मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक राम गबाले यांचा जन्म २० मार्च १९१४ रोजी झाला.
राम नारायण गबाले हे त्यांचं पूर्ण नाव. मराठी चित्रपटांमध्ये राम गबाले दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक म्हणून ख्यात असून रुपेरी पडद्यावर देशभक्तीपर आणि सामाजिक विषयांवर तसंच लहान मुलांसाठी उत्तमोत्तम चित्रपट तयार करण्यात त्यांचा समावेश होता. त्यांनी केवळ चित्रपटसृष्टीवरच नव्हे तर डॉक्युमेंटरीज, बालचित्रपट, लघुपट यावरही आपला ठसा उमटविला. मुळचे कोल्हापूरचे असलेल्या गबाले यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक मास्टर विनायक यांच्याकडून त्यांनी दिग्दर्शनाचे धडे घेतले. मास्टर विनायक यांच्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’ या संस्थेतून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करत चित्रपटनिर्मिती व दिग्दर्शनात स्वत:चा ठसा त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीवर उमटवला.
मराठी चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या प्रदीर्घ काळातत त्यांनी ७० हून अधिक दर्जेदार चित्रपट केले. “देवबाप्पा” चित्रपटात चंदाराणीच्या भूमिकेसाठी मेघना गुप्ते या चुणचुणीत मुलीची निवड त्यांनीच केली होती. पुढे तिची ही भूमिका खुपच गाजली व बाल चित्रपट यशस्वीरीत्या सादर करणारा एक मेहनती दिग्दर्शक म्हणून गबाले यांचे नाव झाले. ‘देवबाप्पा’ चित्रपट तर मराठी कुटुंबांनी डोक्यावर घेतला. त्यातील ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ हे गाणे अनेक वर्षे महाराष्ट्रातल्या शाळाशाळातून समारंभाला साभिनय म्हटलं जायचं. या गाण्यावर महाराष्ट्रातल्या लहानमुलींच्या अनेक पिढ्या नाचल्या आहेत. ‘दूधभात’ व ‘देवबाप्पा’सारख्या गाजलेल्या चित्रपटांमुळे राम गबाल्यांची लहान मुलांकडून उत्तम काम करून घेणारे दिग्दर्शक म्हणून ख्याती झाली. पुढे तर ‘राजकमल कलामंदिरा’च्या ‘चिल्ड्रेन्स फिल्म डिव्हिजन’चे ते डिरेक्टर इनचार्ज झाले. ‘राजकमल’तर्फे त्यांनी ‘फूल और कलियॉं’ आणि ‘काले गोरे’ हे दोन बालचित्रपट निर्माण केले.
कोल्हापूरहून पुण्याला आल्यानंतर राम गबाले यांची चित्रपट व्यवसायाच्या निमित्ताने गीतकार ग. दि. माडगूळकर, पु.ल. देशपांडे, वसंतराव देशपांडे व वसंत सबनीस यांच्याशी मैत्री जुळली होती. पु. ल. देशपांडे यांच्या ‘बटाटय़ाची चाळ’ या चित्रपटाच्या निर्मितीसाठी गबालेंचा सक्रिय सहभाग होता. राम गबाले यांनी काही हिंदी सिनेमेही केले पण तेथे त्यांचं मन रमले नाहीत. ते काही काळ फिल्म्स डिव्हिजनच्या सरकारी नोकरीतही होते. त्या काळात त्यांनी विनोबांची भूदान चळवळ, महर्षी कर्वे, विश्वेश्वरय्या यांच्यावरही माहितीपट बनविले होते. याशिवाय समुद्रातील दीपस्तंभावर त्यांनी बनविलेला माहितीपटही गाजला.
राम गबाले यांनी मुंबई व दिल्ली दूरदर्शनसाठी शंभराहून अधिक अनुबोधपट, व्हिडिओ फिल्म्स, मालिका आणि टेलिफिल्मशी निर्मितीही त्यांनी केली होती. निर्माता आणि लेखक या नात्याने ते या माध्यमाशी निगडित होते. रिचर्ड अॅटनबरो यांना ‘गांधी’ या चित्रपटासाठी नियोजन करण्यासाठी त्यांनी विशेष सहकार्य केले होते. “दूधभात”, “वंदेमातरम्”, “देवबाप्पा”, “जशास तसे”, “मोठी माणसे”, “पोस्टातली मुलगी”, “छोटा जवान” हे त्यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या प्रमुख व लोकप्रिय चित्रपट. राम गबाले यांना ”छोटा जवान” व ”जिव्हाळा” या चित्रपटांसाठी महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठींच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं असून ”फूल और कलियाँ” या चित्रपटासाठी “पंतप्रधानांचे सर्वोत्तम बालचित्रपटाचे सुवर्णपदक, “काले गोरे” या चित्रपटासाठी लिपझिगच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचा पुरस्कार व “द स्टोरी ऑफ डॉ. कर्वे” साठी देखील राज्य पारितोषिकानं पुरस्कृत करण्यात आलेलं होते. याशिवाय “गदिमा पुरस्कार” महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कार “अल्फा टीव्ही मराठीचा अल्फा जीवनगौरव पुरस्कार” ने गौरविण्यात आलेलं होते. त्यांचे आत्मचरित्र या नावाचे आत्मकथनही प्रसिद्ध आहे.
राम गबाले यांचे ९ जानेवारी २००९ रोजी निधन झाले.
राम गबाले यांचे गाजलेले चित्रपट.
वंदे मातरम्, मोठी माणसे, देव पावला, जोहार मायबाप, जशास तसे, दूधभात, घरधनी, नरवीर तानाजी, देवबाप्पा, तन्हाई (बडी माँ), पोस्टातल मुलगी, शेर शिवाजी, छोटा जवान, जिव्हाळा, गाऊ त्यांना आरती, पुण्याई, अनवाणी (नंगे पाँव), हे गीत जीवनाचे, धरती आकाश, दिनूचे बिल.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply