मनोरमा वागळे यांनी अभिनय शिकावा, संगीत विषयात प्राविण्य मिळवावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे शाळा-महाविद्यालयातून अनेक दर्जेदार नाटकांमधून त्यांनी अनेक भूमिका केल्या. त्यासोबतच गोवा हिंदू असोसिएशन मुळे मास्टर दत्ताराम यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. गोविंदराव अग्नी, बी.आर देवधर, पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांसारख्या दिग्गज मंडळींकडून संगीत आणि गायनाचं शिक्षण त्यांनी घेतलं, तर ज्येष्ठ पार्श्वगायक आर.एन. पराडकरांकडून सुगम आणि नाट्यसंगीताचं प्रशिक्षण घेतलं. खास गंधर्व गायकीचे नाट्यसंगीत हे त्यांना गोविंदराव वेर्लेकर यांनी शिकवलं.
गोवा हिंदू असोसिएशनच्या महिला शाखेतून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं आणि खडाष्टक या नाटकातील तडाखेबाज रागिणीच्या भूमिकेसाठी सुमती तेलंग यांना उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही मिळाला. पुढे मनोहर वागळेंशी विवाहबद्ध झाल्यानंतर सुमती तेलंगच्या मनोरमा वागळे झाल्या. खरंतर लग्नानंतरच्या चित्रपटात त्यांनी ज्या काही भूमिका रंगवल्या त्यामुळेच त्या नावारुपास येऊ लागल्या.चित्रपटातल्या अनेक खाष्ट, कजाग, खलनायिका आणि सहकलाकारांच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांना त्यांचा अभिनय आवडू लागला कारण त्यामध्ये कजाग आणि विनोदी ढंगाचं मिश्रण होतं. याचा अनुभव आपल्यापैकी अनेक जणांनी राजा ने वाजवला बाजा या चित्रपटातनं घेतला असेल. सुरुवातीला खाष्ट सासू पण चित्रपटात काही प्रसंगात जेव्हा शत्रूंकडून गोची होते तेव्हाचा तो प्रसंग पाहून हसू आल्याशिवाय राहवत नाही. अनेक विनोदी आणि गंभीरपूर्ण नाटकांतून मनोरमा वागळे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
बबन प्रभूंचे फार्सिकल नाटक दिनूच्या सासूबाई राधाबाई मधली त्यांची सासूबाई ही भूमिका अविस्मरणीय ठरली. १९८५ ते १९९५ पर्यंत या नाटकाचे प्रयोग रंगभूमीवर होत राहिले. सर्व कलाकार बदलले पण सासूबाई मात्र कायम राहिल्या. मनोरमाबाई वागळेंच्या विनोदी चित्रपटांमध्ये गंमत-जंमत, आम्ही दोघे राजा राणी, गडबड घोटाळा, घरजावई या चित्रपटांचा तर स्त्री प्रधान चित्रपटांसाठी उंबरठा आणि आत्मविश्वास यांमधील त्यांच्या भूमिका लक्षात राहतात.
हिंदी चित्रपटांमध्ये लाईफलाईन, आगे की सोच, सिकंदर यांचा समावेश होतो. यासोबतच अनेक जाहिराती, दूरदर्शन, मालिका, नाटकं यामधून मनोरमा वागळे यांनी आपल्या अभिनयाची लक्षात राहण्यासारखी चुणूक दाखवून दिली आहे. मा.मनोरमा वागळे यांचे २७ ऑगस्ट २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- सागर मालाडकर / marathisrushti.com
Leave a Reply