आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान यांचा जन्म १ नोव्हेंबर १९३६ रोजी नागपूरच्या प्रतिष्ठित सधन आणि सुसंस्कृत घराण्यात झाला.
त्यांच्या आई मालतीबाई प्रधान यांना नाटकांची आवड होती. ४० च्या दशकात त्या नाटकातून काम करायच्या. त्यामुळे किशोर प्रधान यांना लहानपणीच अभिनयाचे बाळकडू मिळाले. घरातच नाटकाच्या तालमी पहात ते मोठे झाले.किशोर प्रधान यांनी नागपूरच्या ‘मॉरिस’ महाविद्यालयातून पदवी मिळविली. पुढे अर्थशास्त्रात एम.ए. केले व नंतर मुंबईत येऊन त्यांनी ’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप मिळविली व मास्टर ऑफ सोशल सायन्सेस ही पदवी मिळवून आपले शिक्षण पूर्ण केले.
अभिनयाची कारकीर्द किशोर प्रधान यांनी महाविद्यालयांत असताना विविध स्पर्धामधून अनेक एकांकिकांमधून व नाटकांमधून कामे केली. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या ‘रंजन कला मंदिर’साठीही प्रधान यांनी अनेक बालनाट्ये, नाटके केली. ग्लॅक्सो कंपनीत नोकरी करीत असताना अंगातील कला आणि नाटकाची ओढ प्रधनांना स्वस्थ बसू देईना. कामावरून घरी आल्यावर डोक्यात नाटकाचेच विचार चालायचे. अशा ध्यासातून बांद्रा येथील एमआरयजीग (मिडल इन्कम ग्रुप) कॉलनीतल्या हौशी नाटकवेड्यांना घेऊन किशोर प्रधान यांनी नटराज ही नाट्यसंस्था काढली, आणि ’तीन चोक तेरा’ हे नाटक करावयाचे ठरविले. त्या महोत्सवात त्यांनी भुताटकीवर आधारित ‘कल्पनेचा खेळ’ हे नाटक बसवून सादर केले. पुरुषोत्तम दारव्हेकर हे या नाटकाचे लेखक होते. म्हैसूरमध्ये झालेल्या या महोत्सवात हे नाटक खूप गाजले. भरत दाभोळकर यांचे ‘बॉटमअप्स’ हे त्यांचे पहिले इंग्रजी नाटक. आत्माराम भेंडे यांच्यामुळे त्यांना ते मिळाले. किशोर प्रधान यांनी १८ हून अधिक इंग्रजी नाटकांत भूमिका केल्या आहेत. ग्लॅक्सो फारमॅस्युटिकल कंपनीत मॅनजरसह विविध पदांवर २८ वर्षे नोकरी सांभाळून किशोर प्रधानांनी नाटकात कामे केली. आत्माराम भेंडे यांच्या ‘हॅटखाली डोके असतेच असे नाही’, ‘मालकीण मालकीण दार उघड’ आणि ‘हनिमून झालाच पाहिजे’ ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’, ‘ती पाहताच बाला’, ‘ब्रह्मचारी असावा शेजारी’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘लागेबांधे’, ‘लैला ओ लैला’, ‘हनीमून झालाच पाहिजे’, ‘हँड्स अप’, ‘संभव असंभव’ आदी नाटके केली. जाहीरात, चित्रपट, मराठी तसेच इंग्रजी रंगभूमीवर वेगवेगळया भूमिकांधून त्यांनी आपली छाप उमटवली. किशोर प्रधान यांची अभिनयाची जी शैली होती त्यामुळे अल्पावधीत त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. मराठी प्रमाणेच इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी दमदार भूमिका साकारल्या. महेश मांजरेकर दिग्दर्शित लालबाग परळ, शिक्षणाचा आयचा घो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. लगे रहो मुन्नाभाई चित्रपटात रंगवलेले आजोबा किंवा जब वुई मेट मधील स्टेशन मास्तर या त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. बबन प्रभू, आत्माराम भेंडे यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबतही काम करण्याची संधी प्रधानांना मिळाली. याच कालावधीत त्यांना मराठी चित्रपटाच्याही ‘ऑफर्स’ येत होत्या. पण तेव्हा मराठी चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापूर, पुण्याला व्हायचे. तसेच ते सलग काही दिवस असल्याने नोकरीतून रजा घेऊन जाणे शक्य नसल्याने त्यांनी तेव्हा चित्रपट नाकारले. पण निवृत्तीनंतर मात्र काही चित्रपट केले. ‘मामा भाचे’ हा त्यांची भूमिका असलेला पहिला मराठी चित्रपट. पुढे ‘डॉक्टर डॉक्टर’, ‘भिंगरी’, ‘नवरा माझा ब्रह्मचारी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘लालबाग परळ’ या चित्रपटातून त्यांनी काम केले.
‘लगे रहो मुन्नाभाई’ मधील ‘खटय़ाळ म्हातारा’ प्रधानांनी रंगविला. भूमिका छोटीशीच असली तरी ते आपली छाप पाडून गेले. ‘जब वुई मेट’मधील त्यांच्या ‘स्टेशन मास्तर’ही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण हिंदी चित्रपट आणि तेथील वातावरणात ते फारसे रमले नाहीत.
किशोर प्रधान यांचे ११ जानेवारी २०१९ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply