अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मध्ये प्रा. डॉ. श्रीकांत तारे यांनी लिहिलेला हा लेख
दिवस जसेजसे जुने होऊ जातात तसतसा त्यांचेवर सोन्याचा मुलामा चढू लागतो. सारेच जुने सोने असते की नाही ठाऊक नाही, पण जुने दिवस निश्चितच सोनेरी असतात हा माझा आजपर्यंतचा शाश्वत अनुभव आहे.
वर्तमान कितीही चांगले, अगदी सुखाच्या राशीवर लोळणारा असू दे, जुने दिवस आठवले की प्रत्येकाला ‘या वर्तमानापेक्षा तो भूतकाळ चांगला होता,’ याची अचानक जाणीव होते. अर्थात प्रत्येक माणूस नॉस्टॅल्जिकच असतो असे नाही. पण मागे वळून बघताना आठवणींच्या उंबऱ्यावर थबकल्याशिवाय तो पुढे सरकतच नाही. ‘मुकं करोति वाचालम्’ ही म्हण प्रत्यक्षात बघायची असेल तर कुणासमोर जुन्या दिवसांचा विषय काढावा. मुखदुर्बळ माणसाच्या जिभेवरही सरस्वती विराजमान होते, त्याच्या प्रतिभेला धुमारे फुटतात, स्वर अचानक बदलतो आणि कितीही कठोर माणूस असला तरी त्याच्या नाकातून एक थंडगार उसासा आणि तोंडातून ‘काय सांगू, गेले ते सोनेरी दिवस’ हे वाक्य बरोबरच बाहेर पडतात.
अगदी कालपरवाची घटना. माझी विशीची एक विद्यार्थिनी कॅबीनमध्ये आलेली. मला पूर्वी वाटायचे की भूतकाळाचा हा रंग वाढत्या वयातच गहिरा होतो पण त्या दुपारी ती आली, बोलली आणि जुन्या दिवसांवर सर्व वयोगटातील माणसांचा समान अधिकार असतो हा साक्षात्कार मला झाला. ही विद्यार्थिनी स्कॉलर आहे, फारच कमी बोलते, सहसा कुणासमोर आपले मन उकलत नाही. वडील बँकेत होते. अति दारू पिऊन पाच वर्षांपूर्वी वारले. त्यांच्या जागेवर हिच्या आईला नोकरी मिळाली आणि आता सर्व एकदमच व्यवस्थित आहे, पण भूतकाळातील बऱ्यावाईट अनुभवांचा कडवटपणा, हिच्यावात उतरल्याचे मला बरेचदा जाणवलंय. आज हिने तपासायला दिलेल्या वहीत लिहिलेली एक सामान्यशी कविता मी चुकून वाचली. औपचारिकता म्हणून, वही परत करताना हिचे अभिनंदन करून कविता आवडल्याची पावती दिली आणि ही अनपेक्षित खुलली. ‘बाबा होते तेव्हा खूप हाल व्हायचे आमचे, त्यांना चांगला पगार असूनही घरात काहीच नसायचे. सारा पैसा दारूत जायचा आणि घरातल्या साध्या गरजांसाठी आईला इतरांसमोर हात पसरायला लागायचा.’ हिचा सारा संकोच गळून पडला होता. किती बोलू अन् किती नको असे हिला वाटत असावे. ‘जाऊ दे ग बेटा, कशाला जुने दिवस आठवतेस.’ मी सांत्वन करायला गेलो तर हिने जोरजोरात नकारार्थी मान हलवली. ‘नाही सर, मी तक्रार नाही करत, मला आता वाटतेय ते दिवस किती छान होते. आई संपूर्ण वेळ द्यायची मला, अभावामुळे आम्ही सारे शिस्तीत होतो, जे मिळतेय त्याची किंमत होती आणि अचानक एखाद्या वेळेस ताटात पडणाऱ्या पोटभर जेवणाला चव होती. बाबा सहसा शुद्धीत नसायचे पण मूडमध्ये असले की जवळ घेऊन खूप लाड करायचे. कधीतरी मी इंजिन व्हायचे, माझ्या फ्रॉकला धरून तेही माझ्या मागे धावायचे. आमची आगगाडी घरभर फिरायची. आता नुसत्या जुन्या आठवणी उरल्यात. सारे जगच कसे यांत्रिक झालेय सर, नाही? तेव्हा कळले नाही, पण उडून गेलेले ते सोनेरी दिवस आता खूप मिस करतेय सर,” विशीची ही पोरगी मला सांगत होती आणि मी ते पटवून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. एकवार मला वाटले, माझी सहानुभूती मिळविण्यासाठी ही नाटक करतेय, पण नाही. तिच्या चेहऱ्यावर प्रामाणिकपणा ओसंडून वाहत होता. सोनेरी भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांनाही ‘गेलेले दिवस सोनेरी होते असे वाटते हे बघून मी अवाक् झालो. तिला इतक्या कमी वयात आठवणारे बालपण माझे मलाही आठवते अधूनमधून, पण ते माझ्या पिढीच्या इतर मुलांच्या तुलनेत फार काही वेगळे होते असे नाही वाटत.
माझे बालपण अगदी सुखात लोळण्यात गेले असे नाही, पण चाळीस पत्रास वर्षांपूर्वी ज्याला मध्यमवर्गीय म्हणायचे त्या मध्यमवर्गीय कुटुंबात ते बरे गेले. दोघे कमावणारे, दहा खाणारे, मर्यादित गरजा, सुखाच्या खूप आटोपशीर कल्पना, सामान्य घरात पन्नास वर्षांपूर्वी असावे तसे एक सर्वसामान्य माझे बालपण मला बऱ्यापैकी आठवतेय. सायंकाळी आम्ही भावंडे शाळेतून परतायचे तेव्हा आई फोडणीचे पोहे करायची. स्टोव्हमध्ये रॉकेल भरून, त्याला चारचारदा पिन मारून, आई एक लोखंडाची पसरट कढई त्यावर ठेवायची. त्यावर चमचाभर तेल, त्यात नुसती मोहरी, कांदा, मिरची, हळद आणि मीठ बस, इतकेच असायचे आईच्या हातच्या पोह्यात, पण फोडणी टाकल्यावर त्या सुवासानेच पोटातली भूक खवळून उठायची. आई पोहे करीत असताना जो घमघमाट घरभर पसरायचा, तसा वास पसरत नाही आजकाल. पसरत असला तरी तो माझ्या नाकापर्यंत पोहोचत नाही. मला आता जाणवतेय की खूप दिवसात तशी कडकडून भूकच लागली नाहीये. तसे बघायला गेले तर सारे काही सुरळीत आहे, वेळच्या वेळी खाणे, फिरणे, नियमित दिनचर्या, धडधाकट शरीरयष्टी, बाजारातील सर्वोत्कृष्ट क्वालिटीचेच महाग पोहे आणि तरीही पोह्याच्या फोडणीतील तो सुगंध हरवलाय. मला त्या वासाची मधूनच हुरहूर लागते, नव्हे तो मिळविण्यासाठी जीव कासावीस होऊ लागतो. हिला इच्छा बोलून दाखविल्यावर ही पोहे घालते भिजायला, पण त्या वासाच्या हव्यासामुळे असेल कदाचित, हिने प्रेमाने, अगदी खास माझ्यासाठी रांधलेले पोहे बेचव लागू लागतात, काहीतरी हरविल्याची जाणीव होऊ लागते. नक्की काय हरवलेय? ती भूक की आईच्या हाताने टाकलेली फोडणी, की एकगठ्ठा हे दोन्ही, खूप विचार करूनही माझ्याच या प्रश्नाचे उत्तर मला नाही मिळत.
स्वयंकष्टाने मिळविलेला सुखी वर्तमान असूनही, आठवणींच्या उंबऱ्यावर मी अधूनमधून अडखळतो. पोह्यांचा घास तोंडातच फिरू लागतो, समोर धुके पसरले जाते, माझे बालपण मी त्या धुक्यात शोधायला लागतो.
इतर लहान मुलांप्रमाणे मलाही गोष्टी ऐकण्याचे अमाप वेड होते. माझी आजी रोज सायंकाळी आम्हा भावंडांना एक तरी गोष्ट सांगत असे. अंधार पडल्यावर खेळून घरी परतल्यावर आमची एक निश्चित दिनचर्या असे. हातपाय धुवून देवाला, घरातील सर्व वडील मंडळींना खाली वाकून नमस्कार करायचा, पाठोपाठ रामरक्षा मग परवचा, पाढे मोठ्याने म्हणावे लागायचे. प्रत्येक शब्दाकडे आजोबांचे बारीक लक्ष असे. एखादा आकडा चुकला की ते पुन्हा सुरुवातीपासून तो पाढा म्हणायला लावीत. परवच्याच्या नेमक्या वेळी आजोबा कुठे लांब असले की तेवढ्यापुरती आमची चंगळ असायची. मी आणि माझी बहीण दोघेही परवच्याच्या नावाखाली अक्षरश: काहीही बरळायचे. आजीला फक्त पाचपर्यंत पाढे यायचे यापुढील तिला काही कळायचे नाही. मग मी तिला, ‘आम्ही मनातल्या मनात पाढे म्हणून टाकले’ असे सांगून जेवायला पळायचे. ‘मनातल्या मनात पाढे म्हणणारी माझी नातवंडे किती हुशार’ हा भाव तिच्या डोळ्यात आम्हा भावंडांनी कितीतरी अनुभवलेला आहे. हे सारे उरकले की मग जेवणाची पंगत बसायची. पहिल्या पंक्तीला घरचे सारे पुरुष आणि आम्ही लहान मुले आणि ही पंगत उठल्यावर दुसऱ्या पंक्तीला साऱ्या बायका. ही दुसरी पंगत संपायची मी आतुरतेने वाट बघायचा कारण ही पंगत संपल्याबरोबर आई आवरासावर करायला लागायची, आजी आम्हा मुलांना जवळ घेऊन बसायची आणि मग सुरू व्हायची एक गोष्ट.
माझ्या दोन्ही आज्या म्हणजे वडिलांची आई आणि आईची आई उत्तम गोष्टी सांगायच्या. अर्थात गुणवत्ता सारखी असली तरी दोघांचे विषय मात्र टोकाचे असत. इकडची आजी भुतांच्या आणि राक्षसांच्या गोष्टी सांगत असे. या गोष्टीच्या सुरुवातीला यातील भूत माणसावर कुरघोडी करीत त्याचा छळ करून त्याला जीव नकोसा करून टाकायचे. आजीच्या या गोष्टीतील भूत एकदा तरी यातील मानवाला, ‘मी तुला खाऊ?’ असा प्रश्न विचारत असे. हा प्रश्न विचारताना आजी दोन्ही हातांच्या बोटांची उघडझाप करीत या प्रश्नाचे गांभीर्य वाढविण्याचा प्रयत्न करीत असे. मग या कथेतील एखाद्या बुद्धिमान माणसाचे म्हणजे बहुधा नायकाचे एकदम डोके चाले, त्याच्या सुपीक डोक्यातून एखादी कल्पना येऊन तो माणूस त्या दुष्ट भुताला चांगला इंगा दाखवी. मानवाचा विजय होई आणि भूत किंवा राक्षस किंवा सत्सम खलशक्ती माणसाला शरण जाई.
कितीतरी वर्षं, म्हणजे आम्हा भावंडांना समज येईपर्यंत या आजीच्या त्याच त्या गोष्टी आम्ही आवडीने ऐकायचे. आजीच्या या कथेतील फक्त पात्र बदलायची. म्हणजे कधी राजकुमार आणि त्याला जंगलात भेटलेली हडळ तर कधी एखादा गरीब ब्राह्मण आणि त्याला घाबरवणारा ब्रह्मराक्षस इतकाच काय तो फरक, पण घटना त्याच. अगदी संवाददेखील तेच असायचे. अशिक्षित आजीला हे सर्व कसे सुचायचे हे तो वेताळच जाणे. आम्ही पण कधी भीती तर कधी मानव विजयाच्या आनंदात निद्रेच्या स्वाधीन होत असू. तिच्या जवळ जवळ सगळ्याच कथा आम्हाला संवादासकट पाठ होत्या. पुढे पुढे तर तिच्याकडून एखाद्या तपशीलात किंवा संवादात चूक झाली की आम्हीच ती चूक सुधारून देत असू. आजीही, ‘अरे, ती कालची गोष्ट होती, आजच्या गोष्टीतला राजकुमार वेगळा आहे’ असे सांगून आम्हालाच शेंड्या लावायचा प्रयत्न करायची. या भयकथा ऐकताना माझ्या बहिणीला कधीमधी भीती वाटत असे. ‘आजी, तू नेहमी भीती वाटणाऱ्या गोष्टी का सांगतेस गं?’ असा प्रश्न एकदा तिने विचारला असता आजोबांनी, ‘तिचा राक्षसगण आहे,’ असे की उत्तर परस्पर देऊन आजीचा रोष ओढवून घेतला होता.
तिकडच्या आजीचा म्हणजे आईच्या आईचा मात्र देवगण असावा. सुटीत आम्ही भावंडांचे मामाकडे राहायला जायचे मुख्य आकर्षण तिकडच्या आजीच्या गोष्टी हेच असे. ही आजी फक्त आणि फक्त देवादिकांच्या आणि भक्तांच्या गोष्टी सांगायची. तिकडच्या आजीच्या बहुतांश गोष्टी रडक्या असत. अगदी जेमिनी पिक्चरसारख्या. यातील नायकावर प्रचंड नैसर्गिक संकटे यायची, काही नायक शनिदेवाच्या कोपाने पार धुळीत लोळायचे तर काही दुर्गामातेच्या रागाने जमीनदोस्त व्हायचे. तिच्या गोष्टीत कधी कधी देवही चमत्कारिकच वागायचे. चांगले जीवन जगणाऱ्या आणि दिवसातून तीन वेळा देवाची पूजाअर्चा करणाऱ्या एखाद्या भक्ताची परीक्षा घ्यायची लहर मधूनच या देवाला येई आणि मग भक्ताकडून लहानसहान चूका घडवून ईश्वर त्याला संकटाचा सामना करायला लावी. नेहमीप्रमाणे एक गरीब बिचारा वगैरे ब्राह्मण बऱ्याच वर्षानंतर आपल्या गावी परतल्यावर त्याच्या तरुण मुलीला समोर पाहतो, या ब्राह्मणाच्या उजव्या बाजूला एक देऊळ असूनही मुलीच्या भेटीच्या ओढीपायी त्याचे देवळाकडे दुर्लक्ष होते आणि त्याची शिक्षा म्हणून या देवळातील देव त्याच्या प्रिय मुलीला विद्रूप करतो, अशी एक गोष्टही आजी सांगायची. चूक ब्राह्मणाची तर शिक्षा मुलीला देऊ नये इतके साधे धोरण या देवाला नसे. मग ब्राह्मण कुटुंबाची काळीज पिळवटून टाकणारी रडारड, देवाची रात्रंदिवस मनधरणी, साऱ्या कुटुंबाचे व त्याच्या घरी संवेदना प्रकट करायला आलेल्या पाहुणारावळ्यांचे देवळातच ठाण मांडून बसणे, मुलीला पूर्वीचे रूप परत कर नाही तर जीभ हासडून इथेच प्राण देईल वगैरे धमक्या, अगदी टिपीकल दाक्षिणात्य सिनेमासारखा मेलोड्रामा तिकडच्या आजीकडून आमच्या समोर उभा केला जायचा. आम्ही पोरे टोरे मनातल्या मनात त्या अनोळखी देवळात जाऊन बसायचे. ‘ए बाबा, का त्रास देतोस उगाचच त्या गरीब कुटुंबाला? सोडव की आता सर्वांना. दोन दिवसांपासून बसले आहेत तुझ्यासमोर. पोटात अन्नाचा कण नाही, घशात पाण्याचा थेंब नाही. काय हवा तो नैवेद्य घे मागून आणि कर आता तरी सुटका साऱ्यांची.’ अशी मनोभावे विनंती तेथील देवाला करायचे. बहीण तर डोळे मिटून, हात जोडून असल्या नसल्या साऱ्या देवांचा धावा करत बसायची. मग आम्ही सर्व श्रोत्यांचे प्राण पुरेसे कंठाशी आल्याची खात्री पटल्यावर आजीला म्हणजे त्या देवळातील देवाला पाझर फुटत असे. तो देव त्या ब्राह्मण कन्येला पूर्वीपेक्षा अधिक देखणे रूप द्यायचा, तेथून उगाचच फिरतीवर निघालेला एखादा चुकार राजकुमार तिला मागणीबिगणी घालायचा. आम्ही सारे याच्या लग्नाच्या पंगतीत काय मेन्यू करायचा हे ठरवित मस्त झोपी जायचे. आता जाणवते, या दोन्ही आज्या आमच्या समोर जिवंत वाटावे असे एक कल्पनाविश्व निर्माण करायच्या. त्यात बराचसा संघर्ष आणि शेवट गोड किंबहुना संघर्षाशिवाय शेवट गोड होत नाही असा संदेश अजाणता त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून देण्याचा प्रयत्न त्या करायच्या. गोष्टी ऐकण्याची आणि पुढे जाऊन कथा सांगायची गोडी लहान वयातच या दोघींमुळे मला लागली.
परवा लहानपणी मी भरपूर हूड, व्रात्य वगैरे होतो, आईचे माहेर अगदी दहा मैलावरच होते पण मधूनच आजोबांचे आईला पत्र यायचे, त्यात तिला माहेरी बोलवताना, ‘काही दिवस एकटी आलीस तर घटकाभर का होईना बसून निवांत बोलता येईल’ असे सूचक वाक्य आजोबा टाकायचे. आठवून आज त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो मी, पण निश्चित काही विचारायला आजोबा आणि आई दोघेही आता नाहीत. आजोबांचे एक लहानसे देखणे देवघर होते. सोवळे नेसून, कपाळाला डोक्यापर्यंत गंध लावून उघड्या अंगाने सकाळी दोन अडीच तास त्यांची पूजा चालायची. निरनिराळ्या देवांच्या फुलांनी सजवलेल्या लहानमोठ्या पितळी मूर्ती समईच्या प्रकाशात उजळून निघायच्या. पूजा आटोपली की आजोबा झोपाळ्यावर बसून पेपर वाचता वाचता चांगला पेलाभर चहा घ्यायचे. ही वेळ त्यांची खाजगी वेळ असे आणि या अर्ध्या पाऊण तासात कुणाचीही दखल ते खपवून घेत नसत. माझी तक्रार यावेळी त्यांचेकडे कुणीही नेण्याचे धाडस करणार नाही हे ठाऊक असल्याने मी देवघरात शिरून त्यातले देव आवाज न करता देव्हाऱ्याबाहेर काढून त्यांची झुकझुक गाडी करीत असे. गणपतीचा मान पहिला हे इतक्या लहानपणापासून रक्तात भिनलंय की देवाच्या आगगाडीचे इंजिन म्हणजे गणपतीची तांब्याची मूर्ती हवी हा माझा हट्ट असे. रामपंचायतनातील मारुती मात्र शेवटाला. इतक्या सामर्थ्यवान देवांच्या गाडीचे रक्षण करायला गार्ड म्हणून वज्रांग हनुमानच हवा याची जाणीव तेव्हाही मला असावी. मला रांगता येऊ लागल्यापासून मी कॉलेजमध्ये जाईपर्यंत घरातील आठ फूट किंवा अधिक उंचावरील विजेचे दिवे सोडून काचेची कुठलीही वस्तू अभंग कुणी बघितली नसावी. क्रिकेटची प्रॅक्टीस तर घरात इतकी केलीय की वडिलांनी खिडक्यांना काच बसवायचा नादच सोडून शेवटी सोडून दिला. त्यांनी मोठ्या हौसेने आणलेला काचेचा टेबललॅम्प घरातील कुटुंबियांनी डोळा भरून बघण्यापूर्वीच मी लाथ मारलेल्या फुटबॉलमुळे इतिहासजमा झाला होता. त्या दिवशी वडिलांनी मला न्हाणीघर घासायच्या खराड्याने बदडले आणि नंतर तासभर मला छातीला कवटाळून रडत बसले. कोण जाणे का पण आमच्या घरात त्यानंतर कधीच कुणी टेबललॅम्प आणला नाही. तसेच आबांनी मोठ्या हौसेने आणलेल्या पितळी मुठीच्या काठीचा उपयोग मी हॉकी म्हणून केला आणि काठीचे दोन तुकडे आबांसमोर आपटत ‘तुमच्या काठीत काही दम नाही’ असा आगाऊपणा करून काठीच्या दोन्ही तुकड्यांनी पाठ सोलली जाईपर्यंत मार खाल्ला.
या व्रात्यपणामुळे घरच्यांना मी भरपूर त्रासही दिला. अर्थात आता कितीही वाईट वाटून घेतले तरी त्याला काही अर्थ नाही याची मला पूर्ण कल्पना आहे, पण काही घटना आठवतात आणि वडीलधाऱ्यांना झालेल्या त्रासाची जाणीव खोलवर होत राहते. इंदौरहून मुंबईला जात होतो तेव्हाची गोष्ट. पंजाब मेलने प्रवास करताना पूर्वी दादरला उतरायचे असले की कल्याण आल्यापासून सामान आवरायला सुरुवात व्हायची. मी, माझ्याहून दोन वर्ष लहान बहिण आणि आई असे तिघे दादरला उतरणार होतो. कल्याणला गाडी पोहोचली आणि आईने आवराआवर सुरू केली. मी बसलेल्या खिडकीच्या समोरून आईस्क्रीमची गाडी गेली आणि आइस्क्रीमच्या चित्रांचा तो रम्य देखावा शेवटपर्यंत दिसावा या अत्यंत शुद्ध उद्देशाने बराच प्रयत्न करून मी माझे डोके खिडकीच्या गजातून बाहेर काढले. झाला थोडासा त्रास, पण शेवटी ते मला जमले. गर्दीत आइस्क्रीमची गाडी दिसेनाशी झाली आणि मी डोके पुन्हा आत घ्यायचा प्रयत्न केला. साधा बांगडीत गेलेला हात सहजासहजी बाहेर निघत नाही, जिवंत माणसाचे, टेनिसच्या बॉलपेक्षा थोडे मोठे डोके गजातून सोडवता येतेय होय? मान वाकडी करून, खाली-वर करत मी डोके आत घ्यायचा प्रयत्न केला. पण काहीच जमेना. आधी हसू आले, मग मात्र माझा श्वास कोंडायला लागला. आता मात्र भोकांड पसरण्यावाचून मला गत्यंतर नव्हते. डब्यातल्या साऱ्या प्रवाशांचे आणि प्लॅटफॉर्मवरील बघ्यांचे लक्ष माझ्याकडे गेले आणि माझ्या खिडकीभोवती ही गर्दी गोळा झाली. गाडी सुटायची वेळ झाली आणि आईचा धीर सुटत चालला, बरे, चालत्या गाडीत डोकं गजाबाहेर असणे फारच धोकादायक होते. दरम्यान कुणीतरी धावत जाऊन गार्डला वर्दी दिली आणि गाडीचा थांबा वाढला. एवढ्या धुमश्चक्रीत कुणी चावट माणसाने ‘याचे डोके कापून आत घ्या रे’ ओरडल्याचे ऐकले आणि मी डोळे पांढरे केले. डोके पूर्वेकडे, देह पश्चिमेकडे अशा अवस्थेतला मी, अशाही स्थितीत मला शिव्या देणारी तरीही माझे डोके समूळ आत घेण्यासाठी प्रयत्नशील अनोळखी माणसे आणि गाडी चालू होऊ नये म्हणून बहिणीला कुणाच्या हातात सोपवून प्लॅटफॉर्मवर सैरावैरा धावणारी माझी आई हा देखावा एक काळ लोटल्यानंतर आजही माझ्या डोळ्यासमोर जशाच्या तसा उभा आहे. बहिणीने तर असा कल्ला केला की अगोदर कुणाला सावरावे हेच लोकांना कळेना. शेवटी महत्प्रयासाने खिडकीचे गज वाकवून जागा करण्यात आली व माझे डोके सहीसलामत प्लॅटफॉर्मवरून डब्यात शिरले. माझ्यासकट सारेच मोकळे झाले. सकाळच्या गर्दीची ती पाच सात मिनिटे खोळंबा झाल्याने लोकलच कोलमडलेले वेळापत्रक व त्यासाठी मी थेट कारणीभूत असल्याने असंख्य प्रवाशांचे घेतलेले तळतळाट मी आज सहजच समजू शकतो.
माझ्या व्रात्यपणामुळे असेच आणखी एकदा आम्ही संकटात सापडलो होतो. एका उन्हाळ्याच्या सुटीत आम्ही बहिणभाऊ, आई असे आत्याकडे गेलो होतो. आत्या ग्वाल्हेरनजिकच्या एका खेड्यात राहत होती व आम्ही शहरवासी मुले खेड्याचे मोकळे वातावरण पाहून फारच भारावलो होतो. आत्याच्या घराला भले मोठे अंगण, अंगणात विहीर, सोबतीला -आंब्याची, कडूलिंबाची झाडे, झाडांना बांधलेल्या गाई, जवळच बागडणारी वासरे. अहाहा, एकूणच आम्हा पोरांना धुडगूस घालायला आदर्श परिस्थिती होती. आई, आत्या वामकुक्षीला पहुडल्यावर सारे सामसूम झाल्याचा अंदाज घेत भर दुपारच्या जीवघेण्या उकाड्यात मी कैऱ्या काढायला झाडावर चढलो. फांदीवर बसूनच काही कैऱ्या स्वत: खाल्ल्या, काही खाली राखण करणाऱ्या आतेबहिणीच्या ओचरीत टाकल्या आणि तिच्यासमोर फुशारकी मारायला वर चढण्यासाठी पुढची फांदी धरली. ती ‘तू आणखी वर जाऊ नकोस’ ओरडली पण मी काहीही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हतो. फांदीवर चढलो, समोरच्या कैऱ्यांच्या घोसाला हात घातला व दाट पानांच्या आत लपलेले, आतापर्यंत न दिसलेले मधमाश्यांचे भलेमोठे पोळे मला अचानक समोर दिसले. शकुनाच्या चार दोन मधमाश्या त्यावर घोंघावत होत्या, बाकी साया दुपारचे जेवूनखावून गपगार झोपलेल्या असाव्यात. खरे तर हे सारे माझ्यापासून दोन हात अंतरावर होते आणि मी गुपचूप परतलो असतो तर हा तेनसिंग एव्हरेस्टपर्यंत पोहोचलाय याचा पत्ताही त्या सहृदयी मधमाश्यांना लागला नसता. पण आपल्या हातून काही विपरीत घटना न घडणे ही फारच नामुष्कीची बाब आहे असा माझा ठाम समज असल्याने मी उगाचच हात हलवला, त्या चलायमान मधमाश्यांना हाकलायचा प्रयत्न केला. त्यांनी हेड ऑफिसकडे तक्रार केली आणि अचानक मोहोळ उठले, माझ्या अपेक्षेबाहेर पोळ्यातील साऱ्या मधमाश्यांनी एकसाथ जागा सोडली व त्या माझ्याकडे घोंघावल्या. वारूळातून बाहेर पडणारा नाग व पोळ्यातून बाहेर पडणाऱ्या मधमाश्या हे दोन्ही जीवघेणे असू शकतात याची मला क्षणार्धात जाणीव झाली व मी झपाट्याने परतीच्या प्रवासाला लागलो. एव्हाना पोळे सोडलेल्या मधमाश्या माझ्या चेहऱ्यावर वस्तीला आल्या होत्या आणि तो रम्य देखावा बघून इतक्या वेळ झाडाखाली उभी राहून मला दिशानिर्देश देणारी माझी आतेबहीण, खाल्ल्या कैरीला न जागता घरात पसार झाली होती. क्षणार्धात साऱ्या मधमाश्या अंगणभर पसरल्या, त्यांच्या भीतीने बाहेर यायला कुणी तयार होईना. झाडावरून उतरताना माझ्या चेहऱ्याचे अक्षरश: पानिपत झाले होते. शरीराला वर्णनातीत प्रचंड वेदना होत होत्या व मी गुरासारखा ओरडत होतो. पाचसहा फुटावर मला जमीन दिसली व परिणामांची कल्पना न करता मी वरून खाली उडी मारली. माझ्या शरीरावर कुठेही जागा न उरल्याने मधमाश्यांनी आपले सुकाणू गुरांकडे वळवले आणि गुरे उधळली. आता मात्र चारपाच मंडळी कांबळी, चादरी व मशाली घेऊन बाहेर आली आणि अंगणाला युद्धभूमीचे स्वरूप आले. मी, मंडळी, गुरे, कोण कुठे धावतेय हे कुणालायच समजत नव्हते आणि हंबरडा फोडीत आई घराबाहेर धावत आली. लालबुंद चेहरा घेऊन मी तिच्या कुशीत शिरलो आणि… आणि बस, मला इतकेच आठवतेय. डोळे उघडले तेव्हा गावच्या सरकारी दवाखान्यातील एका पलंगावर मी पडलो होतो व बरेचसे गावकरी माझ्याभोवती गोळा झालेले मला दिसत होते. माझे पुढील दोन दिवस दवाखान्यातच गेले व आमचा आत्याकडील एक महिन्याचा दौरा आईने चौथ्या दिवशीच आटोपता घेतला. आजही गप्पा मारताना कुणी मधमाश्यांचा साधा उल्लेख जरी केला तरी मला अंगात कणकण जाणवायला लागते. खोटे नाही, पण मधमाश्यांना कळले तर त्या रागावतील या भीतीने गेली कित्येक वर्षे मी मधही खाल्लेला नाही.
माझ्या खोड्यांना सकारात्मक वळण लावून माझे आयुष्य सन्मार्गाला लावण्याचे श्रेय मी निर्विवादपणे माझ्या पहिल्या शाळेला देईन. ते एक शिशू मंदिर होते. पन्नास वर्षानंतरही माझ्या स्मरणात आणि हृदयात वसलेले एक सर्वांगसुंदर देऊळ. लहान, अगदी लहान मुलांच्या शाळेला सर्वप्रथम ज्या रचनाकाराने शिशू मंदिर हे नाव दिले त्याच्या सृजनात्मकतेला माझे लक्ष प्रणाम. ईश्वराचा अंश असणाऱ्या लहान बाळाच्या बागडणाऱ्या त्या थव्याला पाहणे एखाद्या देवळात जाऊन भक्तिभावाने देवदर्शन घेणे यात मला तरी यात मला काही अंतर जाणवत नाही.
कोणे एकेकाळी मी त्या शिशुमंदिरात शिकायला आणि खेळायला जायचो. घरापासून अर्धा एक मैल लांब, एका नावाजलेल्या खाजगी ट्रस्टची ती शाळा होती. तशा इतरही एक दोन मराठी शाळा होत्या, त्या शाळांमध्ये शिक्षणही बरे होते पण या शाळेच्या ट्रस्टच्या अध्यक्षांना पूर्वी कधीतरी राष्ट्रीय पातळीवर काही बक्षीस मिळाले असल्याने माझ्या पालकांनी मागचापुढचा विचार न करता या शाळेत मला पाठविण्याचा निर्णय घेतला असावा. ‘मी शाळेत जायचा’ म्हणण्यापेक्षा ‘शाळेत पाठवला जायचा’ म्हणणे अधिक योग्य ठरावे. माझ्यापेक्षा आठ वर्षे मोठी असलेला माझा भाऊ सुरुवातीला अक्षरश: उराखांद्यावर बसवून मला सायकलच्या मागच्या सीटवर कोंबायचा आणि जबरी शाळेत सोडून यायचा. घरापासून ते थेट शाळेपर्यंत भोकांड पसरून जिवाच्या आकांताने रडणारा मी व मला कसेतरी सांभाळत शाळेच्या जिन्यापर्यंत पोहोचवणारा आमचा चंदूभाऊ हा रस्त्यातील बघ्यांसाठी रोजचा मनोरंजक कार्यक्रम होता. सीताहरणाला सीतेने रामाचा केला नसेल इतका धावा मी आईचा करायचो. वर चंदूभाऊच्या खांद्याला चावणे, बुक्के मारणे, जमेल तसे ओरबाडणे वगैरे खेळही चालायचे. रस्त्यातील लोक त्याला ‘अरे, पोरगा पडेल ना सायकलवरून’ वगैरे वायफळ सूचनाही द्यायचे पण कुठल्याही परिस्थितीत मी मागच्या सीटवरून उडी मारणे शक्य नाही याची खात्री असल्याने चंदूभाऊ सुसाट सायकल हाणायचा. सुरुवातीच्या त्या दिवसात अकरा वाजेच्या सुमारास लोक अलार्म लावून आमचा तमाशा बघायला आपापल्या घराच्या दारात येऊन उभे राहात असावेत असे मला आजकाल उगाचच वाटू लागलेय. तसेच आता माझ्या घरावरून आई किंवा आणखी कुणाचा हात धरून उत्साहाने जाणारे एखादे साडेतीन चार वर्षांचे बाळ बघितले की मला माझे ते रडणे अधिकच आठवायला लागते. शाळेतून परतताना मात्र माझ्यासाठी आई सायकलवर यायची. मला तेव्हा घड्याळ कळत नसले तरीही शाळा सुटण्याची वेळ जवळ आलीय हे मला आपसूकच कळायचे. घ्यायला येणाऱ्या आईच्या वाटेकडे डोळे लावून बसणाऱ्या अनेक बालगोपाळांपैकी एक मी आघाडीवर असायचो. आईला डबल सीट सायकल चालवायची सवय नसल्याने मी मागील सीटवर आणि ती बिचारी सायकल ओढीत पायी असे रमत-गमत आम्ही घरी पोहोचत असू. शाळेतून परततानाचा माझा टवटवीत चेहरा बघून रस्त्यातील सकाळच्या खेळाच्या प्रेक्षकांना सकाळी आकांडतांडव करीत जाणारे ध्यान हेच का? असा प्रश्न खचितच पडत असावा.
आमच्या शाळेच्या सुरुवातीला मध्यम आकाराचे एक आवार होते. मुख्य इमारतीच्या खाली काही दुकाने होती. एक कुठल्यातरी सहकारी बँकेची काही जागा भाड्याने दिली होती. बँकेच्या बाजूने शाळेत जायला जिना होता आणि या जिन्याच्या पायथ्याशी शाळेच्या शिक्षिका आमचे स्वागत करायला उभ्या असत. हातपाय झाडत रडणारे पार्सल जिन्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी पालकांची असे. एकदा का आकांडतांडव करणारे हे गाठोडे जिन्यावरील शिक्षिकेच्या हातात सोपवले की आता आपली सुटका नाही या विचाराने हताश होणारी मुले हातपाय गाळून आपसूक बाईंच्या स्वाधीन होत. शाळेच्या सुरुवातीच्या दिवसात मी खूप तमाशा केला, अगदी तोंडाला फेस येईपर्यंत रडलो. ‘आज जर मला शाळेत जबरीने बसवलं तर मी जिवंत परत येईन याची शाश्वती देणे कठीण आहे’ असा देखावा आपल्या प्रचंड अभिनय क्षमतेने निर्माण करून दाखवला. डोळे पांढरे करून सगळ्यांना घाबरवण्याचा अचाट पराक्रम केला, पण माझ्या अपेक्षांविरुद्ध माझी आई, चंदूभाऊ आणि आमच्या प्रेमळ म्हणवल्या जाणाऱ्या शिक्षिका यापैकी कुणीच माझ्या प्रयत्नाला दाद देईनात. त्यावेळेस अभिनयाची एखादा ॲवॉर्ड मिळत असता तर मला सर्वश्रेष्ठ बाल कलाकार अभिनेत्याचा पुरस्कार नक्की मिळाला असता.शेवटी, आपल्या प्रयत्नांना कुणीच बधत नाही हे बघितल्यानंतर मी हळूहळू शाळेत रमण्याचा प्रयत्न करू लागलो आणि नकळत केव्हातरी ही शाळा मला आपली, अगदी आपली वाटू लागली.
अर्थात मला शाळेत गुंतवून ठेवण्याचे श्रेय आमच्या शिक्षिकांना निर्विवाद द्यायला मला कुठलाही संकोच नाही. हे लिहिताना माझ्या डोळ्यासमोर सतत येणारी एका युगांपूर्वीची शाळा मला स्पष्ट दिसतेय. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये ही शाळा भरायची. तिथल्या एका खिडकीत मोठ्या टाईपातील गोष्टीची पुस्तके वाचत बसलेला एक पाच सहा वर्षांचा मुलगा, खिडकीची हिरव्या रंगाची महिरप, त्यावर निळ्या काचा, खिड़कीत बसयला लाल दगड, दोन्ही बाजूने रंगवलेला काळा फळा, समोर लाकडी खुर्चीत बसलेल्या साधारण आईच्याच वयाच्या कुमुदताई, पुष्पाताई वगैरे शिक्षिका. माय गॉड, सकाळी काय भाजी खाल्ली हे आठवत नाही आजकाल पण तपकिरी रंगाचे नऊवारी नेसलेल्या कुमुदताई जणू काही आताही समोर बसून कविता शिकवत आहे इतके स्पष्ट सारे आठवतेय.
शाळेत गोष्टीची खूप मराठी पुस्तके होती. मोठ्या टाईपातील त्या मराठी पुस्तकांची गोडी मला इथे लागली. आम्ही सगळे बाल विद्यार्थी. विद्यार्थिनी घोळका करून खाली बसलो आहोत आणि पुष्पाताई, पुस्तकातली एखादी गोष्ट वाचून दाखवितात असे बरेचदा व्हायचे. त्या गोष्टीतील शब्द ऐकून कळायचे पण त्यातली चित्रे बघायला मात्र पुस्तक स्वतःच हातात घ्यावे लागे. या पुस्तकात इतरही आणखी काही असेल या उत्सुकतेने मी पुस्तके चाळायला, वाचायला लागलो आणि नकळत त्यांच्या आधीन झालो. मी हुशार विद्यार्थी कधीच नव्हतो परंतु एक चांगला वाचक म्हणून आयुष्यभर मिरविण्याची संधी मात्र या पुस्तकांमुळे मला लहानपणापासूनच मिळत आली आहे. आज मी जे काही मराठी वाचू लिहू शकतो त्याकरिता या शिक्षिकेचे ऋण मी सात जन्मात फेडू शकणार नाही.
आमचे घर सोडल्याबरोबर शाळेच्या वाटेवर एक रेल्वे उड्डाणपूल लागायचा. नशीब जोरावर असले की येता-जाता कोळशाच्या इंजिनाची एखादी रेल्वेगाडी दिसायची. मग मी शाळेत जाऊन सर्व मित्रांना आगगाडीची लांबी, काळा पांढरा धूर सोडणारे त्याचे काळेभोर इंजिन वगैरे देखावा वर्णन करून सांगायचो. मित्रांच्या चेहऱ्यावर ‘तुम्ही पुलाच्या पलीकडे राहणाऱ्यांबद्दल तर काय बोलावे बुवा, तुम्ही मुलखाचे नशीबवान…’ असे भाव दिसत की मी तृप्त तृप्त होत असे. ही शाळा शहराच्या मध्यावर असल्याने व त्याचा हॉल बऱ्यापैकी मोठा असल्याने त्याचा वापर कधीतरी मंगल कार्यालयासारखा व्हायचा. मधूनच एखादा समारंभ तिथे घडायचा. त्यादिवशी आम्हा लहान मुलांची रवानगी मोठे वर्ग भरत असलेल्या शेजारच्या इमारतीत व्हायची. मोठ्या मुलांच्या शाळेची ही इमारतही बरीच मोठी होती, या दुमजली शाळेच्या दोन्ही मजल्यावर वर्ग भरायचे. आमच्या लहान शाळेत मोकळे मैदान नसल्याने या मोठ्या शाळेच्या मैदानात लागलेल्या घसरगुंडी, झोपाळ्याचे आणि अपवादानेच चालू होणारे कारंजाचे आम्हाला कौतुक वाटायचे क्वचित हेवाही. पण पुष्पाताई, कुमुदताईंच्या पदराला धरून वावरण्याची सवय झाल्याने, आमची प्रेम करणारी लहान शाळा सोडून या मोठ्या शाळेत यायला आम्ही कधीही तयार झालो नसतो.
मंतरलेली चार वर्षे मी त्या इमारतीत काढली. ट्रस्टचे विश्वस्त या शाळेत क्वचितच येत. त्यांचा ओढा निश्चितच मोठ्या शाळेकडे असायचा, पण वर्षातून एक दोनदा इथे आल्यावर इथल्या शिक्षकांशी हे लोक अत्यंत आपुलकीने वागत. एका मोठ्या व नावाजलेल्या संस्थेचे आपण कर्ताधर्ता आहोत हा भाव मी त्या चार वर्षांत तरी त्यांच्या चेहऱ्यावर कधी बघितला नाही. माझ्या वडिलांची बदली झाल्यामुळे मला ही शाळा सोडावी लागली. मी शाळा सोडल्याचा दाखला घ्यायला आईबरोबर शाळेत गेलो तेव्हा आईच्या सांगण्यावरून प्रत्येक शिक्षिकेच्या पाया पडलो. मी खाली वाकल्याबरोबर प्रत्येक शिक्षिकेने मला पोटाशी धरले, ‘खूप मोठा हो’ म्हणाल्या. मी बहुधा हो म्हटले असावे कारण तिथे हजर असलेल्या प्रत्येकजण माझ्या बोलण्यानंतर मोठ्याने हसत होता. नावाप्रमाणे गुण असणारी माणसे जगात क्वचितच बघायला मिळतात, माझ्या शाळेच्या शालिनीताई नावाच्या अति शालीन मुख्याध्यापिका माझ्या स्मरणात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.
संस्थेने नंतर केव्हातरी सगळेच वर्ग मोठ्या इमारतीत हलवले, लहान शाळेची पूर्वीची इमारत पाडून खाली सहकारी बँकेचे मुख्यालय आणि वर मोठे मंगल कार्यालय बांधून काढले, त्याच्या चारी बाजूला आता कितीतरी दुकानांची भाऊगर्दी झालेली आहे. संस्थेची ही सर्वांत लहान शाळा सोडून मला पन्नासएक वर्षे उलटून गेली असावीत. शाळेच्या या रस्त्यावरून मी अनेकदा जातो, पण आपले जीवन ज्या संस्थेने घडवले ती शाळा बाजाराच्या गजबजलेल्या गर्दीत कुठे हरवली हेच कळत नाही. कधीतरी मी कुठल्याशा समारंभाला हिच्यासोबत त्या मंगल कार्यालयात जातो, ज्या खिडकीत बसून मी पुस्तके वाचायचो ती खिडकी, किमान ती जागा कुठे होती याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो. माझी भिरभिरणारी नजर बघून ही सहजच, ‘काय शोधताय?’ असा प्रश्न विचारते. तिच्या या प्रश्नाचे उत्तर ठाऊक असूनही मला देता येत नाही.
‘हरवलेले सोनेरी दिवस शोधतोय’ असे खरे उत्तर दिले तर ती मला वेड्यात नाही का काढणार?
-–प्रा. डॉ. श्रीकांत तारे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)
Leave a Reply