माणसांची अलोट गर्दी
अनोळख्या ओळखी,
आयुष्याच्या पटावरी
भेटतील माणसं वेगवेगळी..
कोण कुठे कसा राहतो
दूर दूर असतील घरटी,
बंध जुळतात जेव्हा
ओळख होईल तेव्हा थोडी..
कुठे जास्त कुठे कमी
माणसं आयुष्यात येती,
नियतीचे सूत्र सारे अनामिक
कुणी जवळ कुणी दूर जाती..
आयुष्याच्या पटावरी
जमा खर्च आलेख होई,
प्रारब्ध न चुके कुणाला
कोण कधी जीवनात येई..
जीवन हा खुला रंगमंच
माणसांची अनोखी गर्दी,
मुखवटे हजार भवती सारे
जवळ असतील थोडे काही ..
आयुष्य एक गणित सारे
कुठे कशी ओळख होई,
असतील ऋणानुबंध कुठले
तर कोण आयुष्य व्यापून जाई..
ओळख अशीच अवचित होते
कोण भेटे कुठल्या टप्यावरी,
पुसून जातील ओळखी जरी
परी आठवणी हृदयात साठती..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply