(मराठी भाषा दिनाच्या निमित्तानें)
(१) मराठी-भाषा-दिवस करूं या साजरा
माय मराठीला करूं मानाचा मुजरा
चला, आज मराठीचे गोडवे गाऊं
उद्या तिच्या उन्नतीचें विसरून जाऊं ।।
–
(२) भेटला ज्ञानया जसा ‘देश्य’ भाषेला
भेटला शिवाजी काल महाराष्ट्राला
करील पुनरुत्थान, हरील हताशा
कोण असा, पाहील मराठी भाषा ?
–
(३) संकर झाला, होऊं द्या की , मराठी मरणार नाहीं
इंग्लिश-हिंदी-संगणकाच्या-भाषेला डरणार नाहीं
सहस्त्रकें दो , आक्रमणांतुन तगली मराठ-भाषा जी,
तिच्या भविष्याची कोणीही करूं नका काळजी ।।
–
(४) दोन हजार वर्षांत मराठी बदलली नाहीं कां ?
मूळ रूपापासुन थोडीही ढळली नाहीं कां ?
मग आतां शब्दांचा संकर हा कसला अनर्थ आहे ?
मर्हाट-भाषा स्वत: काळजी घेण्यां समर्थ आहे ।।
–
(५) हिची अनवती करील, असा
तुम्हांम्हांविण आहेच कोण ?
तुमचीआमची उदासीनता
हीच तिच्या र्हासाला कारण ।।
बाहेरचे एल्गार परतवूं
मराठीचा हात धरून
कांहीं शुद्धता-आग्रह धरून
कांहीं संकर मान्य करून ।।
करूं नका जयकार हिचा
एकच दिवस , अरे
मराठभाषा अमुची माता
हिला ज़पूं सारे ।।
– – –
सुभाष स. नाईक मुंबई
M – 9869002126 . eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com ; www.snehalatanaik.com