नवीन लेखन...

परदेशीय मराठी कुटुंबातली गृहस्वामिनी

आई बाबा इतके खूष असतात कारण लेकीला परदेशातल्या सुखवस्तु कुटुंबातलं स्थळ मिळतं. आणि  ती ? ती हर्षभराने आकाशाला केव्हाच स्पर्शून येते. धाकटी सोनाली आठवडाभर घरभर नाचत असते, होणार्‍या जिजाजींचे बहारदार वर्णन असलेलं जणू एकच गाणं तिला पाठ येत असतं ‘‘अच्छे घरका लडका है पर धकधक लाता है, पान चबाता है तो थोडी पीकर आता है – सुनसुन दिदी तेरे लिए एक रिश्ता है ‘‘ ऐकताना आख्ख्या कुटुबाला खळखळून हसू फुटतं.

लगीन अगदी थाटमाटात होतं. एके दिवशी आफ्रिकेतल्या विमानतळावर ती उतरल्यावर तिच्या जीवनातला नवा अध्याय सुरू होतो. पाडव्याला गुढी उभारण्याचे कुणाच्या ध्यानीमनीही नसते, गणेशचतुर्थीला घालीन लोटांगण वंदीन चरण करायला बाप्पाच घरी नसतात. बीजेला ओवाळायला भाऊराया नसतो आणि पहिल्या बाळंतपणाच्या वेळी आई तरी कुठे जवळ असते? लवकर तिसरा माणूस घरात येतो आणि त्या मोठ्ठ्या माणसाने घर भरून जातं.  

दारेसालामची मराठी मंडळी म्हणजे खूप उत्साही. एखाद्या शनिवारच्या संध्याकाळी मराठा क्लबकिवा महाराष्ट्र मंडळात गेल्यावर शहरातल्या दोनशे मराठी कुटुंबातली अगदी तीन चारजण  हमखास भेटतात. मुलांना घेऊन आलेले असतात. ते व्यावसायिक आणि नोकरी करणारे असतात. स्वतंत्र धंदा असलेले तसे मराठी कमीच. नागपूरहून आलेला प्रसाद कुलाबकर भेटतो. पत्नी प्राची आणि दोन मुली पण असतात. प्राची अहमदाबादची. बडोद्याची माहेरवाशीण. समीर व राधिका भेटतात. समीर मुंबईजवळ ऐरोलीला होता. राधिका कुर्डुवाडीच्या करंदीकरांची. त्यांना आहे एक मुलगा. सर्व मुले सुरेख मराठी बोलतात. कुटुंबियांचे एकच समाईक स्वप्न असते. कधीतरी भारतात परतायचे. परतल्यावर मुलांची पंचाईत नको म्हणून घरात मराठी बोलण्याचा हव्यास. कधी जायचे व कसे म्हणजे नोकरीसाठी का धंदा करायला जायचे याचा कुणालाच पत्ता नसतो. पण भारतात परतण्याची इच्छा मात्र प्रबळ. वर्षातून एकदा भारतात फेरी होते. वृद्ध आई बाबांच्या प्रकृतीची सर्वांना सारखीच काळजी. त्यांच्या म्हातारपणात आपण जवळ नाहीही मनातली सल राधिका चटकन् बोलून जाते. 

जगातल्या कुठल्याही देशात जा. मराठी गृहिणीच्या व तिच्या यजमानांच्या मनातला आई-बाबाविषय त्यांना सतत कासावीस करत असतो. भाडभाड बोलणारी दीपा त्यांच्याबद्दल बोलायला लागली की अचानक थांबते. तिचे डोळे डबडबलेले असतात. स्वातंत्र्यवीरांचे ठीक. इंग्लडला असतांना ब्रायटन समुद्रकाठावर बसून त्यानी लिहिले, ‘ने मजसी ने परत मातृभूमीला…आंतरीक भावना व्यक्त करण्यासाठी त्या शब्दप्रभूकडे शब्द धाव घेत असत. पण कुर्डुवाडीत मोठी झालेल्या राधिकाचे काय? घरची आठवण उन्मळून आली की तिचे डोळे पाणावतात. त्या प्रत्येक थेंबांवर एक गुप्त ओळ लिहिलेली असते, ‘तुम्ही गेला आणि तुमचे देवपण नावा आले! 

आफ्रिकेतल्या भारतीयांना नेहमीच सुखसमृध्दीचे दिवस असतात असे मानणे योग्य नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या मनस्तापाला मोठ्या धीराने तोंड द्यावे लागते. वांशिक दुजाभाव कोणत्या देशात नाही ? धंद्यात व नोकर्‍यांत तर उघडपणे चालू असतो. तो सहन करावाच लागतो. मुलांना त्यापासून दूर ठेवण्याचा आई बाबांचा प्रयत्न असतो. त्याना होणारे दुःख असह्य होते. कधी कधी वाटते, सरळ विमानतळावर जावे मुंबईचे उड्डाण पकडायला. एका मराठी दांपत्याने याच कारणासाठी अमेरीका सोडली कारण एका मध्यरात्री मुलगा आई बाबांच्या कुशीत आला. तो मुसमुसून रडतांना सांगत होता, “मला दरवेळी नाटकात ब्लॅक डेव्हीलचा रोलका मिळतो? मला अजिबात आवडत नाही.” काय त्याला उत्तर त्याला देणार या प्रश्नाच”? आता ते मराठी कुटुंब सेवानिवृत्तीनंतर पुण्यात राहते.  

सर्वात कठीण प्रसंग भारतीयांवर गुदरला जेव्हा एकदा सरकारी फर्मान निघाले. ताबडतोब चालते व्हा या देशातून. हा आमचा देश आहे. तुम्हाला बरेच वर्षे सहन केले आम्ही’. मग झगडे मारामार्‍या चालू झाले . काहींचे खून पण झाले. अशावेळी आजोबा-बाबांना मिळालेल्या फक्त ब्रिटीश नागरीकत्वाची किंवा परवान्याची तेवढी आशा उरली. पण त्यांना ब्रिटनने चक्क सांगून टाकले दर वर्षी फक्त पंधरा जणांना प्रवेश मिळणार. मग कालांतराने दरसाल तीन हजारापर्यंत परवाने मंजुरी वाढवली. भाग्यवंत कुटुंबे इंग्लंडला निघून गेली. बाकीच्या उरल्या सुरल्यांना आफ्रिकेतच राहावे लागले. कारण त्यांचा भारतीय परवाना होता व त्यांना सहजी नवा परवाना मिळणे कठीण होते. मग काहींनी जेमतेम मुंबई किंवा दिल्ली गाठली. शिव नॉयपॉल या जगप्रसिध्द लेखकांने आपल्या पुस्तकात म्हटले होते, ‘पूर्व आफ्रिकेत राहणार्‍या भारतीयांनी आपल्याबरोबर भारतीयत्व पण जणू आपल्या सामानाच्या पेटीतच भरून आणले होते. इतकेच ते त्याला घट्ट चिकटून होते!’    

आफ्रिकेतील भारतीयांना सुख दुःखाचे दिवस येतात. मात्र आफ्रिकेत कोसळणारी संकटे वेगळी. संकटाचे दिवस आल्यावर घरात, दारात आणि उभ्या आसमंतातला परिसर खवळलेल्या समुद्रासारखा वाटायला लागतो. अशावेळी मुलांच्या आईला मात्र डगमगून न जाता घरातल्या सर्वांना सांभाळायचे असते. ती घरातला दीपस्तंभ बनते. 

सध्या साडे नऊ लाख भारतीय वंशाचे लोक एकट्या मॉरीशसमध्ये राहतात. केनियात सव्वा दोन लाख, टान्झानियात एक लाख, झांबियात तेरा हजार तर युगांडात बारा हजार भारतीय वंशाचे लोक राहतात. भोजपूरी बोलणारे सर्वाधिक. मग हिंदी, मराठी, तामिळ, तेलगू, उर्दु भाषिकांचा नंबर लागतो. अठरापगड मेळाव्यात मराठी अस्मिता जपायची म्हणजे किती कठीण. पण दारेसालामची प्राची मुलांना शुभं करोती शिकवतेच.

केनियामध्ये राहणारे बहुतांश आशियाई  हिंदू आहेत. केनियात ठिकठिकाणी हिंदू मंदिरे आहेत. मशिदी पण बर्‍याच आहेत. एका गणतीनुसार तेथे विसाच्यावर गुरूद्वारे आहेत. घरातल्या आईच्या पुढाकाराने धार्मिक सण नित्यनेमाने पाळले जातात. त्यावेळी शेजार पाजारच्या मित्रमंडळींचा हमखास समावेश असणार.

बरेच वर्षे परदेशात राहून भारतात कायमचे परतलेल्या पुरूषाला कुणी विचारलं कसं काय जमलं तुम्हाला?’ तो सांगायला लागतो. “घरात होती नं यशवंतीघोरपड, तानाजीकडे कोंडाणा सर करायला होती तशी. संकटांच्या खडकाला ती घट्ट चिकटून राहते मग मी आणि मुले सरसर वर चढतो.” दोस्त पत्नीबददल बोलतोय हे लगेच समजायचं. 

खरं म्हणजे परत आल्यावर रेशनिंग कार्ड नसल्याने गॅस सिलिंडर नसतो. आणि दांडगी वीजकपात होत असते. येतांना आणलेल्या इलेक्ट्रीक कूकरचाही उपयोग नसतो. मग रोजचा स्वयंपाक वातीच्या स्टोवर. एके दिवशी रेशनिंग कार्डासाठी पहाटे उठून रांगेत नंबर धरायला लागते. कार्ड मिळते. टेबलापाशी ही गर्दी. मात्र बाजूच्या खोलीत एक कर्मचारी मॅडम बाळासाठी स्वेटर विणत असते. बहुधा सहावा महिना असावा त्यांना. राग येतो. पण भारतात परतल्यावर असे कितीतरी देखावे दिसल्यावर क्रोध आवरण्याची सवय करून घ्यावी लागते…. जाऊ द्या. अशा कितीतरी गोष्टी मनात असतात. पण मित्रांना कशाला सगळे पुराण ऐकवायचे? मात्र काही ऐकणार्‍यांना अंदरकी बातमाहीत असते. इतर पुराण सांगता सांगता चिअर्सकरायची वेळ येते आणि पेल्यात ओतलेली बिअर मग गरम व्हायला लागते! इकडे गप्पा रंगलेल्या असताना मित्राची यशवंतीदोस्त मंडळींसाठी स्वयंपाकघरात गरमागरम भजी तळत असते ना ?  

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..