मराठी मुळाक्षरे आणि आरोग्य Word vibration Therapy
गेल्या आठवड्यात Alternative Medical Therapy या विषयातले तज्ज्ञ असलेल्या एका सुप्रसिद्ध व्यक्तीची भेट झाली. बोलताना `मराठीसृष्टी’चा विषय निघाला. मराठी भाषेसाठीच्या उपक्रमांची चर्चा झाली. त्यातून एक वेगळा आणि जिज्ञासा चाळवणारा विषय समोर आला.
कुणाला कदाचित हे अशास्त्रीय वाटेल. पण त्याचे दुष्परिणाम तर काहीच नाहीत. बघा तुम्हाला काय वाटतं ते..
ते सांगत होते.. `आपल्या शरीरात सात चक्रे आहेत. त्या चक्रांना वेगवेगळ्या संख्येच्या पाकळ्या आहेत. त्या पाकळ्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना जोडलेल्या आहेत. प्रत्येक पाकळीला एक एक बीजाक्षर आहे. बीजाक्षरे म्हणजे मराठीतील एक एक मुळाक्षर आहे. ही अक्षरे एक एक अक्षर अनुस्वार देऊन बरेच वेळा म्हटल्यास त्या उच्चाराच्या कंपनाने ( व्हायब्रेशनने ) तो अवयव नीट काम करू लागतो आणि आपले आरोग्य सुधारते.’
यातली सात चक्रे, पाकळ्या वगैरे गोष्टी थोड्या बाजूला ठेवल्या तरीही मला थोडं नवल वाटलं आणि उत्सुकता सुद्धा वाढली. मग त्यांनी काही उदाहरणं दिली.
`लहान मुलांना शु-शी व्हावी म्हणून आपल्याकडे मोठी माणसे शु-षू म्हणतात व मुलाला लघवी / शौच होते. लहान मुलाचे शरीर अतिशय कोवळे व नाजूक असते त्यामुळे ह्या बिजाक्षरांच्या दुसर्याने केलेल्या उच्चरांच्या कंपनांचाही परिणाम होतो.’
पूर्वी एकदा विठ्ठल नामाचा गजर केल्यावर हृदयविकाराच्या रोग्याला फायदा झाल्याचा उल्लेख कुणीतरी केला होता त्याची आठवण आली. छातीत दुखत असताना विठ्ठल मधला `ठ्ठ’ वारंवार म्हटल्यावर दुखणे थांबते असा कोणाला तरी अनुभव आला होता.
पूर्वी आपल्या मुलांकडून बाराखड्या म्हणून घेतल्या जात असत. त्याचा एक उद्देश आरोग्य हाही असावा. हल्ली इंग्रजी मिडीयम मध्ये शिकणाऱ्या मुलांनी मराठी मुळाक्षरे म्हणणे पालकांना कमीपणाचे वाटते!!
आपल्या पूर्वजांनी निसर्गातल्या शक्तींचा अभ्यास करून माणसाला निरोगी राहण्यासाठी सहज सोपे उपचार दिले. त्यांना आम्ही जुनाट, अडाणी म्हणतो. अशास्त्रीय म्हणतो. जे पाश्चात्य लोकांना मान्य नाही ते अशास्त्रीय अशी आपल्याकडची सरळसोट व्याख्या. अशा प्रकारच्या उपायांमध्ये वैद्याला व डॉक्टरला पैसे मिळत नाहीत त्यामुळे त्यांचाही या उपायांना विरोध असतो असे त्यांचे म्हणणे.
त्यांचं आणखी म्हणणं असं की मराठीतील अक्षरे कोणीही कुठेही म्हटली तरी चालतात. त्यामुळे विश्वास ठेऊन किंवा न ठेवताही मराठीतील मुळाक्षरे म्हणण्याचा प्रयोग करून पाहावा.
एक अक्षर १०० वेळा म्हणायला एक मिनिट पुरते. बर्याचशा आजारात मुलाधार, स्वाधिष्ठान व मणिपूर चक्रांची अक्षरे १०० वेळा म्हणणे पुरते.
यासाठी काही पैसे लागत नाहीत… थोडा वेळ वापरला जातो.. करुन बघायला काय हरकत आहे? झालाच तर फायदा होईल… नुकसान तर नाही ना होणार ?
मला वाटतं असा प्रयोग करून बघायला काही हरकत नाही. कदाचित त्यातून मराठी भाषेचा एखादा वेगळा पैलू बाहेर येईल…
मूलाधार चक्राची अक्षरे –
वं, शं, षं, सं
स्वाधिष्ठान चक्राची अक्षरे –
बं, भं, मं, यं ,रं, लं
मणिपूर चक्राची अक्षरे –
डं, धं, णं, तं, थं, दं, धं, नं, पं, फं
अनाहत चक्राची अक्षरे-
कं, खं, गं, घं, चं, छं, जं, झं, टं, ठं
विशुद्ध चक्राची अक्षरे-
अं, आं, इं, ईं, उं, ऊं, ऋं, ऋृं, एं, ऐं, ओं, औं, अं, अ:
आज्ञा चक्राची अक्षरे-
हं, क्षं
— निनाद प्रधान
Leave a Reply