मार्च २३- माझे रायपूरला “मराठी भाषेचा नाटयप्रवास” या विषयावर व्याख्यान झाले. संयोजक होते – महाराष्ट्र मंडळ ! १९३५ पासून कार्यरत असलेले आणि मराठी मातीपासून दूर रुजलेले हे बी आता फोफावले आहे. त्यांचे वर्षभर अनेकविध उपक्रम सुरु असतात. मी पूर्वी रायपूरला असताना त्यांच्या कर्तृत्वाचा साक्षीदार होतो. आता तर renovation चे प्रचंड काम त्यांनी हाती घेतलेले आहे.
साधारण ७०-७५ श्रोते उपस्थित होते. दीड तासाच्या व्याख्यानानंतर काही वेळ प्रश्नोत्तर आणि चर्चेत गेला. “शहीद दिवसाचे” स्मरण म्हणून माझ्या हस्ते भगत सिंह ,राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. मंडळात असलेल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला मी “माल्यार्पण ” केले. काळेले सरांनी माझा ” हृद्य ” परिचय करून दिला.
१८४३ च्या “सीता स्वयंवर “पासून आजच्या “देवबाभळी ” पर्यंत नाटकांचा मी भाषणात आढावा घेतला आणि वाटा -वळणांनी समृद्ध होत गेलेल्या मराठी भाषेतील काही उतारे /स्वगते सादर करून या प्रवासाला स्पर्श केला. वऱ्हाडी /कोकणी भाषेचा बाज सादर केला. कुसुमाग्रज /पुलं /कानेटकर /तेंडुलकर /अत्रे /खानोलकर यांच्याबरोबरच पूर्वसूरींच्या कार्यकर्तृत्वाची ( देवल /गडकरी /स्वा. सावरकर /कोल्हटकर) नोंद घेतली. “बेणारे “बाई आणि “मंजुळेच्या ” स्वगतांना विशेष दाद मिळाली.
अप्रतिम संयोजन, रसिक श्रोते आणि त्यावर काळेले सरांची “करडी ” देखरेख यामुळे वाटलं – “याच साठी केला होता अट्टाहास ! ”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply