या लेखाचा अुद्देश, मराठी भाषा आणि लिपी समृध्दी असा आहे, भाषा आणि लिपी शुध्दी असा नाही.
या विषयाचा आवाका फार मोठा आहे. फेसबुकच्या माध्यमातून, जगभरच्या मराठी विचारवंतांशी संपर्क साधता येतो, विचारांची देवाणघेवाण करता येते, आपले विचार, जगभरच्या विचारवंतांना क्षणभरात पोचविता येतात वगैरे सुविधा असल्यामुळे या माध्यमाचा सुयोग्य वापर करून मराठी भाषेला, कालमानानुसार, समृध्द करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता येण्यासारखा आहे.
आपले विचार मांडले म्हणजे, त्यांच्याशी अितर सदस्यांनी सहमत व्हायलाच पाहिजे असा अट्टाहास नको. ज्या व्यक्तींना ते विचार पटतील, त्या व्यक्ती ते विचार स्वीकारतील, ज्यांना पटणार नाहीत ते स्वीकारणार नाहीत. पण सर्वापुढे ते विचार मांडले गेले हा फार मोठा फायदा आहे. विचार आज पटले नाहीत, कदाचित अुद्या पटतील आणि स्वीकारले जातील.
सुमारे १९२० च्या दशकात, म्हणजे सुमारे 100 वर्षांपूर्वी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषाशुध्दीची चळवळ सुरू केली.
स्थानिक आणि प्रादेशिक भाषांवर, सत्ताधारी लोकांच्या भाषांचा प्रभाव पडतो. त्यानुसारच यावनी आणि अिंग्रजी भाषांचा प्रभाव मराठीवर पडला आहे. यावनी सत्ता, हिंदुस्थानात 700 ते 800 वर्षे होती, अिंग्रजी सत्ता 150 वर्षे होती तरी त्या आधीही अिंग्रज येथे व्यापारानिमित्त आले होते. त्यामुळे मराठीवर, यावनी भाषांचा प्रभाव, पूर्वी अधिक आणि आता अिंग्रजी भाषेचा अधिक, पडला आहे.
वीर सावरकरांनी, परकीय शब्दांना, स्वत: नवीन पाडलेले आणि जुनेच पण नव्यानं प्रचारात आणलेले स्वकीय शब्द, त्यांनी केलेल्या भाषाशुध्दी शब्दकोशात दिले आहेत.
मालक, मालकीण, जखम, जखमी, हवा, हवामान, हवापाणी, हवापालट, वकील, वकीली, फलटन, जाहीर, जाहीरसभा, मुर्दाबाद, झिंदाबाद, खाते, अंमलबजावणी, अरबी समुद्र, अर्ज, अर्जदार, अगर, अजिबात, अक्कल, अिसम, अिमान, अिज्जत, अैपत, अैवज, अिशारा, अस्सल, अव्वल, अखेर, अिन्कार, अेरवी, अंदाज, अेकजिनसी, अुमेदवारी, अिमारत, अहवाल, अुर्फ, अिरादा, कमाल, काबीज, कदर, कुस्ती, कर्ज, कायम, कैदी, किंमत, कारकून, खलास, खबरदार, खून, खेरीज, खुद्द, खुषी, खरीप, खुलासा, गैरहजर, गरीब, गुलामी, गुन्हा, चैन, चेहरा, जमीन, जबर, जरूर, जुलूम, नशिब, नकाशा, नाअीलाज, पोषाख, फायदा, बिलकूल, बक्षीस, बरोबर, लायक, नालायक, रजा, राजी, वगैरे, वस्ताद, शाहीर, मंजूर…वगैरे अनेक शब्द, परकीय, परभाषी म्हणून दिले आहेत.
वीर सावरकरांनी, वरील परभाषिक शब्दांना, मराठी शब्द सुचविले आहेत. हवा (वायू वारा), हवापाणी (जलवायू वारापाणी) हवामान (वायूमान रुतूमान), हुशार (तरतरीत, चाणाक्ष, चलाख, प्रज्ञावान, बुध्दीमान), साहेब (राव पंत), हजेरी (अुपस्थिती विद्यमानता), शिक्का (मुद्रा), वगैरे (अित्यादी), शिकारी (मृगयू, पारधी), वसुली (अुगराणी)…..
यावनी शब्दमिश्रित भाषा अनेक शतकं बोलली गेली. कुणीही व्यक्ती, लहानपणापासून ही भाषा अैकत असे, बोलत असे. अितकेच नव्हे तर त्या व्यक्तीचे आअीवडील, आजीआजोबा, जवळचे नातेवाअीक देखील ही भाषा बोलतांना त्या व्यक्तीनं अैकलं असे. आसपासचे सारे लोक हीच भाषा बोलतांना अैकलं असे आणि त्या व्यक्तीनं अितरांशी संवाद साधतांना हीच भाषा वापरली असे. त्यामुळं कोणता शब्द शुध्द मराठी आणि कोणता शब्द परभाषी याची जाण येणंच शक्य नव्हतं. ती त्याची मातृभाषाच असे.
हवा, हवामान, हजेरी, वगैरे, रजा, लवाजमा, लायक, नालायक, शाहीर, शर्यत…अशासारखे शब्द, मराठीत अितके रुळले आहेत की ते काढून टाकले तर मराठी भाषा खरोखर शुध्द होअील का?
‘या’ शब्दांसाठी ‘हे’ शब्द वापरा असं म्हणण्या अैवजी… ‘हे’ शब्द वापरावेत, त्या बरोबरच ‘हा’ ही शब्द वापरला तरी मराठी अशुध्द न होता…समृध्द होअील …. असं म्हणावं.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply