चारचौघींसारखं साधं व्यक्तिमत्त्व असूनदेखील शांता हुबळीकर यांनी तीस-चाळीसच्या दशकातील मराठी रुपेरी पडदा चांगलाच गाजवला.
शांता हुबळीकर यांचा जन्म १४ एप्रिल १९१४ रोजी झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी काही कानडी नाटकात त्यांनी कामं केली व गायन देखील.पण त्यामध्ये उत्पन्न कमी असल्याने त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी भालजी पेंढारकर दिग्दर्शित कालियामर्दन चित्रपटात अगदी छोटीशी भुमिका साकारली. याच दरम्यान कोल्हापूर सिनेटोनमध्ये चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके, ‘गंगावतरण’ हा चित्रपट बनवत होते. त्या चित्रपटातही शांता हुबळीकरांनी गंगेची भुमिका केली व एका गाण्यासाठी गायन देखील केले होते.
भालजी पेंढारकर यांच्या “कान्होपात्रा”या चित्रपटात शांताबाईंना सर्वप्रथम महत्वपूर्ण भूमिका मिळाली. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले.”कान्होपात्रातील”भूमिकेमुळेच शांताबाईंना प्रभात फिल्म कंपनीत “माझा मुलगा”,”माणूस” या दोन चित्रपटात नायिकेच्या भूमिका मिळाल्या. या दोन्ही चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिकांचं कौतुक तर झालेच,पण त्यांनी गायलेली गाणीही लोकप्रिय झाली.”माणूस” चित्रपटातील “कशाला उद्याची बात” हे त्यांचे गाणे आजही श्रवणीय वाटते. दुर्गा खोटे निर्मित “सवंगडी”चित्रपटासाठीही शांता हुबळीकरांनी गाणी गायली. “प्रभात”,”घर की लाज”,”कुलकलंक”,”मालन”,”घरगृहस्थी”,”सौभा ग्यवती भव:”इत्यादी हिंदी चित्रपटांत त्यांनी कामे केली व पुन्हा एकदा त्या मराठी चित्रपटांकडे वळल्या. विश्राम बेडेकर दिग्दर्शित”पहिला पाळणा” मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केली. मातृभाषा कानडी असूनही शांताबाईंनी फक्त एकाच कानडी चित्रपटात काम केले. चित्रपटाचे नाव होते “घरसंसार”. फिल्मिस्तानच्या “सौभाग्यवती भव” या सिनेमात पहिल्यांदाच चरित्र अभिनेत्रीची भूमिका साकारली.
शांता हुबळीकर “माणूस’ मध्ये वारांगनेची भूमिके बद्दल म्हणत “माणूस’ मध्ये वारांगनेची भूमिका करताना मला मुळीच कमीपणा वाटला नाही. काही झाले तरी मी ‘प्रभात’ चित्राची नायिका होते. कशाला उद्याची बात या बहुभाषक गाण्यातील उच्चार ते म्हणण्याची पध्दत मी मन लावून दिवस-दिवस शिकत होते. त्यात कोणी दोष काढू नये म्हणून. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी ‘पोरगी काम कसे करते बघ’ हे दाखवण्यासाठी शांतारामबापू आपल्या आईला स्टुडिओच्या गॅलरीत आणून बसवीत.”
शांता हुबळीकर यांचे १७ जुलै १९९२ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply