चंचल मन हे चंचल धारा, पंख पसरीत उडे भरारा ।
झेप घेवूनी उलटी सुलटी, लक्ष तयाचे चमकत तारा ।।
लुकलुकणारे तारे अगणित, नभांग सारे प्रसन्न चित्त ।
ताऱ्यावरूनी ताऱ्यावरती, झोके घेते सहज अविरत ।।
वेळ क्षणाचा पुरतो त्याला, टिचक्या टपल्या मारीत गेले ।
आवर घालणे कठीण होता, चटकन निसटून हातून गेले ।।
कोठून येते त्याला शक्ती, सटकून जाण्याची ही युक्ती ।
अन्न पाणी हे कसे घेई ते, पचनी सारे कसे पडते ।।
हटवादी हे असे केवढे, नको तिथेची जाय बापडे ।
देहाला त्या भोग देऊनी, भोग भोगण्या लावी तेवढे ।।
स्वैराचारी बंध मुक्त ते, देहावरती राज्य करीते ।
अवचित मिळता संत महात्मा, बंधनात ते अडकून पडते ।।
राज्य उलटते सारे आता, मनावरती ताबा बसता ।
माया जाते हारून जेथे, ब्रह्मरूप ते सारे होता ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply