पांडुरंग वासुदेव गाडगीळ यांचा जन्म ३ एप्रिल १८९९ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कुरुंदवाड आणि कोल्हापूर येथे झाले. त्याचप्रमाणे त्यांचे उच्च शिक्षण सांगली आणि पुणे येथे झाले. पुढे ते कॉलेज सोडून पुण्यास आले आणि टिळक विद्यालय ह्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊ लागले. घराच्या गरिबीमुळे ते छापखान्यात स्थूल मुद्रिते तपासण्याचे काम करून त्यांचा खर्च भागवत असत. १९२३ साली त्याचे शिक्षण पुरे झाले. तेथे त्यांना वाङ्मयविशारद हि पदवी मिळाली.
ह्याच सुमारास मुळशी धरणाच्या प्रकरणी सत्याग्रह चळवळ सुरु झाली. त्याच्यात ते सामील झाले. त्यामुळे ते दोनदा तुरुंगातही गेले. त्यावेळी न. चि . केळकर हे दुसऱ्या आणि तिसऱ्या टिळकचरित्राच्या खंडाच्या लेखांची तयारी करत होते , तेव्हा गाडगीळ त्याची विषयवार इंडेक्स कार्डे तयार करण्यासाठी केळकरांच्या घरी तीन महिने राहिले. केळकर अग्रलेख सांगत आणि गाडगीळ ते लिहून घेत असत त्यामुळे त्यांना केळकरांशी बोलायलाही मिळत असे. तिथे त्यानी प्रचंड वाचन केले. त्यात अर्थशास्त्राचेही वाचन झाले. त्यामुळे अर्थशास्त्राचा विचार करण्याचे वळण , सवय त्यांना लागली.
त्यांचे वाचन अफाट होते तशात १९२७-२८ मध्ये त्यांना जबरदस्त पाठदुखी सुरु झाली. काही आठवडे ताराचंद हॉस्पिटलमध्ये अंथरुणाला खिळून होते परंतु त्यांचे वाचन त्याही अवस्थेत झोपून चालूच होते. दुखण्यातून उठून घरी आल्यानंतर त्यांची आचार्य जावडेकरांनी भेट झाली तेव्हा ते म्हणाले मला समाजवादाचा पहिला शास्त्रीय गुरु भेटला. जावडेकरांनी त्यांच्याकडून अनेक लेख आणि अनेक पुस्तकातली काही प्रकरणे वाचून घेतली. १९३१ मध्ये ते ‘केसरी ‘ मध्ये गेले. आचार्य जवाडेकरांमुळे मार्क्स , महात्मा गांधी , जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा गाडगीळ अभ्यास करू लागले , विशेषतः ते हिंदू धर्म , वेदान्त , आणि गीता ह्यापासून मार्क्सकडे जावडेकरांमुळे वळले. १९३१ नंतरचे त्यांचे आयुष्य मराठी वृत्तपत्राचा लेखक आणि संपादक ह्या नात्याने काम पहाण्यात गेले. . त्यांनी लोकशक्ती , नवयुग , लोकमान्य , नवशक्ती , गावकरी आणि लोकमत ह्या वृत्तपत्रांचे संपादक म्ह्णून काम पाहिले. लोकमान्यचे ते १७-१८ वर्षे संपादक होते. वृत्तपत्राच्या पानांत छोटया-छोटया गावांची बातमी गाडगीळांच्या आग्रहामुळेच येऊ लागली होती. शेतीचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, कोकणातल्या खार जमिनीचे प्रश्न, या सगळ्या प्रश्नांना वृत्तपत्रांत गाडगीळ यांनी जागा करून दिली. गाडगीळ यांच्या लेखन शैलीवर न. चि . केळकर यांचा जसा प्रभाव पडला तसाच टिळक , आगरकर , राजवाडे , आचार्य जावडेकर ह्याचा प्रभाव त्यांच्या विचारमांडणीच्या पद्धतीवर पडलेला होता. १९४० ते १९७० या तीस वर्षात त्यांचे मार्क्सवाद आणि इतर अर्थशास्त्र ह्यासंबंधीचे त्यांचे वाचन चालूच होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले त्यात सोशॅलिझम अथवा समाजवादाचा ओनामा , रशियातील राज्यक्रांती , भारताचे आर्थिक नियोजन , पैशाची ओळख , अराज्यवाद , सुलभ समाजवाद , फॅसिझम अर्थात संघटित भाडवलशाही , मार्क्सचे कॅपिटल-सारग्रंथ ही अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली त्याचप्रमाणे माझा दृष्टिकोन , समाजवादाकडे , राजकीय कुरुक्षेत्र असे आठ लेखसंग्रह लिहिले.
समाजवाद आणि मार्क्सवाद बहुजनसमाजातील शिक्षित वर्गाला , पायाशुद्ध रितीने आणि अत्यंत साध्या भाषेत समजावून देण्याची फार मोठी कामगिरी पां . वा . गाडगीळ यांनी केली.
पां . वा . गाडगीळ हे पहिले मराठी संपादक आहेत. जे प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे संचालक होते. दिल्लीला जाणं-येणं त्यांना न झेपणारं होतं. तरीसुद्धा प्रेस कौन्सिलची एकही बैठक गाडगीळसाहेबांनी कधीही चुकवली नाही. बैठक एका दिवसाचीच असायची. त्या बैठकीला समितीच्या सदस्याला निवासस्थानाहून यायला गाडी असायची. गाडगीळ त्यावेळच्या महाराष्ट्र सदनात राहायचे. प्रेस कौन्सिलचे कार्यालय समोरच्याच फुटपाथवर त्यावेळी होते . त्यावेळी प्रेस कौन्सिलतर्फे आलेली गाडी ते परत पाठवायचे आणि चालत जायचे आणि चालत परत यायचे.
१९७१ साली नागपूर येथून दैनिक लोकमतची सुरुवात झाली. त्याचे पहिले संपादक पां. वा. गाडगीळ हेच होते. लोकमतची आज अद्ययावत इमारत आहे. सुरुवात झाली तेव्हा सुभाष रोडवरील गणेशपेठमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये कार्यालय थाटले होते. नागपूरचे त्यावेळचे तापमान ४२-४३. त्या तापमानात गाडगीळ डोक्यावर अक्षरश: फुटक्या अर्ध्या मडक्याची टोपी घालून चालत यायचे आणि चालत जायचे. त्यावेळच्या संपादकांना डिक्टेशन घ्यायला कुणी नव्हते. स्वत: अग्रलेख लिहायचे आणि स्वत:चे प्रूफ वाचायचे. लोकमान्यच्या पूर्वी आचार्य अत्रे यांच्या साप्ताहिक नवयुगच्या संपादकपदी बोलवले ते गाडगीळ यांना . मुख्य संपादक आचार्य अत्रे, कार्यकारी संपादक पां. वा. गाडगीळ आणि साहित्य विषयक संपादक शांता शेळके ही मंडळी होती. दर आठवडयाचा ‘ सख्या हरी’ लिहिणारे विनोदी लेखक दत्तू बांदेकर . अनंत काणेकर एकदा म्हणाले, ” अत्रेसाहेब, तुम्ही विनोदाचा धबधबा, पलीकडे मिश्कील विनोदी दत्तू बांदेकर आणि मध्ये गंभीर लेखन करणारे पां. वा. गाडगीळ. ”
महाराष्ट्राचे ख्यातनाम पत्रकार, विचारवंत ‘लोकमान्य’ या ख्यातनाम दैनिकाचे संपादक श्री. पां. वा. गाडगीळ यांचे दि. १८ एप्रिल १९८७ रोजी अचानक अपघाती निधन झाले .
— सतीश चाफेकर
Leave a Reply