भालचंद्र वनाजी नेमाडे म्हणजे भालचंद्र नेमाडे यांचा जन्म २७ मे १९३८ रोजी जळगाव जिल्ह्यात सांगवी येथे झाला. ते १९५५ साली मॅट्रिक झाले त्यानंतर १९५९ साली बी.ए .झाले. त्यांनी भाषाशास्त्र या विषयामधून १९६१ साली एम. ए . पुणा विद्यापीठाकडून केले त्यानंतर १९६४ साली मुंबई विद्यापीठामधून इंग्रजी साहित्यातून एम. ए . केले. खरे तर ते इंग्रजीचे प्राध्यापक त्यांनी अहमदनगर , धुळे , औरंगाबाद येथील कॉलजमध्ये शिकवले.
भालचंद्र नेमाडे म्हटले की त्यांची सर्वप्रथम कोसला ही कादंबरी समोर येते आणि त्यांनतर येते ते त्यांनी केलेले वाद-विवाद , त्यांची ‘ अनाकलनीय ‘ परंतु परखड मते. ‘ अनाकलनीय ‘ हा शब्द अशासाठी वापरला कारण अनेकांना त्याची मते पटत नाहीत , रुचत नाहीत म्ह्णून अनाकलनीय . नेमाडे यांनी कादंबऱ्या लिहिल्या परंतु ते म्हणतात कविता ह्या मला खऱ्या प्रिय आहेत कविता निर्माण होण्यासाठी खूप वेळ लागतो ते म्हणतात ” कवितेचा गर्भकाळ खूप मोठा आणि कठीण असतो. कथा दोन दिवसात निर्माण होत असावी असा माझा समज आहे. परंतु कवितेचा शब्द न शब्द निर्माण व्हायला महिना-महिना लागतो ” हे त्यांचे विधान खरेच विचार करायला लावणारे आहे कदाचित याबद्दल अनेकांचे दुमत असण्याचीही शक्यता नाही आणि अशी विधाने हे भालचंद्र नेमाडे करू शकतात याबद्दल कोणाचेही दुमत असणार नाही. नेमाडे यांची अनेक विधाने वादळे निर्माण करतात असे म्हटले जाते अनेकांना ते त्यांचे नाटकही वाटते .
कोसला नंतर नेमाडे यांनी बिढार (१९६७ ) साली त्यानंतर ( १९७७ ) आणि झूल ( १९७९ ) , हूल , हिंदू ( २०१० ) या कादंबऱ्या लिहिल्या. त्याचप्रमाणे ‘ देखणी ‘ आणि ‘ मेलडी ‘ हे काव्यसंग्रही लिहिले. नेमाडेंनी कादंबरी, कविता व समीक्षा ग्रंथांची निर्मिती या सर्व क्षेत्रांत साहित्यिक कामगिरी केली. रंजनवादी मूल्यांना कडाडून विरोध करतानाच परंपरेविषयी चिकित्सक असण्याकडे त्यांचा कल आहे. मराठीवरील इंग्रजी साहित्याचा प्रभाव, शैलीशास्त्रीय दृष्टीने अभ्यास ही वैशिष्ट्ये असणार्या नेमाडेंनी इंग्रजीतूनही साहित्यनिर्मिती केली. ” साहित्याची भाषा ” हे त्यांचे भाषाविज्ञानविषयक तात्त्विक स्वरूपाचे पुस्तक वाचकांना वेगळी दृष्टी देते.
सातत्याने देशीवादाची संकल्पना मांडणार्या नेमाडे यांनी त्याचा आग्रहही धरला. जागतिकीकरणाचा रेटा वाढला आणि देशीवादाला गती आली. ईशान्येत जंगले टिकून आहेत ती देशीवादाने आणि पुण्या-मुंबईचा र्हास झाला तो जागतिकीकरणाने, अशी त्यांची भूमिका होती. पाश्चात्त्यांच्या नादी लागून त्याचे अंधानुकरण करण्याऐवजी आहे त्या व्यवस्थेत सुधारणा करून त्या अधिक विकसित कशा करता येतील, यावर त्यांनी भर दिला.
सर्व क्षेत्राप्रमाणे साहित्यातही पाश्चात्त्य प्रवाह शिरले असताना नेमाडेंनी त्यावरच प्रहार केल्यानंतर इतर लेखक अंतर्मुख झाले आणि त्यांनी आपल्या लेखनाची कूस बदलली. नेमाडेंनी आपल्या साहित्यात बोलीभाषेला अधिकाधिक वाव दिला. कोकणी, गोंयची, हिंदीमिश्रित उर्दू आणि वैदर्भीय या बोलींमध्ये त्यांनी कविता लिहिल्या .
भालचंद्र नेमाडे यांनी जवळजवळ ३० वर्षानंतर ‘ हिंदू ‘ ही कादंबरी लिहिली . हिंदूंवर टीकाही झाली आणि अनेकांनी तिचे स्वागतही केले. भालचंद्र नेमाडे यांनी टीकास्वयंवर ,तुकाराम , मुलाखतीसाहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण , साहित्याची भाषा , सोळा भाषणे अशी पुस्तके लिहून समीक्षात्मक लिखाणही केले. त्याचप्रमाणे त्यांनी इंग्रजीतूनही पुस्तके लिहिली.
नेमाडे म्हणतात , ” शाळेत हस्तलिखित वगैरे काढण्याची, त्यांतून टीकास्पद वगैरे लिहिण्याची हौस होती. गावात मित्रांच्या कविता एकण्याचेही नियमित उद्योग आम्ही करायचो. कविता जमवून स्वखर्चाने छापण्याचे ‘मोहर’, ‘उन्मेष’ वगैरे उद्योगही केले.”
माझ्या कादंबर्यांतून सामाजिक हितोपदेश साधायचा आहे काय असे कितीही ‘ सटायरिकली ’ म्हटले गेले तरी माझ्या कादंबर्यांच्या निमित्ताने हितोपदेशही होऊन गेला, तर खूपच झाले असे मी समजेन. माझ्यानंतर तरी मराठीत चांगला कांदबरीकार निर्माण व्हावा एवढा बंदोबस्त मी माझ्या कादंबर्या लिहून करून ठेवणार आहे.
मला सानेगुरुजी हाच एकमेव मोठा कादंबरीकार वाटत होता. अजूनही तसेच वाटते. त्यांच्या श्यामच्या लायकीचा मराठी नायक दुसरा नाही. भटका, निराधार सर्व सृष्टीची परिमाणे लाभलेला असा नायक. साने गुरुजी हाच असा कादंबरीकार आहे, की ज्याने स्वत:चे असे विश्व निर्माण केले. त्यांना स्वत:ची जीवनदृष्टी होती. समाजाच्या सर्व स्तरांना मराठी कादंबरीने खर्या अर्थाने स्पर्श केला, तो एकट्या साने गुरूजींमध्येच. ह्या बाबतीत त्यांचा आवाकाही विलक्षण आहे. पण निव्वळ समाजवादी शिष्यांमुळे त्यांची वाईट प्रतिमा रुजली.
साहित्य संमेलन याविषयी त्याची मते अत्यंत परखड आहेत ते म्हणतात ” साहित्य संमेलनाला चांगला लेखक चुकून जातो. संमेलनात जे साहित्यिक असतात ते चांगले साहित्यिक असतात का यावर प्रश्नचिन्ह आहे. कधी कधी चुकून एखाद्या कार्यक्रमाला जातो तसा चुकून चांगला लेखक साहित्य संमेलनाला जातो. ”
भालचंद्र नेमाडे याना खूप पुरस्कार मिळाले त्यांना १९९१ साली साहित्य अकादमीने पुरस्कार दिला तर २०१५ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार ‘हिंदू एक समृद्ध अडगळ’ यासाठी मिळाला.
आजही भालचंद्र नेमाडे यांचे लेखन चालू आहे . त्याची मते कुणालाही पटो अगर न पटो ते लिहीत राहणार आणि आपली मते मांडत राहणार जेणेकरून मराठी साहित्यात वाद होत राहणार. त्याचे लेखन , विधाने मराठी भाषा जिवंत आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न करणार यात शंका नाही.
— सतीश चाफेकर
Leave a Reply