मराठ्यांच्या इतिहासात २४ ऑक्टोबरला खूप महत्व आहे. आजच्याच दिवशी म्हणजेच २४ ऑक्टोबर १६५७ रोजी, वसुबारसेच्या मुहूर्तावर किल्ले दुर्गाडीसह, कल्याण-भिवंडी दोन्ही ही ऐतिहासिक शहरे एकाच दिवशी हिंदवी स्वराज्यात दाखल झाली. कल्याण-भिवंडीवर स्वराज्याचा भगवा ध्वज फडकला. श्री शिवछत्रपतींची पुण्यवान पाऊले या भूमीला लागली.. त्यांची चरणधुळ मस्तकी लेऊन ही भूमी पुण्यवंत झाली, कृतकृत्य झाली..!!!
ऐन दिवाळीत मराठ्यांनी कल्याण व भिवंडी आदिलशाहीतून स्वतंत्र केले. महाराजांनी कल्याण शहराबाहेर, खाडीशेजारी दुर्गाडीचा किल्ला बांधला. याच दुर्गाडीच्या संरक्षणात स्वराज्याचे पहिले आरमार सजू लागले. कोळी, भंडारी, आगरी, दाल्दी, सारख्या दर्यावर्दी जमातींनी या नूतन आरमाराची धुरा सांभाळली.
पुढे कान्होजी आंग्रे, आनंदराव धुळप, बाजीराव बेळोसे सारखे जातिवंत सरदार नावारूपाला आले पुढे याच कल्याण खाडीच्या किनाऱ्यावर महाराजांनी “ज्याचे आरमार त्याचाच समुद्र” ही उक्ती डोक्यात ठेवून हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचा श्रीगणेशा केला. विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी व कुलाबा सारखे जलदुर्ग बांधले. गुराब, गलबत, पाल, शिबाड, मछवे, सारखी जहाजे बांधून समुद्रास आपले मांडलिक केले.
त्यामुळे हा सोन्याचा दिवस आज “मराठी आरमार दिन” म्हणून साजरा केला जातो.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply