शांतारामबापूंनंतर हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत यश मिळवणारा दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी याचं नाव घ्यावं लागेल.
दत्ता धर्माधिकारी यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापुर येथे झाला. दत्ताजींचं शिक्षण कोल्हापुरातच झालं. त्याच वेळी “पाध्येबुवा‘कडं त्यांनी शास्त्रोक्त गायनाच्या शिक्षणाचे धडेही गिरवले; पण त्यांचे वडील जगन्नाथराव वारल्यामुळं शिक्षण अर्धवट सोडून ते पुण्यात आले आणि नोकरी करायची म्हणून प्रभात स्टुडिओत त्यांनी “टाइमकीपर‘ची नोकरी स्वीकारली; पण त्यांचं मन त्यात रमत नव्हतं. त्यांना व्ही. शांताराम यांच्यासारखा मोठा दिग्दर्शक व्हायचं होतं. ते क्षेत्र त्यांना खुणावत होतं. चराचरसृष्टीचा “टाइमकीपर‘ ब्रह्मदेव; त्यानं दत्ताजींच्या कुंडलीत शुभवेळेची नोंद केली; ते शांतारामबापूंचे व दामले-फत्तेलाल यांचे सहायक दिग्दर्शक झाले! आणि १९५० मध्ये त्यांनी “मायाबाजार‘ (हिंदी व मराठी) हा चित्रपट स्वतंत्रपणे दिग्दर्शित केला. सुलोचना, बेबी शकुंतला, उषा किरण (यांना दत्ताजींनी नायिकेची प्रथम संधी दिली), राजा गोसावी, शरद तळवलकर (यांनाही रजतपटावर प्रथम संधी दिली), सूर्यकांत, चंद्रकांत, राजा परांजपे, राजा नेने, जयश्री गडकर, रेखा, चित्रा आदी कलावंतांनीही त्यांच्या दिग्दर्शनाखाली आपल्या भूमिका उत्तम प्रकारे साकारल्या. मराठीबरोबरच हिंदीतले प्रथितयश मोतीलाल, सोहराब मोदी, नलिनी जयवंत, गीता बाली, निरुपा रॉय, मीनाकुमारी आदी कलाकारांनीही त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं होतं. “बाळा जो जो रे‘, “स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी‘, “भाग्यवान‘, “चिमणीपाखरं‘, “एक धागा सुखाचा‘, “अबोली‘, “सावधान‘, “सुहागन‘ (हिंदी) चित्रपटांबरोबरच “अखेर जमलं,‘ “आलिया भोगासी‘, “लग्नाला जातो मी‘, असे विनोदी चित्रपट काढून त्यांनी लोकांना खळखळून हसवलंही. याशिवाय “थांब लक्ष्मी कुंकू लावते‘, “विठू माझा लेकूरवाळा‘, “सतीचं वाण‘, “सतीची पुण्याई‘, “सुदर्शनचक्र‘, “भक्त पुंडलिक‘ इत्यादी धार्मिक व पौराणिक चित्रपट तितक्याचच समर्थपणे त्यांनी दिग्दर्शित केले. “भाग्यवान‘, “दीप जलता रहे‘, “मुझे सीने से लगा लो‘, “दौलत का नशा‘ इत्यादी हिंदी चित्रपटांचंही दिग्दर्शन त्यांनी केलं. “दैवे लाभला चिंतामणी‘, “कुंकू जपून ठेव‘ इत्यादी यशस्वी नाटकं त्यांच्या नावावर जमा आहेत. “कुंकू जपून ठेव‘ या नाटकात नायिकेच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली होती, तीही वयाच्या साठाव्या वर्षी. त्यांचा “महात्मा‘ हा चित्रपट पु. ल. देशपांडे यांच्या “भाग्यवान‘ नाटकावर आधारित होता आणि तो मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांमध्ये निर्माण केला होता. एकच चित्रपट एकाच वेळी तीन भाषांमध्ये निर्माण करणारे दत्ताजी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातले पहिले निर्माता-दिग्दर्शक होते. सर्व समीक्षकांनी या चित्रपटाचं यथोचित कौतुक केलं होतं. दत्ताजींचं हास्य ही त्यांना ईश्वतरानं दिलेली देणगी होती आणि कोणत्याही संकटात ते हास्य त्यांना सोडून गेलं नाही. साधेपणा हा त्यां चा गुण होता. एवढंच नव्हे तर, संगीतकार वसंत पवार यांना हिंदी चित्रपटात त्यांनी संधी दिली व त्यांचा रुबाब वाढावा म्हणून त्यांना वूलनचा सूटही शिवून दिला होता. आपल्या “स्टाफ‘वर त्यांचं मनस्वी प्रेम होतं. त्यामुळंच एक चित्रपट पूर्ण झाल्यावर दुसरा चित्रपट सुरू होण्यापूर्वीच्या मध्यंतरीच्या काळातला पगारही ते देत असत! काही काम न करताही आपल्या या कुटुंबाला ते सहा-सहा महिने पोसत असत. स्वतः उत्तम दिग्दर्शक असूनही आपले सहकारी अनंत माने यांना आपल्या मराठी व हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी त्यांनी दिली होती. एखाद्या संतानं प्रेमळ मानवाचं रूप घेऊन तो या मायावी चित्रपटसृष्टीत वावरतोय, असं दत्ताजींना पाहून वाटायचं
दत्ता धर्माधिकारी यांचे ३० डिसेंबर १९८२ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Thanks from bottom of my heart to publish this article about my grandfather.