गेले काही दिवस माझ्या मनात ‘विश्वास’ या विषयावर विचार येत होते. खरच विश्वास ठेवावा का कोणावर? कि ठेवूच नये? एखाद्यासाठी आपण जीवाला जीव द्यायला तयार होतो तो विश्वासानेच कि आपल्यावर तशी वेळ आली कि ‘तो एखादा’ तसेच वागेल या अपेक्षेने..? अशासारख्या अनेक प्रश्नांनी मनात गुंता झला होता..असे प्रश्न निर्माण होण्याला माझ्या काही जवळच्यांची प्रत्यक्ष पाहिलेली तशीच कारणंही होती..
मी काही जणांना, ‘आयुष्यात जे माझे होईल तेच तुमचं होईल’ काही जणांना वचनपूर्वक सांगताना पाहिलंय आणि पुढे असं सांगणारा आयुष्य मजेत काढताना, ज्याला तो हे सांगत होता त्याला भिक मागतानाही पाहिलंय..ज्याला सांगितलं त्याने त्या सांगणाऱ्यासाठी आयुष्य ओवाळून टाकल होत..मग यात चूक कोणाची? सांगणाऱ्याची की त्या सांगणाऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्याची..की परिस्थितीची? इथे मला त्या वेळ येताच पायाखाली पोर घेणाऱ्या माकडीणीची गोष्ट आठवते आणि मनुष्य देवाचा अंश नसून माकडाचा वंशज आहे याची खात्री पटते..अशा वेळी मग सर्व वचनं सोयीस्करपणे विसरली जातात आणि विश्वास न्यायालयातील गांधीजींसारखा भिंतीवरील खिळ्याला टांगला जातो..विश्वास, श्रद्धा, प्रेम ह्या सर्व मग फक्त सांगण्याच्या गोष्टी असतात, प्रत्यक्षात आणण्याच्या नसतात याची खात्री पटते..
असं असलं तरीही विश्वासाने कोणाच्या तरी खांद्यावर मान टाकावीच लागते हे सत्य शेवटी उरतच..जीवन जगण्यासाठी ‘विश्वास’ प्रत्यक्षात कोणावर नसला तरी नशिबावर तरी ‘विश्वास’ ठेवावाच लागतो..जीवनात आजच उद्या नसत, उद्याचा दिवस काहीतरी वेगळं, उत्साहजनक किंवा आणखी निराशाजनक, घेऊन येणार आहे या आशेवर तरी विश्वास ठेवावाच लागतो..तरीही आयुष्य ओवाळून टाकलेली माणसं कुठच्या कुठे पोहोचलेली पाहून ज्याने आयुष्य ओवाळून टाकल त्यांची स्थिती पाहून वाईट तर वाटतंच..निरपेक्ष प्रेम, कर्मयोग या गोष्टी ठीक आहेत परंतु जगण्यात अपेक्षा ही असतेच..असलीच पाहिजे, नाहीतर टोकाचा आनंद आणि टोकाचे दुखःही अनुभवता येणार नाही..
— नितीन साळुंखे
9321811091
astroganesh.in
salunkesnitin@gmail.com
Leave a Reply