आज वसंत पवार हे नाव घेतलं की मराठी चित्रपट रसिकाच्या ओठावर नाव येतं ते ‘सांगत्ये ऐका!’ हेच, या चित्रपटातील वसंत पवार यांची सगळीच्या सगळी गाणी गाजली. चित्रपटही तुफान चालला आणि मराठी सिनेमाच्या इतिहासात अनेक नवे विक्रमही प्रस्थापित झाले. ‘बुगडी माझी सांडली ग..’ हे गीत तर आशा भोसले यांच्या संगीत प्रवासातील एक मैलाचा दगड बनून गेलं आहे. खरेतर वसंत पवार यांनी असंख्य आठवणीतली गाणी आपल्याला दिली आणि आपलं भावविश्व समृद्ध करून सोडलं.
वसंतरावांनी अंगाईगीतांपासून अभंगांपर्यंत आणि पोवाड्यांपासून लावण्यांपर्यंत विविध प्रकारच्या गीतरचना केल्या आणि गाण्याचा प्रकार कोणताही असो, वसंतरावांच्या चालीत काही ना काही नावीन्य हे असायचंच. मा.वसंत पवार उत्कृष्ट सतार वादन करीत असत. ते स्वत: पार्श्र्वगायन करीत असत.
मराठी संगीताच्या इतिहासात ‘वसंत’ या नावाला काही आगळंवेगळं महत्त्व असावं, अन्यथा या एकाच नावाच्या तीन संगीतकारांनी इतकं सुरेल संगीत कसं काय दिलं असतं? वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार हे तीन संगीतकार. या तिघांनी दिलेल्या संगीतावर मराठी गीत रसिकांच्या चार पिढ्या आजवर तृप्त झाल्या आहेत. अडतीस वर्षांच्या काळात पवारांनी संगीताचा अक्षरश: खजिना आपल्याला दिला. पवार हे ख्रिश्चन होते, हे कोणालाचा ठाऊक नव्हते.
अडतीस वर्षांचे अल्पायुष्य लाभलेल्या वसंत पवार नामक अवलिया संगीतकाराने महाराष्ट्राला द्यावे तरी काय काय? राम कदमांसारखा खंदा संगीतकार, सुमन कल्याणपूर यांच्यासारखी श्रेष्ठ गायिका, सुलोचना चव्हाण यांच्यासारखी लावणीसम्राज्ञी, जगदीश खेबुडकरांसारखा मोठ्या श्वासाचा गीतकार. एका प्रकारे गुणी माणसे जन्माला घालणारा हा रसिकराज लावण्या, अभंग, भावगीते, युगलगीते, सवाल-जवाब, झगडे, पोवाडे, फटके किती प्रकार? ‘मल्हारीमार्तंड’ या चित्रपटातील सुलोचना चव्हाणांच्या आवाजातील फड सांभाळ तुर्या ला ग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा’, ‘पदरावरती जरतारीचा मोरनाचरा हवा’ ह्या दोन लावण्या म्हणजे वसंत पवार यांच्या संगीत कारकीर्दीचा कळसच होय. अशा या संगीतकाराचे चरित्र “वसंतलावण्य’ या नावाने श्री.मधू पोतदार यांनी लिहिले आहे. हे पुस्तक ‘कॉन्टिनेन्टल प्रकाशना’ने प्रसिध्द केले आहे.
वसंत पवार यांचे ६ ऑगस्ट १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / प्रकाश अकोलकर
Leave a Reply