नवीन लेखन...

मराठी भाषेची सद्यस्थिती

१९८८ मध्ये ठाणे येथे झालेल्या ६१ व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत श्री शं. बा. मठ यांनी लिहिलेला लेख. 


स्वभाषेमुळेच स्वधर्माची जाण येते:
माझा मराठाची बोलु कौतुके ।
परी अमृता तेही पैजा जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके ।
मेळवीन । ज्ञानेश्वरी अ. ६/१४

मराठी भाषेला देववाणी बरोबर प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीमत् भगवद् गीतेवर टीका ग्रंथ लिहिताना काढलेले हे गौरवपूर्ण उद्गार आहेत. मराठी भाषा मी इतकी संपन्न करीन अशा प्रतिज्ञेने सामान्य जन-भाषेत त्यांनी हा ग्रंथ लिहिला आणि सामान्य जनतेला समजणाऱ्या भाषेत संस्कृतात दडलेला ज्ञाननिधि मुक्त केला. संत वाङ्मयाकडे पाहिल्यास बहुतेक संतांनी त्या त्या प्रदेशात प्रचलित असलेल्या प्रादेशिक भाषेतूनच सर्व सामान्यांना कळेल अशा पद्धतीने ग्रन्थ निर्मिती केली आहे. संत तुलसीदास, कबीर यांनी हिंदी भाषेतून, पुरंदरदास, कनकदास यांनी कानडी भाषेतून, ज्ञानेश्वर ते तुकारामांपर्यंतच्या संतानी मराठी भाषेतून ग्रंथांची रचना केली. थोडक्यात संत जनांनी स्वधर्म व संस्कृती याचा बोध स्वभाषेतून करून दिला. त्यामुळे आजतागायत धर्म आणि संस्कृति ही टिकून आहेत.

स्वराष्ट्र निर्मिती:
कबीराचे दोहे, तुलसी रामायण, ज्ञानेश्वरी, तुकाराम आणि नामदेवांच्या गाथा, एकनाथी भागवत, रामदासांचा दासबोध, पुरंदरदास, कनकदास यांची पदे आदि ग्रन्थांमुळे संपूर्ण भारतभर ईश्वर निष्ठा, स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा यांचा प्रसार आणि प्रचार होत राहिला. आणि जनमानसात त्यामुळेच देवभक्ति बरोबरच देशभक्ति करण्याची स्फूर्ती निर्माण होऊ शकली. महाराष्ट्रा पुरताच विचार करावयाचा झाल्यास वारकण्यांचेच धारकरी बनले व त्यातून स्वराज्याची भूमिका विस्तारित झाली. इथे ब्रह्म तेज व क्षात्र तेज हातात हात घालून नांदले. हे सारे घडले त्याचे कारण संतांनी घेतलेली स्वभाषेबद्दलची भूमिका सामान्य जन भाषेच्या माध्यमामुळे स्वभाषेत व्यवहार होऊ लागला. त्यामुळे सामान्य जनतेला ज्ञान सुलभतेने प्राप्त होऊ लागले. म्हणून त्यांना सांस्कृतिक जीवनात प्रत्यक्ष सहभागी होता आले. आणि स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा यासाठी जनता प्रयत्नशील राहू लागली.

इंग्रजी माध्यम:
इ. स. १८३६ साली लॉर्ड मेकॉले यानी भारतात सर्व प्रथम इंग्रजी माध्यमातून शिक्षणाचा पाया घातला. त्यावेळी त्याने असे म्हटले की जेव्हा इंग्रज हिंदुस्थान सोडून जाईल त्यावेळी गोऱ्या इंग्रजाऐवजी काळा इंग्रज इथे राज्य करील. या इंग्रजी भाषेच्या माध्यमाद्वारे आम्ही येथील जनतेतील अस्मिता नाहीशी करून टाकू त्यामुळे त्यांच्या ठिकाणी असलेली स्वधर्म निष्ठा, स्वभाषा प्रेम व संस्कृती बद्दलचा सारा अभिमान नष्ट होऊन जाईल. या साठी येथील जनतेला इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण दिले गेले पाहिजे. त्याची ही गर्वोक्ती किती सार्थ ठरलेली आहे हे आपण सहज पाहू शकतो.

सुशिक्षितांचा कल:
शिक्षणाचे माध्यम इंग्रजी राहिल्यास आपल्या मुलांना भारतभर कुठेही उत्तम प्रकाराने उपजीवकेचे साधन उपलब्ध होईल. मोठ्या मानाचे स्थान प्राप्त होईल. या एकाच हेतूने प्रेरित होऊन आज बरेचसे पालक आपल्या पाल्याला लहानपणापासून इंग्रजी भाषा शिकवण्याचा अट्टाहास धरताना आढळतात. एका दृष्टीने त्यांचा हा विचार व्यावहारिक आहे असेच म्हणावे लागेल. इतपत इंग्रजी भाषेचा पगडा आपल्यावर बसलेला आहे. अशा परिस्थितीत प्रादेशिक भाषांना दुय्यम स्थान प्राप्त होत असल्यास त्या बद्दल नवल वाटण्याचे कारणच काय? किंबहुना प्रादेशिक भाषेत लिहिता वाचता आलेच पाहिजे हा आग्रह धरणे म्हणजे फार मोठे व्यक्तिमत्त्व निर्माण करणाऱ्या इंग्रजी भाषेला मुकण्यासारखे होय. अत एव जरी आम्ही मराठी भाषिक असलो तरी व्यावहारिक भाषा इंग्रजी असल्याने त्याचाच पाठ पुरावा करणे योग्य होईल असे वाटत असल्यास काय चुकले?

भाषावार प्रांतरचना:
लोकभाषेतून राज्य व्यवहार झाल्यास तो सुलभ व तुरळीत होऊ शकेल व तो आपल्याला पूर्णपणे समजू शकेल. या कल्पनेने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताची पुनर् रचना करण्यात आली. त्यात भाषेला प्राधान्य देण्यात आले व भाषावार प्रांत रचना करण्यात आली. प्रत्येक प्रादेशिक भाषेला राजाश्रय प्राप्त झाला. राजाश्रय प्राप्त झाला खरा परंतु लोकाश्रय संपुष्टात आला. त्याचे कारण इंग्रजी भाषेला मिळत असलेले अतिरिक्त महत्त्व. त्यामुळे लोकव्यवहार हे प्रादेशिक भाषेतून न होता इंग्रजी भाषेतून होत आहेत. यामुळे एतत्देशीय भाषेला गौणस्थान प्राप्त झालेले आहे. प्रादेशिक भाषेचा संकोच होण्याचे कारण शोधत असताना इंग्रजी भाषेच्या वरचष्म्याबद्दल विचार करणे अगत्याचे आहे. यातून सोयिस्कर असा मार्ग काढणे आवश्यक आहे.

भौतिकता व भावजीवन:
एतत्देशीय भाषा संकोचाचे इंग्रजी भाषा हे एकमेव कारण आहे असे मात्र मुळीच नाही. परंतु तेही एक मोठे कारण आहे. आज एकंदर जीवनाचा ढाचाच बदललेला आहे. माणसाला पोटापाणाच्या उद्योगापुढे (साहित्य, वाङ्मय, सांस्कृतिक धर्म, तत्वज्ञान) या गोष्टींकडे लक्ष देण्यास फुरसतच नाही. शिवाय या गोष्टीवाचून त्याचे काही अडत नाही अशी एक सर्वसाधारण समजूतपण झालेली आहे. भाकरीचा प्रश्न आधी सोडवला पाहिजे. भाकरीशिवाय माणूस जगूच शकत नाही हे जितके खरे आहे. तितकेच केवळ भाकरीवरच मनुष्य राहू शकत नाही हेही खरे आहे. त्याला आणखी काहीतरी हवे असते हे विसरुन कसे चालेल? भौतिकजीवन संपन्नतेबरोबरच आपले भावजीवनही समृद्ध व्हावे असे माणसाला वाटत असते. कारण त्याची ओढ सत्य, शिव आणि सुंदरतेकडे असते. म्हणून मानव आपले भावजीवन सुंदर करण्याकडे, कल्याणमय करण्याकडे प्रयत्नशील राहतो. या प्रयत्नातूनच माणसाने साहित्य, संगीत, शिल्प आणि चित्र आदि कला निर्माण केल्या. त्यात तो रमू लागला. त्यापासून त्याला ब्रह्मसहोदर आनंद प्राप्त झाला. याच्याहीपुढे जाऊन चिरंतन आनंदाचा ठेवा मिळविण्यासाठी त्याला इच्छा होऊ लागली. त्यातून घर्म, तत्वज्ञान संस्कृती आदिकडे ओढ निर्माण झाली व त्याद्वारे चिरंतन अशा स्वरूपात शांत, संतुष्ट व समाधानी जीवनाचा तो अनुभव घेऊ लागला. भौतिक शास्त्राच्या साहाय्याने भौतिक जीवनात प्रगती करून घेतल्यानंतर सुंदरतेकडे नेणाऱ्या आध्यात्मिक ज्ञानाने जीवन शांत, समाधानी करून सर्वोशाने परिपूर्ण अशा जीवनाचा आस्वाद माणूस घेऊ शकला.

दोनही ज्ञान शाखा आवश्यक:
मानवाला दोनही ज्ञान शाखांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. केवळ तांत्रिक शिक्षणाने अथवा भौतिक शास्त्राच्या अध्ययनावरव न थांबता त्याला आत्मिक आनंद देणारे जे साहित्य आहे त्याचाही अभ्यास करावा लागेल. इंग्रजी भाषेच्याद्वारे भौतिक प्रगती जरूर करून घ्यावी. तसेच येथील साहित्य, धर्म, तत्वज्ञान संस्कृतीसाठी स्वभाषेचा पुरस्कार करणे योग्य ठरेल. तरच आपले जीवन एकांगी न होता ते सर्वाशाने परिपूर्ण होऊ शकेल; हा विचार करणे अगत्याचे आहे. म्हणजे स्वभाषेतूनही व्यवहार करता येणे शक्य होईल. मात्र असे घडत नाही.

माणूल यंत्र बनलेला आहे:
हे घडत नसल्यामुळेच आपले सांस्कृतिक जीवन, धर्म जीवन, आध्यात्मिक जीवन विस्कळित झालेले आहे. आपण केवळ पैसे गोळा करणारे यंत्र झालेलो आहोत. मुंबईच्या टाकसाळीतली नाणी आणि नाशिकच्या मुद्रणा-लयातील मुद्रांकने यांची बंडले गोळा करणारे यंत्र म्हणजे आपण अशी आज परिस्थिती झालेली आहे. या पैशाच्या पुडक्यापुढे आम्हाला दुसरे जीवनच राहिलेले नाही. एवढा जबरदस्त पैशाचा प्रभाव या एकांगी जीवनाने निर्माण झालेला आहे. यालाच भौतीकता म्हणतात. या प्रभावामुळे माणसातल्या सान्या कोमल भावना करपून गेल्या आहेत. त्याचे जीवन यंत्रवत जड व भावनाशून्य झालेले आहे. त्याच्यातील सारी माणुसकी नष्ट झालेली आहे. आम्हाला आज फक्त भाकरीचे शिक्षण दिले जाते. आपल्याला सांस्कृतिक शिक्षण मिळतच नाही. भाकरीच्या शिक्षणाने आम्ही फक्त हक्काची भाषा शिकलो. सांस्कृतिक शिक्षण कर्तव्याची जाणीव निर्माण करते. आज आपण जगत असलेल्या उपर्युक्त जीवनाबद्दल पुनरविचार करणे आवश्यक आहे.

विज्ञान आणि विवेक:
विज्ञानामुळे वैयक्तिक जीवनात कांही प्रमाणांत सुख-सोयी निर्माण झालेल्या आहेत ही गोष्ट खरी आहे. त्याच बरोबर मानवाची प्रचंड प्रमाणात हत्या करण्याची क्षमता विज्ञानाने मानवाला प्राप्त करून दिलेली आहे हे विसरून चालणार नाही. म्हणून जीवनात समृद्धता निर्माण होऊनही शांत आणि संतुष्ट जीवन उभे झाले नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यासाठी सदाचारसंपन्न व विवेकी जीवन जगणाऱ्या संत सज्जनांची कासच मानवाला धरावी लागेल. कारण हीच मंडळी अहर्निश मानवाचे हित व कल्याण साधण्यासाठी जागरूक असतात. जीवनात गटांगळ्या खाणाऱ्या मानवाला दिलासा देऊन पैलतीरावर नेणारे हे कुशल नावाडी आहेत. या करता त्यांची संगती, त्यांचे साहित्य, त्यांचे मार्गदर्शन घेणे जरूरीचे आहे. तरच आपले सांस्कृतिक जीवन संपन्न होईल. त्यातून स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा याबद्दल योग्य अस्मिता जागृत होईल तरच आपण परकीय भाषा पचवून स्वभाषेची प्रतिष्ठापना करू शकू. आपली मराठी भाषा संपन्न आहे. तिच्यात जीवन उन्नत करण्याची क्षमता आहे. भौतिक जीवनसमृद्धीच्या मागे लागून आपण आज स्वभाषेकडे दुर्लक्ष करीत आहोत. स्वभाषेच्या अभावी स्वधर्म व सांस्कृतिक जीवनाला आपण दिवसेंदिवस: पारखे होत चाललेलो आहोत. याचा विचार संघटितपणे मराठी साहित्य संमेलनात होणे आवश्यक आहे. सुबुद्ध नागरिक व साहित्यिक याचा विचार करतील तो सुदिन. तरच ज्ञानदेवांनी व्यक्त केलेला विचार अन्वर्थक होऊ शकेल.

ये मऱ्हाठियेचिया नगरी ।
ब्रह्म विद्येचा सुकाळु करी ।
घेणे देणे सुखचिवरी ।
हो देई या जगा । ज्ञानेश्वरी अ. १२/१६

— शं. बा. मठ
तत्कालीन पत्ता : १३, साफल्य, शिवाजीनगर, बी-केबीन, ठाणे-४००६०२.


१९८८ मध्ये ठाणे येथे झालेल्या ६१ व्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत श्री शं. बा. मठ यांनी लिहिलेला लेख 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..