सत्तावीस फेब्रुवारी, कविवर्य कुसुमाग्रज, वि. वा. शिरवाडकर यांची जयंती. महाराष्ट्राच्या या थोर कवी, लेखक, नाटककार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो, हे सर्वश्रुत आहे.
एक महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणून या दिवसाची ही आठवण केवळ वाचून-ऐकून आणि शुभेच्छा देणे, एवढीच महत्त्वाची मानावी का? तर अजिबातच नाही. एवढ्याच मर्यादित अर्थाने या दिवसाचे साजरीकरण किमान महाराष्ट्रीयन माणसाकडून तरी अपेक्षित नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आपली मातृभूमी, आपली जन्मदात्री आई व आपली मातृभाषा या तीनही गोष्टींना विलक्षण महत्त्वाचे स्थान असते. खरं म्हणजे आपला मातृभाषा दिन, मराठी भाषा दिन हा आपण एक महाराष्ट्रीयन नागरिक या नात्याने विशेषत्वाने साजरा करावयास हवा.
अख्खे तीनशे पासष्ट दिवस आपण आपल्या मायबोलीच्या उत्कर्षासाठी भरीव योगदान देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. प्रत्येक मराठी माणसाने, खरोखरच आपण आपल्या मायबोलीचे ऋण फेडण्यासाठी किती सक्रिय आहोत? या अनुषंगाने मंथन करण्याची निश्चितच वेळ आली आहे असे वाटते. खूप काही मोठ्या प्रमाणावर नव्हे तरी, अगदी मराठी पुस्तकं आपल्या वाचन आनंदासाठी आपण विकत घेतो का? मुलांना मराठी पुस्तकं वाचण्यासाठी उद्युक्त करतो का? आपल्या कौटुंबिक पातळीवर,व्यक्तिगत पातळीवर तरी आपण आपल्या मातृभाषेच्या आविष्कारासाठी किती प्रामाणिक प्रयत्न करतो?
आपल्याला पहिल्यांदाच बोलावयास येऊ लागले की, वाणीतुन शब्दांचे रूप घेत पाझरणारे सुरुवातीचे शब्द मराठी भाषेतूनच उमटतात. म्हणूनच तर ती आपली मातृभाषा असते .किती जण आपल्या अगदी कौटुंबिक स्तरावरही लहान बालकांना बोलावयास येऊ लागल्यानंतर मराठी भाषेतील शब्दांच्या शुद्ध उच्चारांवर भर देण्याचा प्रयत्न करतात? किती जण मुलांचे ,किंबहूणा स्वतः चे सुध्दा शुद्धलेखन समृद्ध झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करतात? किती जण शालेय शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे. किंवा या शिक्षणामध्ये मराठी विषय अनिवार्यच असावयास हवा. यासाठी सजग आहेत?
आपल्या घरात सर्वांची संवाद साधण्याची भाषा शुद्ध मराठीत असावी असे किती जणांना वाटते? या सगळ्या आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टी आहेत. आपण स्वतःया गोष्टी आमलात आणत नसाल तर, ‘मराठी भाषा टिकलीच पाहिजे’ हे कितीही ओरडून सांगितले तरी, त्याला काहीच अर्थ नाही.
मान्य आहे आज संगणकीकरणाच्या या युगात इंग्रजी भाषेशिवाय पर्याय नाही. पण तरीही एक आद्य मातृभाषा या नात्याने आपल्या आयुष्यात मराठी भाषेला स्थान असणे अपरिहार्य नसावे का? ही अपरिहार्यता कायम ठेवत, जिवंत ठेवत नंतर इतर भाषांचे ज्ञान ग्रहण करू नये का प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने ?
दक्षिणेकडील राज्यांमध्ये त्यांच्या मातृभाषेला किती महत्त्व दिले जाते! त्याच प्रमाणे महाराष्ट्रीयन व्यक्तीने किमान महाराष्ट्रात असताना तरी आपल्या संवादासाठी केवळ मराठीचा अट्टाहास का करू नये? अहो इंग्रजी बोलण्याच्या फालतू मोठेपणामूळे तुम्ही आपल्या मातृभाषेला पायंदळी तुडवत आहात, याचे भान अजूनही येऊ नये यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असणार ? जगातल्या सर्व भाषा जरी आपण शिकल्या तरीही, मराठी भाषा शुद्ध स्वरूपात सर्वात प्रथम आत्मसात करावी हे आपल्याला कळू नये अजूनही ? आपल्याला शक्य त्या ठिकाणी कार्यालयीन कामासाठीही मराठी भाषेचा उपयोग का होऊ नये? असे असंख्य प्रश्न आहेत. ज्यामुळे मातृभाषा असूनही कायम दुय्यम स्थान मिळाले आपल्या मराठीला. ही गोष्ट नक्कीच भूषणावह नाही. आपल्याला खरोखरच आपल्या मातृभाषेबद्दल थोडा जरी आदर असेल तर, व्यक्तिगत पातळीवर वर उल्लेखित प्रश्नांची उत्तरं मिळवणं अत्यंत गरजेचं आहे.
दर बारा मैलांवर भाषा बदलते असे आपल्याकडे म्हटले जाते. पण भाषेवरील तिच्या उच्चारावरील संस्कारांमध्ये फरक असू शकेल तरीही, लिहिण्यातून तिची शुद्ध अशुद्धता का पडताळली जाऊ नये?त्यासाठी मातृभाषेच्या उच्चारीकरण, व्याकरण, शुद्धलेखन, संवादीकरण या तीनही गोष्टींचा एकत्रित समन्वय झाला असेल तरच, आपल्या मातृभाषेविषयी आपण फार चोखंदळ आहोत हे एक महाराष्ट्रीयन नागरिक या नात्याने आपण म्हणू शकतो.
ज्या दिवशी माझी मातृभाषा मराठी ही माझी अस्मिता ठरेल आणि या अस्मितेचे पावित्र्य अबाधित राहण्यासाठी आपण प्रत्येक जण जीवापाड प्रयत्न करू करत राहू अगदी वर्षातल्या प्रत्येक दिवशी तरच, आपण ठामपणे म्हणू शकतो की मी मराठी माणूस आहे आणि मी महाराष्ट्रीयन आहे. माझी भाषा माझी अस्मिता आहे आणि या अस्मितेच्या रक्षणासाठी मी अविरत प्रयत्न करीन. तरच मराठी माणूस असल्याचा मला अभिमान आहे. असे आपण म्हणू शकतो.
चला तर मित्रांनो आपल्या मायबोलीच्या ऋणातून काही अंशी उतराई होण्याचा प्रयत्न करूया या. पणतीने पणती लावत मराठी भाषेचा दीपक उजळवू या. आणि उजळणार्या या दीपाचा महाराष्ट्राला प्रकाश देऊया. अशी शपथ आपण सर्वजण घेऊया.
— © नंदिनी म. देशपांडे
Leave a Reply