मन्ना डे यांचे खर नाव प्रबोधचंद्र डे असे होते. मन्ना डे, यांना खरे तर पैलवानकी करायची होती. त्यासाठी ते कोलकात्यात तालमीत पैलवानांकडे सरावही करायचे. त्यांचा जन्म १ मे १९१९ रोजी झाला. पण चष्म्यामुळे त्यांना त्यांचं हे स्वप्न पूर्ण करता आलं नाही. कुस्ती खेळताना चष्मा आडवा येऊ लागला. अखेर पैलवानकीचा नाद सोडून महाविद्यालयीन जीवनात ते संगीताकडे वळले. कोलकाता येथील विद्यासागर कॉलेजमध्ये त्यांनी संगीतसाधना सुरू केली. त्या वेळीही त्यांच्या मनात शास्त्रीय संगीत की फिल्म संगीत असा संभ्रम होता. मन्ना डे यांचे वडील पुमाचंद्र डे हे चार्टर्ड अकाउंटंट होते, मुलाने बॅरिस्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु मन्ना डे यांना तोपर्यंत आपल्या काकांसारखे म्हणजेच के. सी. डे यांच्यासारखे अभिनेते, गायक होण्याच्या ध्यासाने पछाडले होते. के. सी. डे हे न्यू थिएटर्समध्ये काम करीत असत. त्यांनी मन्ना डे यांना आपला शिष्य केले आणि तिथूनच मन्ना डे यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात झाली.
मन्ना डे यांचे काका के.सी.डे हे संगीतातील तज्ञ. मन्ना डे हे नावही के. सी. डे यांनीच ठेवले होते. त्यांनी एस.डी.बर्मन यांना संगीताचे धडे दिले होते व अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले होते. पार्श्वगायनाची सुरवात मा. मन्ना डे यांनी १९४२ मधील ’तमन्ना’या चित्रपटापासून केला.’तमन्ना’चे संगीत दिग्दर्शक के.सी.डे हेच होते मन्ना डे यांनी सुरैय्याबरोबर “जागो आयी उषा “हे युगलगीत गायिले होते. मन्ना डे ची खरी ओळख त्यांच्या “बसंत बहार ” मधील “सुर ना सजे” मुळे तसेच “श्री चारसौबीस” मधील “प्यार हुआ “सीमा मधील”तू प्यारका सागर है””दो आंखे बारह हाथ”मधील “ऐ मालिक तेरे बंदे हम” किंवा “लागा चुनरीमे दाग” अश्या निवडक गीतातूनच झाली. राजकपूरसाठी त्यांचा आवाज काही चित्रपटातून वापरला गेला व तो योग्यही वाटला. शास्त्रीय संगीतावर आधारित गीते म्हणण्याविषयी कुशल अशी प्रसिद्धी असूनही मन्ना डे यांची अवखळ गीतेही तितकीच प्रसिद्ध झाली. विशेषत: रफी यांच्याबरोबर गायलेले परवरिश चित्रपटातील “मामा ओ मामा”किंवा चलतीका नाम गाडी”मधील “बाबू समझो इशारे” किंवा “पडोसन” मधील किशोरकुमारबरोबर गायलेले “एक चतुर नार” ही गीते त्याची साक्ष देतात.
मन्ना डे यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली भाषेत गाणी गायली आहेत. मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्य गीतांची संख्या इतर कोणाही मराठी गायकाच्या (एक बाबूजी सोडले तर) तोडीस तोड आहे.त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत ” अ आ आई म म मका “(चित्रपट एक धागा सुखाचा) :धुंद आज डोळे” (चित्रपट दाम करी काम). त्याचबरोबर “घन घन माला नभी “(चित्रपट वरदक्षिणा) ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते.”घरकुल” चित्रपटातील “हाउस ऑफ बॅम्बू “हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते. मन्ना डे यांचे २४ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply