पहाटे कोचि विमानतळावर उतरलो, तेव्हा टॅक्सीवाल्याने मीटरच्या मापात पैसे घेतले. परतण्याच्या दिवशी हॉटेलला टॅक्सी बद्दल विचारले, तेव्हा त्यांनी (अपेक्षेप्रमाणे) अव्वाच्या सव्वा सांगितले. सहज रस्त्यावरून चक्कर मारत असताना कोचि टॅक्सी सर्व्हीस बोर्ड दिसला. तेथे उभ्या असलेल्या टॅक्सीवाल्याला विचारले- रात्री विमानतळावर सोडण्याचे भाडे किती घेशील? त्याने रास्त रक्कम ( पहाटेपेक्षा जास्त पण हॉटेलपेक्षा कमी) सांगितली- त्याला रात्री कदाचित परतताना भाडं मिळणार नाही, असं विचार करून मी होकारलो.
त्याचा नंबर घेतला. ट्रू कॉलर वर “जोशी टॅक्सी ” दिसला. हरखून विचारले तेव्हा तो त्याच्या भाषेत म्हणाला- ” होय. माझे आडनावं जोशी आहे. ”
“रात्री साडे दहा- हॉटेल ग्रँट ”
“हो ” त्याचे त्याच्या भाषेत उत्तर ! असाच अनमान धपक्याने आमचा संवाद सुरु झाला.
” कोचिचे विशिष्ट छोटे पापड कोठे मिळतील आणि (नातीला) हवा असलेला (कांतारा टाईप) मुखवटा कोठे मिळेल?”
समोर स्टेशन च्या जवळपास दुकानांवर असे त्याचे उत्तर आले म्हणून मी हिंडलो. हाती काही लागले नाही.
सायंकाळी आठ च्या सुमारास जोशीबुवांचा फोन- खुंटा हलवून बळकट करण्यासाठी.
मी कन्फर्मलो.
हॉटेल मधून चेक आऊटच्या आधी मी त्याला चेक केलं.
“सर, मी केव्हाचा हॉटेलच्या पार्कींग लॉट मध्ये येऊन थांबलोय.”
मी बाहेर पडल्यावर त्याने गाडी लावली. मी बसल्या बसल्या त्याने पापडांची चौकशी केली. मी नाही असे उत्तर दिल्यावर त्याने वाटेत एका दुकानापाशी गाडी थांबवली. पळत जाऊन मला हव्या असलेल्या पापडांचे दोन पॅकेटस आणले. मी पैसे त्याच्या हाती सुपूर्द केले.
साधारण तास-सव्वा तासाचा प्रवास असल्याने मी विचारले-
“आपका खाना हो गया? ”
या हृदयीचे त्या हृदयी पोहोचते आहे, हे लक्षात आल्याने आमचे धेडगुजरी संभाषण सुरु होते.
त्याने नकारार्थी मान डोलावली- तेव्हा अकरा वाजत आले होते.
“कां नाही?” विचारल्यावर त्याच्या लांबलचक वाक्याचा मला एवढाच अर्थबोध झाला की त्याचे घर दूर होते. जेवून हॉटेलवर परत येईपर्यंत मला उशीर अशी साधार भीती त्याला वाटली म्हणून टॅक्सी स्टँडवरून तो डायरेक्ट हॉटेलवर न जेवताच आला होता. मी त्याला सांगितले वाटेत गाडी थांबवू या आणि काहीतरी खाऊन घ्या तुम्ही !
माझा पुढचा अर्थबोध- मी शाकाहारी आहे, वाटेत अन्नपूर्णा जॉईंट असतील तर थांबवतो. कोचि मधील ऑथेंटिक शाकाहारी तेथेच मिळते.
वाटेत तसे तीन जॉईंट लागले पण बारा वाजून गेल्याने ते बंद झाले होते आणि तो हात हलवत कारकडे परतला.
एखाद्या कोल्डड्रिंक दुकानापाशी थांबवून आईस्क्रीम/लस्सी काहीतरी घ्या असं मी सुचविल्यावर ” सर,शुगर हैं ” असं ओशाळवाणं उत्तर आलं.
थोडं पुढे गेल्यावर त्याचा फोन वाजला. (मलाही सुमारे चाळीस वर्षांचा अनुभव असल्याने) तो त्याच्या सौं चा असावा, हे लक्षात आलं. हा सदगृहस्थ जरा गयावया करीत येतोच थोड्या वेळाने जेवायला घरी असं उत्तर देऊन फोन कट करता झाला.
“सर, बायकोचा फोन ! घरी जेवायला आलो नाही, उशीर झाला त्यांत मला शुगर म्हणून तिने काळजीने शेवटी फोन केला. थांबलीय तो माझ्यासाठी जेवायला.”
माझाच गळा रुद्ध झाला. आता हा गृहस्थ रात्री साधारण दोन वाजता घरी जाऊन जेवणार, हे सगळं माझी फ्लाईट चुकू नये म्हणून !
हा कोरोना फटक्यामुळे उध्वस्त झालाय आणि हाती येऊ शकणारी चार आकडी रक्कम खुणावतेय म्हणून असं आउट ऑफ द वे जातोय की दिलेला शब्द पाळण्याच्या अंगीभूत सौजन्यामुळे, मला टोटल लागेना.
मला विमानतळावर सोडताना म्हणाला- ” माझा नंबर आहेच तुमच्याकडे. पुन्हा आलात कोचिला की फोन करा.”
मी ठरल्यापेक्षा थोडी अधिक रक्कम त्याच्या हातात कोंबली आणि म्हणालो- ” जा, घरवाली वाट पाहात असेल.”
त्याच्या डोळ्यांत निरांजने उगवली.
दुसऱ्या दिवशी नातीच्या हातात विमानतळावर मिळालेला मुखवटा ठेवताना हा अनुभव तिला सांगितला.
कोचितील माणुसकीच्या सिम कार्ड चे नेटवर्क दूरवर पुण्यात तिच्या चेहेऱ्यावर जसेच्या तसे उमटले.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply