्यंत त्यांची सगळी बडदास्त ठेवत त्यांना तेथून हलू दिले नाही .
ऑटोमोबाईलशी कायमची नाळ बांधली असल्याने युनूसभाईंचे बोलणे त्यातल्याच संदर्भ आणि उपमांनी लगडलेले . फार गंमतशीर .
” साब कहीं लंबा जाना हो तो पहले कारबोरेटर और कपलिंग चेक कर लेना l कारबोरेटर गाडीका दिल हैं और कपलिंग कमर. फिर गाडी कीतनीभी दौडाओ l” त्यांनी मला ” कारमंत्र ” दिला होता.
त्यांचं मोतीबिंदूच ऑपरेशन झाल्यावर चौकशी साठी मी फोन केला.तेव्हा म्हणाले ” डॉक्टरने आज मेरा राईट हेड लाईट साफ किया. बोले लेफ्टका हफ्ते के बाद देखेंगे “. एखाद्याला गुढगे आणि कमरेचं दुखणं असेल तर ” उसका शॉकब भी गया है और सस्पेन्शन भी ” अशी भाषा. कधी घरी आले असता चहा फराळाचा आपण फार आग्रह केला की ” नहीं नहीं, बस हो गया, मेरी टाकी पहेलेसे इस्कुटर की है l” असं.
एकदा तर त्यांनी सिक्सरच मारला. गॅरेजमधे मी आणि ते बसून बोलत असताना त्यांची एक परिचीत व्यक्ती बराच वेळ उभं राहून बोलत होती. त्यामुळे मला अवघडल्या सारखं होऊन त्यांना बसायला काहीतरी द्या असं युनूसभाईना हळूच सुचवलं. त्यावर त्यांनी ” अरे , वो बैठ नहीं सकते , उनको सालोंसे सायलेंसरकी बिमारी है l ” असं मोठ्याने जाहीर केलं.
आता ऐंशीच्या जवळ असलेल्या युनूस भाईंनी आयुष्यात अनेक दुःख पचवली आहेत . गॅरेज ची मूळ जागा नायर हॉस्पिटल च्या विस्तारात गेली तेव्हा पर्यायी जागेसाठी त्यांना पालिकेत असंख्य खेटे घालावे लागले आणि अतोनात त्रास सहन करावा लागला होता.एक मुलगा लग्न झाल्या झाल्या भांडून वेगळा झाला. त्यांची लाडकी मुलगी दोन लहानग्यांना ठेऊन अकाली जग सोडून गेली. दुसऱ्या मुलीला तरुणपणी वैधव्य आले. तिच्या नवऱ्याचे अपघाती निधन झाले आणि तिसऱ्या दिवशी तिच्या सासरकडील लोकांनी तिला दोन वर्षाच्या मुलीसह युनूसभाईंकडे आणून सोडले. बऱ्याच परिचीतांनी कायदेशीर लढाईचा सल्ला दिला आणि त्यात मदत करू असे सांगितले.
युनूसभाईंचे म्हणणे.
” उनको बोझ लग रही है इसीलिये तो उन्होंने लाके छोडा l बेटी भले कानूनसे वहाँ जायेगी भी, तो क्या वो लोग उसको आरामसे जीने देंगे ? अपना खून हैं l रहेगी मेरे घरमे l एक निवाला बढ जायेगा, लेकीन हसती खेलती रहेगी l “
परिस्थीतीचे असंख्य चटके झेलूनही त्यांच्या चेहेऱ्यावर असलेले मिश्किल हसू आणि मार्मिक बोलणे कधी कमी झाले नाही.
कधी फोन करुन विचारावे,. ” क्या युनूसभाई क्या चल रहा हैं?”
तिकडून हसत हसत उत्तर यावे , “बैठा हूं “युनूस नर्सिंग” होम में l मैं छोडके घरमे सब बीमार हैं l “
माझ्या आजारी भावाला हॉस्पिटलमधे भेटण्यासाठी ते आले होते.जाताना दरवाज्यापर्यंत मी सोडायला गेलो. सेंसर्स बसविलेल्या आपोआप उघडणाऱ्या काचेच्या दरवाज्यातून बाहेर पडताच मला त्यांनी त्यांचं तत्वज्ञान सुनावलं.
” साब एक चीज याद रखना l जहाँ दरवाजा ऑटोमॅटिक खुलता हैं वहाँ जेब भी ऑटोमॅटिक फटता हैं l नायरकी गली सबसे भली l दो रुपयेका पेपर निकालो और फुरसतमें बैठो l वैसे भी यहाँ के बडे डॉक्टर का टाईम मिलनेमे दो चार दिन जाते ही होगे ! वहाँ इतने लुले लंगडे आते है की उनको देखकरही अपना आधा दर्द भाग जाता हैं! यहाँ प्लास्टिक की पाकीटमें जो दवा देते हैं वोही उधर कागजकी पुडीमें मिलेगी l बाकी फरक कुछ नहीं l यहाँ एक दिनमें बडा डॉक्टर दस दस ऑपरेशन करता है l थकता तो होगा ही l आखिर इन्सान हैं l वहाँ मेन डॉक्टर ऑपरेशन करता हैं तो सीखनेवाले दस आंख ध्यानसे फार्मुला देखते बाजूमें खडे रहते हैं l फिर वापसी फीटींगमे नटबोल्ट ऊपरनीचे होनेका डर नहीं l “
कनवाळूपणा या इसमाचा आणखी एक जन्मजात गुण. त्यांच्या गॅरेज मधे अलीकडे एक उंच, शिडशिडीत , भोजपुरी शिवाय इतर कोणतीही भाषा येत नसलेला असा चाळीशीचा इसम दिसत असे . युनूसभाई त्याला “लंबू” अशी हाक मारत असत. प्रथम मला वाटलं की गॅरेजच्या कामासाठी त्यांनी नवीन माणूस ठेवला असावा. पण तसे नव्हते. विचारलं तेंव्हा कळलं .
” अरे वो यु पी साईडका हैं l ऐसेही एक दिन गॅरेजमे आया l उसका ना कोई गावमें हैं ना इधर l रहेनेके लिये जगह भी नहीं है l दिल का बडा साफ हैं l मैं बोला उसको सो जा इधर l छोटा मोटा काम करते रहता हैं l बडबड बहुत करता हैं , लेकीन मेरा भी टाईमपास होता है l “.
तो ना जातीचा ना पातीचा ना धर्माचा . नाव गाव माहीत नसलेल्या , लांब प्रदेशातून आलेल्या त्या सड्या फटींगाची रहायची सोय अशी सहज होऊन गेली.
तसंच त्यांचं प्राणी प्रेम . कुत्र्याची पिल्लं समोर खेळत असताना युनुसभाई हातातले काम सोडून त्यांच्याकडे पाहत बसतील. चेहेऱ्यावर भाव ती मजा अनुभवणाऱ्या लहान मुलाचे. वर सांगणार ” देखो देखो कितने प्यारे लगते हैं l वो सफेदवाला बहुत बदमाष है ! लेकिन येही बडे होकर काटेंगे l क्या करेंगे बेचारे ! जिंदगी रोटी के साथ जहरका इस्तेमाल भी सिखाती है ना l”
जुन्या जमान्यातील गाड्यांच्या खासियतीत युनूसभाई खास रंगतात. हिलमन, ऑस्टिन, मॉरिस, बेबी फियाट, फोर्डप्रीफेक्ट , डॉज, व्ह्यांगार्ड, स्टूडबेकर, प्लायमाऊथ, अशा जुन्या गाड्यात असलेल्या सोयी, पूर्ण लेदर upholstery , थंडीत इंजिन भोवतालची गरम हवा गाडीत खेळवण्याच्या झडपा, रेडिओ च्या डायल सारखे आडवे स्पीडॉमीटर्स , थोडीशीच हवा आत यावी म्हणून पुढच्या खिडक्यांना असलेल्या त्रिकोणी क्वार्टर ग्लासेस, दोन भागात असलेले विंड स्क्रीन्स, गिअर लिव्हरला असलेले हस्तिदंती किंवा रेडियमचे नॉब, लाकडी पॅनेलचे dashboards अशा अनेक गोष्टीबाबत सांगताना ते मधेच उठून अशाच एखाद्या फार जुन्या गाडीची एखादीं souvenir सारखी जपलेली छोटीशी गोष्ट त्या कपाटातून काढून दाखवतील.
त्यांचा दुसरा आवडता प्रांत जुन्या हिंदी गाण्यांचा. गाडी चालवताना एकटा असलो की जुनी हिंदी गाणी लावण्याची माझी जुनी संवय. एकदा आम्ही बरोबर गाडीत असताना मी साठच्या दशकातील गाण्यांची कॅसेट लावली. युनुसभाई एकदम खूष झाले. म्हणाले
” ये अच्छा किया आपने जुने गाने रखे है गाडीमें l जुने गानेमें देखो , मिर्च, मसाला, अद्रक, नमक सब हिसाबमें रहता था l और अबके गाने ! सब के सब तंगडी स्पेशल l “
पारसमणी वगैरे सिनेमातील गाणी लागल्यावर युनूस भाई पुन्हा जुन्या जमान्यात हरवतात. महिपाल, अशोक कुमार , के एन सिंग, सप्रू इत्यादी मंडळींच्या कोणत्या गाड्या होत्या ते सांगता सांगता
” उसकी लाल कलर की पँकार्ड थी l छेसो बारा lआगे टायर के ऊपर मडगार्ड पर फूटबॉल जैसे हेड लाईट l एक बार महाबलेश्वरमें ब्रेकडाऊन हुई थीं l फिर यहाँसे जाके मैने बनाके लायी l उनका हरी नामका , मानगाव साईड का ड्रायव्हर था l रणजीत इस्टूडीओमें मालिक को छोडके मेरे पास आके बैठता था l भला आदमी l मच्छी मटन से उसे नफरत थी l हर बरस पंढरपूर जाता था l “…. असे त्यांचे स्वगत चालू होते .
कोणाचीही गाडी गॅरेजमधे आली की ती कोणत्या कामासाठी आणली याची चौकशी त्यांचा मुलगा करत असताना युनूसभाई स्वतः उठून जाऊन प्रथम बॉनेट उघडणार. ‘इंजिन ऑईल लेव्हल ‘ ची काडी बाहेर ओढून तिच्या टोकावरचा थेंब डाव्या हाताच्या तर्जनीवर घेऊन तो थेंब अंगठ्याने बोटावरच चोळत ती चिमूट नाकाकडे नेऊन त्या तेलाचा वास घेणार.त्याचवेळी बॉनेटखालच्या यंत्रावळी वर नजर टाकत बॅटरीची टरमिनल्स उजव्या हाताने तपासून पाहणार आणि बॉनेट बंद करून परत येऊन आपल्या आवडत्या डुगडुगणाऱ्या खुर्चीत एक पाय वर घेऊन बसणार.
हल्लीच्या जमान्यातील इलेक्ट्रॉनिक्सच्या जाळ्यामधे विणलेल्या गाड्यांचे तंत्र आणि जुन्या गाड्यांबाबत तज्ज्ञ असलेल्या युनुसभाईंचे गोत्र यांचा मेळ तितकासा जमत नाही. मात्र त्याचा त्यांना विषाद नाही. उलट
” देखो क्या एक एक मस्त चीज बनाते हैं आजकल l चेकिंगके वास्ते इन नयी गाडीयोंके नीचे जानेकी नौबत बहोत कम आती हैं l ” असं म्हणून नवीन तंत्रज्ञानाचे सानंद स्वागत.
मला बरं नाही हे काल माहीत झाल्यावर आज तब्येतीची चौकशी करायला पुन्हा फोन आला. माझाआराम चालला होता. या व्यक्तीबद्दल जे जे वाटतं ते उतरवून ठेवावं असं वाटलं आणि ते उतरलं. मनात आलं यांचा फोटोही आपल्यापाशी आहे . त्यांच्यावरील लिखाणाला त्यांच्या चेहेऱ्याचीहि साथ द्यावी. माझे मित्र माजी पोलिस अधिकारी आणि चित्रकार श्री. दिनेश अग्रवाल यांनी माझी इच्छा रेषास्वरुपात आणली आणि लेखनायकही लेखासोबत झळकला.
उद्याही माझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी युनूसभाईंचा फोन येणारच येणार. त्यांचा बँकेत नोकरीस असलेला सर्वात धाकटा मुलगा अमजाद माझ्या फेसबुक फ्रेंड लिस्ट मधे आहे. त्याने लेख पाहिल्यावर तो युनूसभाईंना सांगणार . मग त्यांची हसत हसत प्रतिक्रिया असेल
” अरे साब…. अमजादने बताया मुझे l.आपने मेरी पूरी इष्टोरी लिखके मेरा पोस्टर भी छापा हैं l सच क्या ?”. वो पढके बताता था l मैने मना किया l उसको बोला खुद साबसे सुनुंगा l पहुंचतां हूं संडे सुबह नऊ बजेतक l ताजा ताजा फिरनी लेके l कहीं जाना नही l “
आणि, त्रास घेऊन खरंच येऊ नका असं त्यांना कितीही विनवलं , तरी ते रविवारी सकाळी नऊ वाजता माझ्या घरी हजर होणार हे मला माहीत असतं.
–अजित देशमुख
(निवृत्त)अप्पर पोलिस उपायुक्त
9892944007

1 Comment on मनमवाळ

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..