माझी पत्नी जिथे नोकरी करते, तिथल्या रोजच्या गोष्टी ती माझ्याशी शेअर करत असते. ती सांगत असलेल्या सर्वच गोष्टींकडे माझं लक्ष असतंच असं नाही परंतू काही वेगळ्या गोष्टी मात्र कान आणि लक्ष वेधून घेतात.हल्ली तिच्या बोलण्यात ‘जयहिन्द’ हा शब्द वारंवार येऊ लागलंय ह्याची मी नोंद घेतली व माझं कुतूहल जागृत झालं. कुतुहल जागृत होण्यातं कारण हे, की ती कुठल्याही संघटना, पक्षाशी दुरूनही संबंधीत नाही. सुशिक्षित असल्याने तिच्यावर कोणाचा अथवा कोणाच्या विचारांचा प्रभावही नाही . असं असताना ती ज्या प्रेमाने ‘जयहिन्द’ बोलत होती व ज्या आनंदाने मला सांगत होती तो आनंद मात्र मला सुखावून गेला.
तर, बायको म्हणत होती की हल्ली आम्ही आॅफिसात एकमेंकांना आॅफिसमधे ‘गुड माॅर्निंग’ ‘गुड आफ्टरनून’ किंवा ‘गुड इव्हनिंग’ असं अभिनादन करायचं बंद केलं असून ‘जयहिन्द’ म्हणायला सुरूवात केली आहे. म्हणायला आणि ऐकायलाही छान वाटत असं तिचं म्हणणं होतं. मलाही पटलं, की इंग्रजी अभिवादनांपेक्षा आपल्या देशी मातीतलं आणि दैदिप्यमान इतिहास असलेलं ‘जयहिन्द’ कैक पटीनं छान वाटतं..कळत-नकळत देशाचं नांव काढलं जातं, देशाची आठवण राहाते वैगेरे हा फायदा वेगळाच. मी विचारलं, की असा सकारात्मक बदल कसा काय घडला बुवा..! तर त्यांच्या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनात असं करावं असा विचार आला व त्यांनी तो सर्वांसमोर मांडला असता तो सर्वांना आवडला व सर्वांनी लगेच अंमलातही आणला.
सध्या फक्त सरकारी युनिफाॅर्म सर्व्हीसेसमधे, ते ही मुख्यत्वेकरून पोलीस खात्यात ‘जयहिन्द’ हे अभिवादन वापरलं जातं असं टिव्हीवरील ‘क्राईम पेट्रोल’ किंवा ‘सावधान इंडीया’चे काही एपिसोड पाहून माहित होतं. सरकारी खातं हे अभिवादन वापरत असल्यामुळे एरवीच्या सामान्य जनतेने ते अभिनादन आपलं नाही किंवा आपल्यालाठी नसावं अशी (विनाकारण) समजूत करून घेतली असणंही अगदी सहज शक्य आहे. पुलंनीही एका ठिकाणी लिहून ठेवलंय, ‘की जी गोष्ट सरकारी असते तिचा सामान्य जनतेशी काही संबंधं नसतो अशी सामान्य जनतेची समजूत असते म्हणून.’
मलाही वाटतं की आपण आता हळुहळू ‘जयहिन्द’ ह्या अभिवादनाचा वापर रोजच्या जीवनात करायला हरकत नाही. परंतू असं बोलणं आपण ‘गुड माॅर्निंग’, ‘गुड आफ्टरनून’ किॅवा ‘गुड इव्हनिंग’ व ‘गुड नाईट’ आणि नमस्कार, रामराम, सलाम, सत् श्री अकाल वैगेरे बोलतो ना, त्याच सहजतेने व्हावं. त्यात कोणतीही आणि कुणाचीही जबरदस्ती होता कामा नये असंही मला वाटतं. कोणत्याही गोष्टीचं कम्पलशन झालं की त्या गोष्टीवा वेगळाच रंग चढतो. इंद्रधनुष्यात गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या रंगांनी व त्या रंगांवर दावा करणारांनी आधीच आपल्या देशात आपापसांत उभा दावा मांडलाय, त्यात आणखी एक वाद नको.
‘जयहिन्द’ किंवा तत्सम काही बोलण्याची सक्ती होता कामा नये. ते अभिवादन आपसूकपणे आणि प्रेमाने आपल्या तोंडात यायला हवं. आपण श्वास घेतो ना, तितक्या सहजतेनं..अशाप्रकारच्या अभिवादनाचा संबंध देशप्रेमाशी असावा, देशभक्तीशी नाही. प्रेमात कोणतीही गोष्ट जबरदस्तीने होऊ शकत नाही. कोणत्याही गोष्टीची सक्ती केली की त्यातली गम्मत संपून जाते. ‘भक्ती’त गंडवागंडवी असू शकते, प्रेमात नाही.
हे थोडसं डायबेटीसच्या पेशंटने चालण्यासारखं असतं. चालणं हा एक आनंददायी प्रकार आहे. पहाटेच्या वेळी किंवा सायंकाळी आल्हाददायक हवेत चालणं हा सुरेख प्रकार असतो. रोज सकाळ-संध्याकाळ स्वमर्जीने चालणाऱ्या माणसाला एक दिवस त्याला डायबेटीस असल्याचं त्याचे डाॅक्टर सांगतात आण औषधांसोबत रोज काही वेळ चालण्याचा आदेशवजा सल्ला देतात. इथे गणित बदलतं. रोज सकाळ-संध्याकाळ आनंदाने चालणाऱ्या त्या माणसावर आता चालण्याचं ‘कम्पलशन’ होतं आणि दुसऱ्याच दिवसापासून त्याचं प्रेमाने फिरणं नाईलाजात बदलतं व हळूहळू पूर्णपणे थांबतं. तसचं अभिनादनांचं आहे, ते आनंदाने, एका उर्मीने केलं तरच त्यात मजा असते अन्यथा मनात कोणताही विपरीत भाव नसूनही ती एक सजा वाटू शकते.
राम-राम, नमस्कार, सत् श्रीअकाल, सलाम, जय महाराष्ट्, जय भीम वैगेरे देशी अभिनादनं जाती-धर्मांनी वाटून घेतलीत. अभिवादन हा संबंधं जास्त उबदार करण्याचा प्रकार असल्याचा समज आपण वगळता उर्वरीत जगात आहे. फक्त आपलाच देश हा प्रकार ‘दंगली’ उद्भवण्यास कारणीभूत असतो असं मानतो. या सर्वांवरही ‘जयहिन्द’ हा उत्तम उपाय ठरू शकतो, अर्थात प्रेमाने केलं तरच..! पण एक अट आहेच, ‘जयहिन्द’चा संबंध कुठल्याही ‘इझम’शी लावता कामा नये नाहीतर दंगली उसळायला देशप्रेम हे आणखी एक कारण तयार होईल..! तसंच त्याचं सरकारीकरणही होता कामा नये; कारण पुलंनी म्हटल्याप्रमाणेच, ‘की जी गोष्ट सरकारी असते तिचा सामान्य जनतेशी काही संबंधं नसतो अशी सामान्य जनतेची समजूत असते म्हणून..!’
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply