नवीन लेखन...

मराठी की मरींदी ?

२७ फेब्रुवारी म्हणजे मराठी राजमाषा दिन ! सध्याच्या मराठी भाषेच्या स्थितीबद्दल मी लिहिलेला एक छोटा लेख दैनिक नवाकाळ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. हा लेख आपल्याला पाठवीत आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे.

आपल्याला महाराष्ट्रातच ” मराठी राजभाषा दिन” साजरा करावा लागतो हेच आधी मोठे दुर्दैव आहे. भाषावार प्रांत रचनेनंतर प्रत्येक राज्यात राज्यभाषेतून सर्व व्यवहार होऊ लागले. पण आपल्याकडे मात्र आधीपासूनच महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी यांचा संबंधच तोडून टाकण्याचे राजकारण रुजविले गेले. या सर्व प्रक्रियेमध्ये मराठी माणसांमध्येच मराठी भाषेबद्दल न्यूनगंड निर्माण होत गेला. इतर प्रांतीयांना मराठी भाषा समजणार नाही हे गृहीत धरून त्याच्याशी मुळातच मराठीत न बोलण्याची खोड मराठी माणसाला आहे. आपल्याच अशा वृत्तीमुळे मग बाहेरून येणारे कशाला मराठी शिकतायत? माझ्या ऑफिसमधील अन्य राज्यातून पहिल्यांदाच बदली होऊन आलेल्या माणसांना याचे आश्चर्य वाटायचे. ते म्हणायचे की येथे येतांना आम्ही अनेक मराठी शब्द पाठ करून आलो पण येथे आल्यावर बघतोय की मराठी माणसेच हिंदी बोलतायत. इथे आणखी एक उदाहरण देण्यासारखे आहे. अनेक श्रीमंत उच्चभ्रू गाडीवाले, आपल्याला मराठी अगदी अजिबात समजत नाही असा आव आणतात. पण या गाडीवाल्याने सिग्नल तोडला आणि आमच्या मराठी हवालदाराने त्यांना पकडले की हेच गाडीवाले , इतक्या छान मराठीत त्या हवालदाराला समजावतात ते ऐकून आपण अगदी अचंबित होतो.

एकीकडे मराठी भाषिकांचीच अशी उदासीनता आणि न्यूनगंड आणि दुसरीकडे हिंदी भाषेचे आम्हीच ओढवून घेतलेले आक्रमण ! आपल्या महाराष्ट्र राज्यात इतर सर्व भाषिकही वर्षानुवर्षे स्थायिक आहेत. पण त्यांच्या भाषांनी या मराठी भाषेवर अशा पद्धतीने कधीच आक्रमण केलेलं नाही. या भाषांमधील कित्येक शब्द हे दुधात साखर मिसळून जावी तसे मराठीत विरघळून गेले. अशा पद्धतीने भाषाही वाढत असते – समृद्ध होत असते. पण हिंदीचे आक्रमण हे तंबूत घुसलेल्या उंटासारखे आहे. मूळ तंबू मालकालाच परागंदा करणारे आहे. यासाठी मी हिंदी भाषिकांना अजिबात दोष देणार नाही. कारण उद्या उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब अशा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी भाषा बोलली गेली तर त्याचा मला, एक मराठी भाषिक म्हणून खूप आनंद होईल. वाईट वाटते ते आपल्याच राज्यात आम्हाला आमच्या भाषेबद्दल असलेला न्यूनगंड आणि आम्हीच स्वीकारलेले अन्य भाषांचे आक्रमण !
सार्वजनिक ठिकाणी मराठी बोलायची आम्हाला लाज का वाटावी ? घटनेने दिलेले स्वातंत्र्य , भाषिक – प्रांतिक ऐक्य, आर्थिक राजधानी, मुंबई म्हणजे छोटा भारतच, हे काय फक्त मराठी माणसांनीच ऐकायचे ?

जशी मराठी बोलायची आम्हाला लाज वाटते तसे आम्ही भाषेवरुनही आमच्यात तट पाडले आहेत. आम्ही एकदा ठरवायला हवे की शुद्ध किंवा योग्य मराठी कोणती ? राजकीय आधाराने विद्वान झालेले काही लेखक म्हणतात की जो कुणी जशी भाषा बोलेल, लिहील तीच शुद्ध मराठी.आता यावर काय बोलणार ? असे जगात कुठल्याही भाषेबाबतीत घडलेले नाही. एखाद्या भाषेत सतत बदल अपरिहार्यच असतात. पण मूळ भाषा म्हणून काहीतरी हवेच ना ? मराठी भाषेतही व्याकरणामध्ये , लिहिण्याच्या पद्धतीमध्ये , बोलण्यामध्ये आजवर असंख्य बदल झाले आहेत. आम्ही आमची ल आणि ख अशी दोन मुळाक्षरे आनंदाने बदलली. संगणक, अवकाश विज्ञान, अत्याधुनिक शास्त्रे यामध्ये अनाकलनीय आणि बोजड असे भाषांतरीत मराठी शब्द वापरण्यापेक्षा पेक्षा थेट मूळ शब्द वापरणे योग्य आहे. पण त्याच बरोबर गावांकडे शासकीय व्यवहारात शुद्ध मराठी भाषा अगदी सहज वापरली जाते हे देखील लक्ष्यात घ्यायला हवे.

शुद्ध मराठी म्हणजे “ब्राह्मणी भाषा ” असाही प्रचार केला जातो तो खूपच दुर्दैवी आहे. शुद्ध मराठी भाषा ही कुणाची मक्तेदारी नव्हे. अगदी पूर्वी देखील अनेक सुप्रसिद्ध मराठी लेखकांच्या पुस्तकांची छापखान्यात ” प्रुफे ” तपासणारे बहुतेक जण ब्राह्मणेतर असत. रोजच्या रोज ग्रामीण भागात वावरणारे हजारो शिक्षक अत्यंत शुद्ध मराठी बोलतात, उत्तम हस्ताक्षरात मराठी लिहितात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून खूप परिश्रम घेत असलेले हजारो मराठी भाषिक हे ब्राह्मणेतर आहेत. मग बेधडकपणे असा शिक्का मारणे हा या सर्व मंडळींचा अपमान नव्हे का?

एखादा वक्ता उत्तम इंग्रजीत बोलत असतांना मधेच अनेक मराठी शब्द वापरतो का ? असे झाल्यास त्याला इंग्रजी नीट येत नसावे असा समज होतो. मग मराठी बोलत असतांना आपण शब्दच्या शब्द, वाक्येच्या वाक्ये इंग्रजीत का बोलतो ? आता तर मराठी बोलतांना इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा वापर इतका वाढत चालला आहे की वाक्यात मराठी शब्द शोधायची वेळ येते. वृत्तपत्रातील अनेक जाहिराती या अत्यंत भीषण मराठी भाषेत असतात. मराठी संभाषणात वारंवार इंग्रजी शब्द वापरणे हा अनेकांना “स्मार्ट” होण्याचा मार्ग वाटतो.

शब्दांचे टंकलेखन करतांना होणाऱ्या चुकांमुळे किंवा लिपी ( “फॉन्ट”) च उपलब्ध नसल्यामुळे महत्वाच्या मराठी वृत्तपत्रांमधून काही चुकीचे मराठी शब्द कायमचे रूढ झाले आहेत. उदा. उद्धाटन ( उद्घाटन ), करणार्या ( करणाऱ्या ).

चुकीच्या शब्दावर अनुस्वार देण्याची विकृती अलीकडेच फोफावत चालली आहे. मुबंई, जवांनाची, राजंहस, उंदड, जगंल, जंगदबा असे लिहिलेले शब्द वाचताही येत नाहीत.अनेक हिंदी शब्द थेट आयात केल्यामुळे अनेक उत्तम छटा असलेले मराठी शब्द कालबाह्य ठरत आहेत. योगदान हा एकच शब्द वापरून पूर्वीचे महत्वाचा वाटा, खारीचा वाटा, सिंहाचा वाटा हे शब्दच बाद झाले आहेत. आयाम या एका शब्दामुळे परिमाण, दिशा, छटा असे उत्तम शब्द बाद होत आहेत. यश ऐवजी यशस्विता, उपयोग ऐवजी उपयोगिता कधी आले ?

मराठी वृत्त वाहिन्या आणि मालिका वाहिन्या आपल्या मराठी भाषेचे ज्या वेगाने आणि जे वैविध्यपूर्ण धिंडवडे काढतायत, ते पाहिल्यावर या वाहिन्या मराठी भाषेच्या शववाहिन्या ठरणार काय अशी भीती वाटू लागली आहे. हेराफेरी, पर्दाफाश, भांडाफोड, छेडछाड, तामझाम, करूयात / जाऊयात / पाहुयात, मोठा खुलासा ( गौप्यस्फोट ), हिरवी झेंडी दाखविली, जन्मदिवस ( वाढदिवस), प्रधानमंत्री ( पंतप्रधान ), रक्षामंत्री ( संरक्षण मंत्री),वित्तमंत्री (अर्थमंत्री) अशा एकाहून एक अगम्य / आगाऊ आणि भाडोत्री शब्दांनी ओसंडून वाहणारी मराठी भाषा सतत ऐकावी लागते. एखाद्या घटना स्थळावरून वार्ताहर जेव्हा, ” हा रस्ता जो आहे, ही झाडे जी आहेत, इथली माणसे जी आहेत, वाहने जी आहेत ” अशा मराठीत वर्णन करू लागतो तेव्हा आपणच अवाक होतो. काही मुख्य वाहिन्यांच्या निवेदकांना विदर्भ, विद्यार्थी, विद्यापीठ हे शब्द म्हणताच येत नाहीत. त्या ऐवजी ते अनुक्रमे विधर्ब, विध्यार्ती, विध्यापीठ असे म्हणतात. अशुद्ध, भ्रष्ट, भेसळयुक्त मराठीच्या महासागरात, नक्की योग्य काय हेच समजेनासे होते.

एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ( जो तामिळ, कन्नड,बंगाली भाषांना आधीच लाभला आहे ) मिळविण्यासाठी अनेक मराठी भाषाप्रेमी खूप झटतायत ! तर दुसरीकडे ही अभिजात भाषा लिहिताना अनेक गोष्टी वेगाने विस्मृतीत जात आहेत. त्याबद्दलचे अज्ञान, अनेक शब्दच न वापरणे, अन्य भाषेतील पर्यायी शब्दांचा मुक्त वापर इ. गोष्टींमुळे हे घडत असावे.

मराठी वाक्यांमध्ये हिंदी शब्दांचा वापर अधिकाधिक वाढत चालला आहे. काही दिवसांनी आपल्या वाक्यातील मराठी शब्द शोधावे लागतील. मराठी भाषेला मराठी म्हणण्याऐवजी “मरींदी ” म्हणावे लागेल.

आपण आत्ताच सावरायला हवे. सर्व भेद विसरून मराठी भाषेच्या भल्यासाठी एक व्हायला हवे. तरच या ” मराठी राजभाषा दिन” साजरा करण्याला खरा अर्थ प्राप्त होईल.

–मकरंद करंदीकर.
०२२-२६८४२४९०

Avatar
About मकरंद करंदीकर 43 Articles
मकरंद शांताराम करंदीकर यांनी बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या अनेक छंदांना पूर्णपणे वाहून घेतले. गेली सुमारे ५० वर्षे ते दिव्यांचा - विशेषत: भारतीय दिव्यांचा संग्रह करीत आहे. त्यांच्याकडील हा संग्रह भारतातील दिव्यांचा सर्वात मोठा संग्रह आहे. या विक्रमासाठी त्यांचे नाव २ वर्षे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आणि एकदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. याचबरोबर भांडी, बैठे खेळ, पत्ते, जुनी प्रसाधने, लेखन साहित्य असे इतर अनेक छंद त्यांनी जोपासले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..